भाग 8
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
मुरारबाजी देशपांडे
चंद्रराव
मोऱ्याकडून प्रतापराव मोरे, हणमंतराव मोरे, मुरारबाजी देशपांडे हे सर्व
महाराजांच्या सैन्याशी ठिकठिकाणी झुंजू लागले. परंतु महाराजांच्या बळापुढे
चंद्ररावाचे बळ तोडके पडू लागले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी
बराच वेळ लढविली. पण अखेर त्याला माघार घ्यावी लागली. तो आपल्या
बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. तो
दिवस होता मन्मथ नाम संवत्सर शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी म्हणजे मंगळवार
१५ जानेवारी १६५६.
जावळीचे व्यवस्था नीट लावल्यानंतर महाराज रायरीकडे निघाले.
चंद्ररावाने सुमारे १ महिना किल्ला झुंजविला, पण त्याचे बळ अपुरे होते.
अखेर शिलिमकरांनी मध्यस्थी केली व चंद्ररावास रायरीच्या खाली उतरविले. आता
रायरीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी मोऱ्यांचा बहोत मान
केला. त्यांना घोडा, शिरपावं, रुमाल दिला. महाराजांनी मोऱ्यांशी वाटाघाटी
आरंभिल्या. मोऱ्यांच्या पदरी असणाऱ्या मुरारबाजी व त्यांच्या चार बंधुंना
आपल्या पदरी घेतले.
महाराजांची इच्छा होती कि मोऱ्यांजवळ जुजबी शिबंदी ठेऊन त्याची जावळी
परत करावी. आपले नोकर म्हणून त्यास स्थापावे. वरकरणी चंद्ररावाने
महाराजांचा सल्ला मानतो असे दाखिवले पण त्याचवेळी गुप्तपणे मुधोळकर
घोरपड्यांना सुटकेसाठी चोरून पत्रे लिहिली. त्याच्या दुर्दैवाने हि पत्रे
महाराजांच्या हेरांच्या हाती लागली.
चंद्ररावाची हरामखोरी कळताच महाराज विलक्षण संतापले. बहुदा त्याचवेळी
चंद्रराव कैदेतून निसटला पण पुन्हा पकडले जाऊन त्याला महाराजांसमोर सादर
केले गेले. महाराज विलक्षण चिडलेले होते. बेईमानी केल्याबद्दल चंद्ररावाची
गर्दन मारण्याचा हुकूम महाराजांनी दिला. चंद्ररावाचा मुलगा बाजी पळून
गेल्यामुळे हाती सापडला नाही. पुढे हा मिर्झाराजे जयसिंगांना सामील
झाल्याचे कळते. चंद्ररावाचा शिरच्छेद झाला व जावळीवरील त्यांचे आठ
पिढ्यांचे राज्य संपले.
[ तळटिपः- जावळीवरील स्वारीसंदर्भात मोऱ्यांच्या बखरीत दिलेला
चंद्रराव आणि शिवाजी महाराज यांच्यातला जो पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे तो
सर्व कपोलकल्पित आहे. अशी पत्रे देखील उपलब्ध नाहीत आणि अशा प्रकारचे
संभाषण झाल्याचा उल्लेख अन्य कोठेही सापडत नाही. मोऱ्यांची बखर
लिहिणाऱ्याला चंद्ररावाचे साधे व्यक्तिनाम देखील ठाऊक नव्हते, त्याला इतके
बारकावे कुठून माहित असणार? तेव्हा तो सर्व त्याने कल्पनेनेच रंगविलेला
आहे हे उघड आहे.
जेधे शकावलीत तिथी दिलेली नाही मात्र शिवापूर शकावलीत पुढील नोंद आहे.
"शके १५७७ मन्मथनाम संवत्सरे, पौष वद्य १४ [ १५ जानेवारी १६५६ ] : [ शिवाजीराजे यांनी ] जावळी घेतली."
चंद्ररावाने
पळून जाऊन रायरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला. महाराजांनी बहुधा त्याच्या
पाठलागावर काही सैन्य पाठवले असेल पण ते स्वत: नंतरचे अडीच महिने जावळीस
राहिले. कारण शके १५७८ च्या चैत्र शुद्ध १५ ला, म्हणजे ३० मार्च १६५६
रोजी, महाराज जावळीहून निघाले आणि चैत्र वद्य सप्तमीस, म्हणजे ६ एप्रिल
१६५६ रोजी, रायरीस पोचले अशा नोंदी शिवापूर शकावलीत आहेत.
शिवकाव्यात आलेल्या वर्णनावरून, चंद्ररावाच्या उरलेल्या सर्व
सैन्याचा बिमोड करण्यासाठी महाराज एवढा वेळ जावळीत थांबले होते असे दिसून
येते. शिवकाव्यातील वर्णनानुसार, खासा चंद्रराव पळाल्यानंतर सुद्धा
त्याच्या सैन्याने गनिमी काव्याने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले चालू
ठेवले होते. चोऱ्या करणे, रसद तोडणे, इ. मार्गांनी त्रस्त केले होते.
कपटनीतीचा अवलंब करीत एका रात्री चंद्ररावाचे सर्व सैन्य झोपेत असतांना
मराठ्यांनी सर्वांना कापून काढले. दरम्यानच्या काळात महाराजांचे सैन्य
रायरीला वेढा घालून बसले असेल. स्वत: महाराज ३० मार्च १६५६ रोजी जावळीतून
निघाले व ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीला पोचले. त्यानंतर लवकरच चंद्रराव शरण
आला. परंतु असा उल्लेख अन्य कशात आला नसल्याने हे कितपत विश्वसनीय आहे ते
सांगू शकत नाही.
No comments:
Post a Comment