विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग 10

 












मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग 10
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
जावळी मोहिमेचा आढावा
शिवरायांनी जावळी घेण्याचा अतिशय धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते. जावळी घेतल्यावर त्यांना कोकणातली थेट वाट प्राप्त झाली. त्याच्या छोट्या सैन्याला व वेगवान हलचालींना अनुकूल आणि आदिलशाही व मुघलांसारख्या भल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकूल असा मोठा प्रदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधायला घेतला. फक्त तीन वर्षांनी त्याच ठिकाणी राजे अफजलवध करणार होते .
जावळी जिंकल्यावर लगेच प्रभावळीच्या सूर्यराव सुर्व्यांनी कोकणात शिवरायांची सत्ता मान्य केली. ह्यामुळे शिवरायांचा मुलुख आणखी वाढला. जंजीरेकर सिद्दीही आता शिवरायांचा शेजारी झाला. शिवरायांनी रायरीही जिंकला होता त्याचाच पुढे रायगड झाला, मराठा साम्राज्याची राजधानी. ह्या एका चालीने राजांना पुणे व आसपासच्या परिसराहून कितीतरी मोठ्या प्रदेशाचा मानकरी केले. ह्या चालीनंतर राजांना त्याच्या शेजाऱ्यांकडूनही मान मिळायला लागला.
याशिवाय अजून एक फायदा असा होता की कोकणातील दाभोळ बंदरातुन जो माल विजापुरला जाई तो पारघाटाने वा हातलोट घाटाने जावळीमार्गे जात असे. त्यामुळे एकतर या मालावरची जकात आता महाराजांना मिळणार होती आणि दुसरं असं कि विजापूरला आर्थिकदृष्ट्या जखडून टाकण्याचा तो एक डाव असावा. त्यामुळे बाहेरच्या देशांशी विजापुरचा जो व्यापार दाभोळ बंदरातून चाले त्यावर काही प्रमाणात नियंत्रण हे महाराज ठेवू शकत होते.
जावळीतून रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला जो आजही अतिशय दाट व भयंकर अरण्यात लपलेला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवरायांना प्रथमच मोठा समुद्रकिनारा लाभला. त्यामुळे आरमारावर लक्ष देणे त्याला अनिवार्य होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जावळी जिंकणे हे त्याच्यासाठी फार मोठे पाऊल होते. राजाच्या छोट्या जाहगीरीला ह्यामुळे छोट्या राज्याचे स्वरुप मिळाले.
जावळी मोहिमेचे महत्व
सन १६५६ मधे मुघलांनी कुतुबशाहीवर आक्रमण केले होते. ह्या वादळाचे लोट त्यांच्या प्रदेशात येऊ नयेत म्हणून आदिलशाहीनेही त्यांचे सैन्य कुतुबशाही सीमेवर ठेवले होते. हा भाग जावळीपासून कित्येक दूर होता. त्यामुळे मुघल किंवा आदिलशाहीला जावळीतल्या घडामोडींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. तसेच शिवरायांना मोरे व आदिलशाहीमधे उडालेल्या खटक्यांची माहिती होती. त्यामुळे तशी वेळ आली असती तर जावळीवरचे त्यांचे आक्रमण आदिलशाहीसाठीच केले होते असे कारणही राजे पुढे करु शकत होते .
शिवरायांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जावळीवर आक्रमण केले असे ठामपणे सांगता येत नाही पण निश्चितपणे ती वेळ सुयोग्य होती. जावळीवरचे आक्रमण सुरु करण्यापूर्वी शिवरायांनी संभाजी कावजीला हणमंतरावाकडे असलेल्या जोर खोऱ्यावर चालून जायला सांगितले होते. त्यामुळे तिथुन शिवरायांवर वार होणार नाही ह्याची त्यांनी आधीच काळजी घेतली होती. ह्यातून अचूक योजना करण्याचे व ती पार पाडण्याचे शिवरायांचे कौशल्य आपल्याला दिसते.
तळटीपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार
संदर्भग्रंथः-
१) जेधे शकावली
२) प्रतापगडदुर्गामहात्म्य
३) शि.च.सा.ख.-१०-पृ-५४
४) शाहू दफ्तर
५) स्वराज्याची सनद
६) मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
७) परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
८) प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
९) श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
१०) शककर्ते शिवराय - विजय देशमुख
११) श्री राजा शिवछत्रपती खंड १- बाबासाहेब पुरंदरे
१२ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
१३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन
१४) सातारा जिल्हा गॅझेटीयर
१५) पुणे जिल्हा गॅझेटीयर
१६) श्री रोहित पवार, अनुप बोकील, दिलीप वाटवे, समीर पटेल, श्रीकांत लव्हटे यांचे लेखन
१७) http://gadkot.in हा ब्लॉग
१८) https://rajeshivchhatrapati.wordpress.com हा ब्लॉग

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...