विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 April 2023

शिवाजी महाराज आणि जावळीच्या दोन मोहिमा

 


शिवाजी महाराज आणि जावळीच्या दोन मोहिमा
लेखन : डॉ विवेक दलावे पाटील
राजांनी जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या पुढे स्वराज्यात सामील होण्याचा प्रस्ताव मांडला. कारण स्वकीय लोक एकत्र यावे व स्वराज्याच्या कार्यास हातभार लागावा अशी महाराजांची इच्छा होती. त्यासाठी महाराजांनी चंद्रराव मोरे यास पत्र लिहिलं. त्यावर चंद्रराव म्हणाले, आम्ही तुमचे स्वराज्य मानत नाही. तुम्ही कसले राजे, राजे तर आम्ही जाहलो श्री शंभू महादेवाच्या कृपेने. "येता जावळी जाता गोवळी शिक्षेस पात्र व्हाल" या भाषेत उलट उत्तर पत्राद्वारे कळविले.याचा महाराजांना राग आला. कारण एकेकाळी याच चंद्ररावास मदत केली होती. मात्र महाराजांचे उपकार तो विसरला होता. बाजीप्रभु देशपांडे, सरसेनापती नेताजीराव पालकर यांना ही चंद्रराव मोरेची खोड चांगलीच लक्षात आली. बाजीप्रभू कडाडले व म्हणाले, राजे आज्ञा करा मला आता जातो आणि जावळीतून त्या चंद्ररावाचं मस्तक घेऊन येतो. मात्र राजे म्हणाले नाही बाजी आता ही जावळीची मोहीम आम्ही स्वतः फत्ते करणार. ठरल्याप्रमाणे महाराजांनी सरनौबत नेताजीराव पालकर,संभाजी कावजी कोंढाळकर यांना आपल्या सोबत घेतले. व १६५६ साली जावळी वर चाल करून गेले. जावळी मधील रायरीच्या गडावर चंद्रराव वास्तव्यास होता. ठरल्याप्रमाणे महाराजांनी व सरसेनापती नेताजी पालकर यांनी रायरीवर आक्रमण केले. ठरल्याप्रमाणे महाराजांनी गानिमांची फौज संपवायला सुरुवात केली. व रायरीच्या किल्ल्यात शिरकाव केला. तर निम्मे मावळे घेऊन सरसेनापती नेताजीराव पालकरांनी रायरीच्या बाहेरची गानिमंची फौज भस्मसात करायला सुरुवात केली. दिसेल त्या गानिमंवर नेताजीराव तुटून पडत होते. दिसेल त्याला रक्तबंबाळ करत होते. बघता बघता चंद्ररावाच्या फौजेचा शेवट सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी लावलाच. त्याचा भाऊ प्रतापराव मोरे याच्याशी सरसेनापती नेतोजी पालकर भिडू लागले. दोघांमध्ये घणाघाती युद्ध झाले. तर दुसऱ्या बाजूला संभाजी कावजी कोंढाळकर यांनी त्याचा दुसरा धाकटा भाऊ हणमंतराव मोरे याच्याशी सामना केला. नेताजीराव व संभाजी कावजी यांनी प्रतापराव मोरे व हणमंतराव मोरे दोन्ही भावांना रक्तबंबाळ करून सोडले. त्यांचा एकत्रित दारूण पराभव केला. मात्र दोघेही मराठ्यांच्या हातावर तुऱ्या देऊन जावळीतून पळून गेले.
तर तिकडे गडात प्रत्येक दरवाजावरचे शिपाई,चोपदार,संपवत महाराज गडाच्या मध्याभागापर्यंत पोहोचले . शिवराय दृष्टीस पडताच चंद्रराव तिथून पळ काढू लागला. ठरल्या प्रमाणे गडातील राहिलेले गनीम सुद्धा छत्रपती शिवरायांनी संपुष्टात आणले. चंद्रराव मोरे गडात एकटाच सापडला. मग सरसेनापती नेताजी पालकर सुध्दा महाराजांच्या मदतीसाठी गडाच्या आत आले.दोघांनीही चंद्ररावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. अख्ख्या रायरीचा गड पालथा घालू पण त्याला शोधूनच काढू असे महाराज नेताजींना म्हणाले. व ठरल्याप्रमाणे एका महालात महाराजांना चंद्रराव मोरे सापडलाच तिथेच त्याच्या मानेला सरसेनापती नेतोजीराव पालकर यांनी तलवार लावली. तसा तो एका जागी शांत बसून राहिला.
महाराज म्हणाले. चंद्रराव, अजूनही वेळ गेली नाही. मी एक संधी आपणास देऊ इच्छितो, स्वराज्यात सामील व्हा आपण मिळून या परकीय राजवटीविरुद्ध लढा देऊ. आपला पराक्रम आम्ही जाणतो. असेही म्हणाले. पण यावर तो म्हणाला.
चंद्रराव:-. आता तडजोड वगैरे काही नाही. आम्ही अजून माघार घेतली नाही. मुळात आमचा पराभव झाला नाही आणि तुमचा विजयही झाला नाही.
नेताजीराव :-. ए चंद्ररावा , अरे या जावळीच्या जंगलाचा राजा एकच..... शिवाजीराजे..!
चंद्रराव:- मग करा म्हणावं माझ्याशी युद्ध . माझा पराभव झाल्याशिवाय या जावळीचे मालक तुम्ही होऊ शकत नाही.
महाराजांनी त्याच आव्हान स्वीकारलं. पण त्यानं एक अट घातली. की या युध्दात आपल्या दोघांशिवाय कुणीही हस्तक्षेप करणार नाही. महाराजांनी ती अट मान्य केली. व महाराज व चंद्रराव यांच्यात लढाई सुरू झाली.दमलेला चंद्रराव शिवरायंसमोर फार काळ टिकला नाही. महाराजांनी ५ घावात चंद्रराव मोरे यास यमसदनी धाडले. घटना कळताच चंद्रराव मोरे याचा एकमेव बंधू कृष्णाजी मोरे हे त्याठिकाणी आले. व त्यांनी महाराजांसमोर शरणागती पत्करली.
कृष्णाजी:- "राजे, जी चूक आमच्या बंधुराजांनी केली ती आम्हास करावयाची नाही.. आपला विचार थोर होता.. तो चंद्ररावास समजला नाही."
असे म्हणताच छत्रपती शिवरायांनी कृष्णाजींना उठवले. व अभय दिले. व हिंदवी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतले. पुन्हा या जावळीवर कुणी हक्क दाखवू नये म्हणून शिवरायांनी "जावळी राज्याभिषेक" करून घेतला. हा राज्याभिषेक बऱ्याच जणांना माहीत नाही. व ते जावळीचे राजे झाले. मात्र राज्याभिषेक करण्याआधी विधिवत विवाह करणे अनिवार्य होते. त्यामुळे त्यांनी नेताजीरावांच्या इच्छेनुसार प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजीराव पालकर यांच्या पुतण्या पुतळाबाई पालकर यांच्याशी १६५६ साली जावळी येथे ४ था विवाह करावा लागला. तेव्हापासून छत्रपती शिवराय नेताजीरावांचे जावई झाले.
तसेच रायरीवर भगवा फडकवला. व हिरोजी इंदुलकर यांना गडाची पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले. त्यांनी या किल्ल्याचे नाव "रायगड" असे ठेवले. रायरीचा किल्ला जिंकताच छत्रपती शिवराय व सरसेनापती नेताजीराव पालकर यांनी मिळून जावळी प्रांतातील अर्नाळा, कर्नाळा, मुरूड, जावळी व सुधागड असे एका मागून एक किल्ले जिंकून घेतले. व संपूर्ण जावळी प्रांत हिंदवी स्वराज्यात दाखल केला. आणि चंद्रराव मोरे यांचे बंधू कृष्णाजी मोरे यांना जावळी प्रांताचे सुभेदार बनवले.
आदिलशहा पुरता चवताळला. एवढंच काय तर चंद्रराव मोरे याच्या वधामुळे त्याला फार मोठा धक्का बसला.जावळी प्रांत तर स्वराज्यात आणला होता.मोऱ्यांची मोगलाई महाराजांनी मोडून काढली होती. मात्र रायगडावरून फरार झालेला चंद्रराव मोरे याचा भाऊ हणमंतराव मोरे हा जावळीच्या जंगलात जाऊन बसला होता. तो अजून जावळीतच होता. तो जावळी मधल्या रयतेला वरचेवर त्रास देत होता. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली. राजे त्या वेळेस रायगडावर वास्तव्याला होते. तसेच त्यांनी संभाजी कावजी कोंढाळकर यांना गडावर बोलावले. कावजी म्हणाले, राजे आज्ञा करा जातो आणि त्या हणमंतरावाचा निकाल लावून येतो. महाराजांचं दर्शन घेऊन १६५६ ला अवघे ५० मावळे घेऊन कावजी कोंढाळकर हे जावळीच्या जंगलात गेले. त्याच्या ६०-७० गनिमाच्या फौजेवर संभाजी कावजी व ५० मावळे तुटून पडले. व जंगलात युद्ध सुरू झालं. थोडक्यात संभाजी कावजी यांनी जावळीची २ री मोहीमच हातात घेतली होती. या लढाईमुळे जावळीच्या जंगलातले पशु पक्षी सुध्दा घाबरून गेले होते. जणू वाघ, सिंहांना सुध्दा धडकी भरली होती. बघता बघता संभाजी कावजी यांनी सगळी फौज भस्मसात करून टाकली. व ते हणमंतराव मोरे वर चाल करून गेले. मात्र त्या हणमंतरावाने संभाजी कावजींच्या हातावर तुर्या दिल्या व त्याने जावळीच्या जंगलातून पळ काढला. संभाजी कावजी व आपले ५० मावळे त्याचा शोध घेऊ लागले. जवळ जवळ १ महिना शोधमोहीम सुरू होती. स्वतः गुप्तहेर बहिर्जी नाईक हे देखील त्याच्या शोधात होते.मात्र हणमंतराव मोरे अजून कावजी यांना सापडला नव्हता. त्याचा वध करण्याआधी महाराजांना तोंड दाखवन ही चुकीची गोष्ट होती. मात्र शेवटी वाईच्या परिसरात हा हणमंतराव मोरे संभाजी कावजी यांच्या नजरेस पडला. तो दिसता क्षणी संभाजी कावजी यांनी त्याच्यावर झडप घातली. आणि त्याला ठार केलं. ठरल्याप्रमाणे जावळीतल्या मोऱ्यांची वळवळणारी शेपटी संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापून काढली. आणि ते महाराजांच्या दर्शनास रायगडावर गेले. संभाजी कावजी यांना पाहून राजांना आनंद झाला. घडलेली सर्व हकीकत संभाजी कावजी यांच्या तुकडीतील ५० मावळ्यांनी महाराजांना सांगितली. ही "जावळीची २ री मोहिम" ठरली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...