विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग 5

 


मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग 5
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
शिवाजी राजांचा जावळी प्रांतात हस्तक्षेपः-
या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता.सन १६४७ साली दौलतराव मोरे निपुत्रिक वारला, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते. महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले. आता नवा 'चंद्रराव' नेमण्याचा अधिकार आदिलशाहीचा. परंतु, दौलतरावाची आई माणकाईने परस्परच शिवथरच्या यशवंतराव मोरेच्या वंशातील कृष्णाजी बाजीला दत्तक घेतले व त्याची चंद्रराव पदावर स्थापना केली. मोरे घराण्यातील काहींचा याला विरोध होता. माणकाईने शिवाजीराजांकडे सहकार्य मागितले. राजांनी कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला आपला पाठिंबा दिला. शिवाजीराजे व कृष्णाजी बाजी यांच्याविरुद्ध विजापूर दरबारात तक्रारी गुदरल्या गेल्या. परंतु फत्तेखानाचा पराभव, दिल्ल्लीचे समकालीन राजकारण, शहाजीराजेंची अटक व सुटका या सर्वांमुळे जावळी प्रकरणात आदिलशहाने लक्ष घातले नाही.
सन १६४९ साली अफजलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. जावळी भाग हा वाई प्रांतात येतो. अफजलखानाने नव्या चंद्ररावाची नेमणूक गैर ठरवली. आणि कान्होजी जेधे यांना जावळीवर हल्ला करण्याचा हुकूम दिला. परंतु जावळीवर चालून जावे तर शिवाजीमहाराजांनी जमविलेले राजकारण विस्कटले जाईल आणि हल्ला नाही करावा तर विजापूर दरबारी आपली निष्ठा नाही हे अफजलखानाला समजेल अशा दुहेरी कात्रीत सापडले. कान्होजींनी शिवाजी महाराजांना सल्ला विचारला. महाराजांनी कान्होजींना खानाशी बोलणे करण्याचा सल्ला दिला. कान्हाजींनी आपले हेजीब आबाजीपंतांना खानाकडे पाठविले व आपल्या अटी कळविल्या. या वाटाघाटी बराच काळ चालू राहिल्या. त्याकाळात दक्षिणेत छोट्या छोट्या राजांनी पुन्हा उठाव चालू केले. परिणामी आदिलशहाने अफजलखानाला वाईहून परत बोलविले आणि कर्नाटकात मोहिमेवर पाठविले.सन १६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे असलेल्या वाई परगण्यातला होता.
हणमंतरावाकडून जोर खोरे घेण्यासाठी अफजलखानने केलेली चाल पुढे सरकली नाही. ह्यानंतर मोरे घराण्याच्या हलचालींमुळे शिवरायांच्या मुलुखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला. मोरे त्याचे शेजारीच असल्याने त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते.
इ.स. १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला. शिवाजी महाराजांसारखा महत्वाकांक्षी राजा शेजारी असल्याने एकतर चंद्ररावाला त्यांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार किंवा आज ना उद्या त्या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघडच होते. माणकाईने येसाजीस दत्तक घेतले व जावळीच्या चंद्रराव पदावर बसण्यासाठी महाराजांची मदत घेतली, त्यामुळे येसाजीने आपल्या सांगण्याप्रमाणे वागावे अशी महाराजांची अपेक्षा असणे चूक नव्हते. परंतु तसे करण्यास चंद्रराव तयार नसल्याने महाराज व चंद्रराव यांच्यात वितुष्ट आले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...