वाकाटकांचे राज्यशासन.
वाकाटकांच्या नंदिवर्धन आणि वत्सगूल्म या दोन शाखांच्या अमलाखाली उत्तरेस नर्मदे पासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत तर पश्चिमेस ऋषिकाच्या ( खान्देशच्या ) पूर्व सीमेपासून दक्षिण कोसलच्या पश्चिम सीमेपर्यंतचा प्रदेश होता. या विस्तृत प्रदेशाचे राष्ट्र किंवा राज्य या नावाचे विभाग पाडले होते. उदा. बेल्लोरा ताम्रपटात पाक्कण राष्ट्राचा, चम्मक ताम्रपटात भोजकट राज्याचा निर्देश आहे. या राज्यांचे वा राष्ट्रांचे सध्याच्या जिल्ह्यांप्रमाणे पोट विभाग असत. त्यांना ‘विषय‘ अशी संज्ञा असे. उदा. मेकला देशाच्या उत्तर राष्ट्र नामक विभागात असलेल्या पंचगर्ता विषयाचा उल्लेख बम्हनी ताम्रपटात आला आहे. या विषयांच्या नावांच्या शेवटी सामान्यतः ' कट ' किंवा ' कटक ' हा शब्द दिसतो. उदा. भोजकट, वेन्नाकट इ. एखादा विषय फार मोठा असल्यास त्याचे दिशांस अनुलक्षून लहान लहान भाग पाडले जात. त्यांना ‘आहार’ आणि ‘भोग’ किंवा ‘भुक्ती’ असे म्हणत. या तिघांचा एकमेकांशी असलेला संबंध काय होता हे आज सांगता येत नसले तरी अनेक ताम्रपटात त्यांचे उल्लेख आलेले आहेत. उदा. लोहनगरभोग, हिरण्यपुरभोग, तसेच ‘असिभुक्ती’ या एका भुक्तीचा उल्लेख आलेला आहे. या भोग किंवा भुक्ती विभागात नगरे, उपनगरे, गावे असत. नगरांच्या आणि उपनगराच्या शेवटी पुर किंवा नगर असा शब्द असे. उदा. अश्र्वत्थनगर, हिरण्यपुर इ. नवीन नगरांची नावे बहुदा ती वसविणार्याच्या नावावरून ठेवली जात. उदा. द्वितीय प्रवरसेनाने वसविलेल्या नगराचे नाव प्रवरपुर होते. लहान गावांच्या नावांच्या मागे ग्राम ( शिर्षग्राम, मंदुकिग्रम), खेट किंवा खेटक ( वरदाखेट, आश्र्वाठखेटक) ' वाटक' ( बोथिक वाटक), आणि विरक यापैकी एखादा शब्द असे.
सातवाहन काळातील नावे ही प्राकृतमध्ये होती. मात्र वाकाटक काळात संस्कृतचा वापर वाढल्याने येथील नावे ही संस्कृत मध्ये ठेवलेली दिसतात. उदा. अजिंठ्याची लेणी ज्या पर्वतराजी मध्ये आहे त्या सातमाळा पर्वतरांगेवर ' सह्यपाद ' असे म्हटले आहे. तर काही नद्यांची देखील नावे बदललेली दिसतात. आज जीचे नाव वांना आहे तिचा उल्लेख उमा असा आलेला आहे.
वाकाटकांच्या काळी इतर देशांच्या प्रमाणे विदर्भातही राजसत्ताक पद्धती चालत असे. राजाच्या हाती मुख्य सत्ता असे पण त्या सत्तेला स्मृतीतील नियमांचे नियंत्रण असे. वाकाटकांच्या लेखात मंत्री परिषदेचा कोणताही उल्लेख नाही. मात्र त्या काळातील राज्यकारभार स्वेच्छेनुसार वा जुलमी होता असे नाही. धर्मशास्त्राने आणि अर्थशास्त्राने भारतीय राजांना लोककल्याणकारी राज्याचे धेय्य सदैव उपदेशिले होते. कालिदासासारख्या संस्कृत कवींनी आपल्या काव्यात, नाटकात याच गोष्टींचा पुरस्कार केलेला दिसतो.
वाकाटकांनी हेच ध्येय कृतीत आणायचा प्रयत्न केलेला होता असे दिसते. सर्व राजांच्या शासनाविषयी माहिती नसली तरी पृथ्वीषेण आणि शेवटचा हरिषेण यांचे वर्णन लेखांमध्ये अत्यंत बुद्धिवान, शूर, राजनितीनिपूण असे आलेले आहेत. त्या काळात उत्तर भारतातील कुशाण व गुप्त राजांनी परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर अश्या अत्युच्च पदव्या धारण केलेल्या दिसतात. मात्र वाकाटक राजे हे स्वतंत्र असेल तरी त्यांनी राजन किंवा महाराज या पेक्षा उच्चतम पदवीचा अभिलाष धरला नाही तसेच त्यांनी आपण देवाचे अवतार आहोत असेही कधी म्हटले नाही. आपणास आपल्या ईस्ट देवतेच्या कृपाप्रसादाने राज्यलक्ष्मी प्राप्त झाली अशी त्यांची श्रद्धा होती.
वाकाटकांच्या शासनपध्दती विषयी आपणास जास्त माहिती मिळत नाही. गुप्तांच्या दानपत्रात व ताम्रपटांच्या लेखात त्यांच्या राण्यांचे उल्लेख आलेले आहेत मात्र वाकाटकांच्या दानपत्रात असे उल्लेख आलेले नाहीत. याला अपवाद फक्त दोनच राण्यांचे आहेत. द्वितीय रूद्रसेनाची अग्रमहिषी प्रभावतीगुप्ता आणि नरेंद्रसेनाची राज्ञी अज्झितभट्टारिका. यातील प्रभावतीगुप्ता ही अत्यंत कर्तबगार स्त्री असून तिने आपला अज्ञान मुलगा दिवाकरसेन याच्या नावाने तब्बल तेरा वर्षे राज्यकारभार केला.
राज्यकारभार करण्यासाठी अनेक मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांचे सहाय्य लागत असावे मात्र त्यांपैकी फारच थोड्याचा उल्लेख कोरीव लेखात येतो. अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेखात म्हटल्या प्रमाणे वाकाटकांचे सचिव हे आपल्या उत्कृष्ट शासनाच्या योगे प्रजाजनांना त्यांचे माता पिता वाटत. त्यांनी देशाचा कारभार न्यायाने चालवला.
आणि म्हणूनच वाकाटकांचे राज्यशासन हे कार्यक्षम असून त्यायोगे प्रजाजनांस समृद्धी, शांतता व सुव्यवस्था यांचा लाभ झाला.
या नंतर पूढील काही भागांत कलचुरी राजघराण्याची माहिती घेऊ.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
No comments:
Post a Comment