विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग 3

 





मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग 3
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
जावळी परिसरातील किल्ले, घाटवाटा आणि प्रमुख गावांचा नकाशा
जावळी परिसरातील घनदाट जंगल
जावळीतील समाधी
मोरेंच्या जावळीचे दक्षीण टोक ,हातलोट घाट व मधुमकरंदगड
जावळीतील अभेद्य दुर्ग, किल्ले प्रतापगड
पण मग जावळीचा मुलूख म्हणजे आजचे कुठले तालुके किंवा गावं सांगता येतील? जर नकाशावर वर pin point करायची झाली तर नेमकी ठिकाणं कुठली दाखवता येऊ शकतात? या विषयी ऐतिहासिक कागदपत्रात कुठे काही उल्लेख सापडतात काय? याबाबतीत शोध घेतला असता कुर्डुगडाला पासलकर आणि मोरे यांच्यात लढाई झाली होती आणि कुर्डुगड हा ताम्हीणी घाटाजवळ आहे म्हणून ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाट दरम्यान जावळीचं खोरं येत असावं. मावळाला लागुन खाली कोकणातील काही भाग मोरेंच्या अधिपत्याखाली येत असावा. मावळातल्या देशमुखात आणि मोरेंच्यात कायम कुरबुरी चालत असत. अफजलखान प्रकरणाच्या वेळी मोरेंची तक्रार गुंजन मावळातल्या हैबतराव शिळीमकरांनी केली होती.
एल्फिन्स्टन पॉईंट येथून दिसणारा सहय कडा. किल्ले कांगोरी, चंद्रगड, दुर्गाडी, तोरणा, राजगड
याविषयी अजून काही भौगोलिक माहिती मिळती आहे काय याबद्दल शोध घेतल्यावर जावळी सुभा हा घाटावर आणि कोकणात असा दोन्ही भागात येतो अशी माहिती मिळाली. शाहू दफ्तरात (४) या सुभ्यांच्या याद्याच दिलेल्या आहेत. तसेच संक्राजी मल्हार याने स्वराज्याच्या सनदेमधे (५) जावळी प्रांताच्या तर्फांची यादी दिलेली आहे. त्यावरून हा प्रांत सिद्ध केला आहे.
यात एकूण अठरा तर्फा आहेत. त्या अशा...
१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.
२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.
३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.
४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.
म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं मोरेंच्या अधिपत्याखाली येत होती.
सुभा*, तर्फ ही नावं जरा जड वाटतात ना? थोडं सोपं करून सांगतो.
प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा*. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४. आणि तर्फ* म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.
म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.
खरंतर शाहू दप्तरात या सगळ्या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे सुभे सांगितले आहेत त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असणार, म्हणजे त्या ठिकाणी मोरेंचे राहते वाडे असायलाच हवेत. बरं त्याचं ठिकाण, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. आजूबाजूला सैन्य मुक्काम करू शकेल, दारूगोळा ठेवता येईल अशा जागाही असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा.
उदाहरणादाखल असं सांगता येऊ शकेल कि शिवथरघळीच्या वरच्या बाजूला चेराववाडीच्या हद्दीत मोरेंचा वाडा आहे. पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे.
प्रत्येक सुभ्यात एक एक मोरे व्यवहार/ राज्य करीत असे. (अफजलखान प्रकरणानंतर जावळीचे मोरे रायरीच्या मोऱ्यांच्या आश्रयास गेले होते. ) ते एकमेकांचे नातेवाईक असुनही त्यांच्यात भाऊबंदकी नक्कीच होती.
एकूणच काय तर महाराजांना जावळीची अभेद्य जागा हवीच होती आणि त्यासाठी एक कारणही हवंच होतं, मग ते कोणतंही का असेना.
किल्ले रायरी ते किल्ले खेळणा? आणि कोयना काठ ते सांप्रतचा मुंबई-गोवा महामार्ग हा जावळीचा आद्य मुलुख आहे. त्या मुलखात...
१) शिवथर - यशवंतराव
२) जोर - हणमंतराव
३) जांभळी - गोविंदराव
४) महिपतगड - दौलतराव
५) केवनाळे व वाकण - बागराव
६) आटेगांव तर्फेतील देवळी - सूर्यराव
७) देवळी - भिकाजीराव
८) खेळणा - शंकरराव
हे आठ अनभिषिक्त मोरे घराण्यांतील आद्य राजे राज्य करीत होते. (६)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...