कलचुरी राजघराणे
भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये कलचुरी नृपतींचे स्थान अनेक दृष्टींनी वैशिष्ठ्य पूर्ण आहे. सन ५५० ते १७४० पर्यंत म्हणजे जवळ जवळ बाराशे वर्षे कलचुरी नृपती, उत्तर वा दक्षिण भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागावर राज्य करत होते. भारताच्या इतिहासात इतकी दीर्घकाळ टिकलेली दुसरी एकही राजवट माहीत नाही. दीर्घकालीन सत्तेसोबतच या वंशात अनेक थोर नृपती होऊन गेले. त्यांनी विस्तृत साम्राज्ये स्थापिली, इतकेच नाही तर विद्या, धर्म व कला यांना राजाश्रय देऊन आपली किर्ती पसरवली.
त्यांची स्वतःची आणि आश्रय दिलेल्या संस्कृत आणि प्राकृत कवींची काही काव्ये आणि सुभाषिते आजही अस्तित्वात आहेत. अनेक कविंना जसे गंगाधर, बिल्हण, वल्लण, कर्पुर यांना कलचुरी राजांनी आपल्या राजदरबारात मानाचे स्थान दिले होते. कलचुरि राजांनी उभारलेली मोठी मोठी देवालये आता अस्तित्वात नसली तरी मिळालेल्या अवशेषांवरून त्यांनी स्थापत्य व शिल्पकलेची गाठलेली उंची ठळकपणे दिसून येते. घारापुरी येथील लेणी सुद्धा याच कलचुरी राजवटी मध्ये कोरली गेली होती.
कलचुरी नृपतींनी आपला संबंध हैहयवंशाशी जोडलेला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे ते माहिष्मती नगरीत उदयास आले होते, आणि ही नगरी हैहय वंशी माहिष्मान् नामक राजाने वसवलेली होती. म्हणून तिला माहिष्मती असे नाव प्राप्त झाले. ( ही नगरी नक्की कोणती यात विद्वांनान मध्ये मतभेद आहेत.)
उत्तरेतील सततच्या आक्रमणांमुळे कलचुरी दक्षिणेत स्थलांतरित झालेले दिसतात. असे होत असताना त्यांच्या कालंजर, त्रिपुरी, प्रयाग, काशी, रत्नपुर, रायपूर या राजधान्या झाल्या, मात्र हे नृपती स्वतःला ‘ माहिष्मतीपुरवरेश्र्वर ‘ असेच बिरूद लावत.
बहुतेक कलचुरी राजे हे शैव उपासक असल्याने त्या काळात साहजिकच शैव पंथाचा परमोत्कर्ष झाला. शैव संप्रदायाच्या अनेक शाखा उत्पन्न झाल्या. शैव, पाशुपत, कारुक व सिद्धान्तमत असे त्यांना म्हणतात. यापैकी कलचुरींच्या राजवटीमध्ये पाशुपत शाखेची अधिक भरभराट झाली, कारण काही राजे हे पाशुपत पंथाचेच होते.
या सोबतच कलचुरी राजवंशाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे या राजांनी मुसलमानांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारतात बलाढ्य केंद्रसत्तेची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन उत्तर भारतात एकछत्री साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सिद्धीस गेला नाही. असे असले तरी काही काळासाठी हिंदूंना अत्यंत पवित्र असणारी काशी व प्रयाग ही दोन्ही धार्मिक स्थळे कलचुरींनी आपल्या ताब्यात घेतली होती.
कलचुरी घराण्यांच्या अनेक शाखा होत्या. त्यात माहिष्मतीचे कलचुरी, त्रिपुरीचे कलचुरी, रत्नपुरचे कलचुरी, शरयूपारचे कलचुरी इ. शाखा होत. रत्नपूरीचे कलचुरी हे भारतातील शेवटचे कलचुरी घराणे होय. त्यांची सत्ता छत्तीसगढच्या भागात होती. मात्र ती अत्यंत दुर्बल झालेली असल्याने राज्यातील अनेक संस्थानिक व अधिकाऱ्यांनी आपली आपली स्वतंत्र राज्ये स्थापिली होती. त्यांच्यावर राजाचा वचक नव्हता. अशा परिस्थितीत अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मराठ्यांनी छत्तीसगढवर आक्रमण केले. मराठ्यांना फारसा प्रतिकार झाला नाही. त्यांनी स्वारी करताच या लहान लहान संस्थानिकांनी मराठ्यांचे स्वामित्व स्वीकारले व दक्षिणेतील कलचुरी राज्याचा शेवट झाला.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment