विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग 6

 




मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग 6
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
शिवाजी राजांचा जावळी प्रांतात हस्तक्षेपः-------2
१६५६ नंतर जावळीचे प्रकरण पुन्हा रंगले. राजांनीच कृष्णाजी मोरेची चंद्रराव पदावर स्थापना केली व अफजलखान जेव्हा हि व्यवस्था मोडू लागला तेव्हा राजकारण करून त्यांनी या चंद्ररावाला वाचविले होते. परंतु काही काळाने तो हे सर्व विसरला आणि उन्मत्त झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,
१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.
२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.
३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.
४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकर यांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.
एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो.
त्या पत्रात महाराज लिहितात.
"तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूनें राज्य दिधलें आहे तर तुम्ही राजे न म्हणावें. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून बंद कराल, तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवुं."
उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले कि, "तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरी कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितों. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."
चंद्रराव मोऱ्याचे हे उर्मट उत्तर ऐकून महाराज परम संतप्त झाले. त्यांनी मोऱ्याला अखेरचे एक पत्र पाठविले. त्यात ते म्हणतात,
"जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल."
या पत्रानेही चंद्ररावाचे डोळे उघडले नाहीत. स्वतःच्या बळाचा अतिरेकी अभिमान चंद्ररावाने महाराजांना पुन्हा डिवचून लिहिले, "दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."
समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.
लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-
"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."
शिवरायांनी चंद्ररावला लिहीले होते की त्याने राजे ही पदवी वापरु नये व शिवरायांशी इमान राखावा. हा उल्लेख मोरे बखरीमधे सापडतो. ह्यावर चंद्ररावाच्या उत्तराने शिवरायांबरोबरचे संबंध धोक्यात आणले. त्यामुळे हे स्पष्ट होते की शिवरायांचे जावळीवरचे आक्रमण मुख्यतः राजकारणासाठीच होते. सभासद बखरीत शिवरायांच्या जावळी युद्धाचे कारण स्पष्ट होते ...
चंद्रराव मोरे यांस मारल्याविरहित राज्य साधत नाही ।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...