भाग 9
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
चंद्रराव
व शिवाजी महाराज जावळीतून रायरीस कोणत्या मार्गाने गेले याविषयी कोंढवी
परगण्याच्या करिन्यात व हकीगतीत आलेल्या उल्लेखांचा गरजेपुरता भाग असा:
"...
नंतर खासे सिवाजी माहाराज स्वारी करून माहाबलश्वरास आले. तेथे लोकांचा
जमाव करून निसणीचे मार्गे उतरून जावलीस आले. हे वर्तमान यैकोन मोरे याचे
लेक व भाऊ पळून कुमठ्यास गेले. तेथून कुडपण वरून कोतवालचे सरीने उतरून
कसेडीवरून सोलापशाचे खिंडीने सेडावच्या डोहावरून रायगडचे घलकीस गेले. तेथे
बल धरून राहिले. त्याच्या सोधास सिवाजी माहाराज आंबानळीचे घाटे उतरून
वाकणास बागराव याचे सोधास आले. तो त्ये हि पलाले ते त्येथून माहाराज
बाजीर्यातून घलगीस जाऊन वेढा घालून भांडू लागले."
जेधे शकावलीत चंद्ररावाच्या शरणागतीची नोंद सापडते. ती पुढीलप्रमाणे:
"वैशाख
मासी [ १५ एप्रिल ते १४ मे, १६५६ ] राजश्री सिवाजी राजे यांणी रायरी
घेतली. समागमे कान्होजी जेधे, देशमुख, तर्फ भोर व बांदल व सिलिंबकर देशमुख
व मावळचा जमाव होता. हैबतराऊ व बालाजी नाईक सिलिंबकर यांणी मध्यस्थी करून
चंदरराऊ किलियाखाली उतरले."
शिवभारतातील उल्लेखानुसार, चंद्ररावाला व त्याच्या कृष्णाजी व बाजी या
मुलांना महाराजांनी कैदेत ठेवले. यानंतर नेमके काय घडले याची संगतवार हकीगत
कोणत्याच समकालीन साधनात दिलेली नाही. परंतु शरण आल्यावर ४-५ महिन्यात
चंद्ररावाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाराजांनी त्याला व
कृष्णाजीला ठार केले आणि बाजी मात्र वाचला याला एक पुरावा आहे.
मिर्झाराजाने औरंजेबास पाठविलेले २८ किंवा २९ मार्च १६६५ चे एक पत्र उपलब्ध
आहे त्यानुसार इ. स. १६६५ मध्ये बाजी चंद्रराव हा जिवंत तर होताच पण
मुक्त देखील होता असे अनुमान करता येते. महाराजांनी जावळी काबीज करून कैद
केल्यानंतर येसाजी चंद्रराव व त्याचा मुलगा कृष्णाजी हे जिवंत असल्याचे
उल्लेख कोणत्याच साधनांत आढळत नाहीत. त्यावरून येसाजीस व त्याचा मुलगा
कृष्णाजी यास महाराजांनी ठार मारले असावे असे दिसते. ] एकंदरीत मोऱ्यांची
वारंवार होणारी हरामखोरी आणि बेईमानी यामुळे महाराजांनी त्यांना दंडित
केले.
जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले
स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या
डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो
(प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या
डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड
बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी
ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या
याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.
जावळी घेतल्यावर महाराजांनी तिथे किल्ला बांधून त्याला प्रतापगड असे
नाव दिले असे मराठी बखरींमध्ये आणि इतर काही उत्तरकालीन साधनांवरून दिसून
येते. याविषयी चित्रे शकावलीत एक नोंद अशी दिली आहे:
"शके
१५७८ दुर्मुखी नाम संवत्सरे, [ इ. स. १६५६ - ५७ ] : सिवाजीराजे यांनी
भोरपा डोंगर यास इमारतकाम येडका बुरुजाजवळ लाविले. अर्जोजी यादव, हवालदार,
इमारत ऊर्फ प्रतापगड."
जावळी
सुभ्यातील सालोशी या गावाविषयीच्या एका निवाड्याचा २२ डिसेंबर १६५७ सालचा
एक महजर उपलब्ध आहे. त्या निवाड्याच्या वेळी हजार असलेल्या व्यक्तींची
यादी महजराच्या सुरुवातीस दिली आहे. तिच्यात "गणोजी गोविंद, हवालदार,
किल्ले प्रतापगड" असे एक नाव आहे. याचाच अर्थ, २२ डिसेंबर १६५७ च्या आधी
किल्ल्याला प्रतापगड हे नाव दिलेले होते व तिथे हवालदाराची देखील नेमणूक
केली होती.
चंद्रराव मोर्यांशी झालेल्या संघर्षाची कारणे :-
१)
स्वराज्याच्या प्रयत्नात सर्वांचेच सहकार्य आवश्यक होते आणि त्याकरिता
जहागीरदार मध्ये युती निर्माण करण्याचे प्रयत्न शिवरायांनी चालविले
होते.त्यानुसार मावळ प्रांतत युती घडून आलेली होती. परंतु निरा आणि कृष्णा
या प्रदेशातील जहागिरदार यांत एकजूट होऊ नये असेच प्रयत्न चंद्रराव मोरे
याने चालविले होते. यांतून शिवाजी राजे व मोरे यांच्यात संघर्ष निर्माण
झाला.
२)
शिवाजी महाराजांच्या जहागिरीतून पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना
चंद्रराव मोरे याने आपल्या जहागिरीत उघडपणे आश्रय दिला. चंद्ररावाची ही
आगळीक शिवाजी राजे सहन करणे शक्य नव्हते.
३)
शिवरायांना ताबडतोब मोगलांवर किंवा आदिलशहावर हल्ला चढवायचे नव्हता,तरी
पुढेमागे असा संघर्ष होणारच याबत त्यांना खात्री होती. तसे झाल्यास
जावळीच्या प्रदेशाचा उत्तम उपयोग करून घेण्यासारखा होता. त्याठिकाणी लष्करी
तळ स्थापन करणे अत्यंत सोपे होते.
४)
जावळी जिंकून घेण्याकरिता दक्षिणेतील राजकीय स्थिती सुद्धा अनुकूल
होती.मोहम्मद अदिलंशहा हा मृत्यूशय्येवर पडला होता आणि त्याच्या दरबारात
विविध कारस्थानांना नुसता ऊत आलेला होता वाई प्रांताचा सामर्थ्यशाली
सुभेदार अफजलखान हा देखील नुकताच कर्नाटकाच्या स्वारीवर गेलेला होता.
दक्षिणेतील सुभ्यावार राजपुत्र औरंगजेब यांची सुभेदार म्हणून नुकतीच नेमणूक
झालेली होती.तो जावळीच्या स्वारी विषयी उदासीन होता शिवाजीं राजांनी या
सर्व राजकीय परिस्थितीचा जावळी येथील स्वरीकरिता उपयोग करून घेतला.
४)
चंद्रराव मोरे यांचा पाडाव करण्याची सर्वांत प्रमुख कारण म्हणजे तो
शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाच्या आड येत होता हे होय. जे
जे मराठी जागीरदार स्वराज्यस्थापनेच्या आड येतील त्यांना वठणीवर आणायचे हे
शिवाजीने ठरवून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर सभासद बखरीमध्ये "चंद्रराव
मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही" हे शिवाजीराजांच्या तोंडचे वाक्य
अतिशय अर्थपूर्ण आहे, असे समजले पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्याकरिता
जावळी घेणे अत्यंत आवश्यक होते हेच यावरून दिसून येते.
५)
दौलतराव मोरे यांच्या मृत्यू झाल्यानंतर चंद्रराव किताब आपल्याला मिळावा
म्हणून मोरे घराण्यातील अनेकांनी प्रयत्न चालविले होते. परंतु
दौलतरावाच्या पत्नीला मोरे घराण्यातील खरा वारस यशवंतराव यालाच वारस म्हणून
निवडायची होते. तिने शिवाजी राजाना मदतीची विनंती केली आणि त्यामुळे
यशवंतरावांना वारसाहक्क मिळू शकला. शिवाजी महाराजांचा हा उपकार न जाणता
यशवंतराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव हे दोघेही अफजलखानाला जाऊन मिळाले
आणि शिवाजी राजांविरुद्ध नाना प्रकारची कारस्थाने करू लागली. या
विश्वासघाताचा सूड म्हणून शिवाजी राजांनी जावळीवर स्वारी करण्याचा निश्चय
केला.
६)
शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्याकरता म्हणून आदिलशाही दरबाराने शामराज या
सरदारास प्रचंड फौज घेऊन पाठविले. त्यावेळी त्याला चंद्रराव मोरे याने
सर्व प्रकारे सहाय्य केले. पलीकडे अचानक हल्ला चढवून शिवाजी महाराजांनी जरी
श्यामराजचा पराभव केला तरी चंद्रराव मोरे यांच्या विश्वासघाती पणा शिवाजी
राजे कधीच विसरला नाहीत आणि म्हणूनच शिवाजी राजांनी जावळी जिंकण्याचा
दृढनिश्चय केला.
No comments:
Post a Comment