विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 June 2023

गंगुकाका शिरवळकर

 


गंगुकाका शिरवळकर
सकाळचं पूजा, आन्हिक, देवदर्शन आटोपून पंत नुकतेच बसते झाले. आता जेवायची वेळ होत आली. तेवढ्यात दारातून हाक ऐकू आली. "पंत! "आहेत का घरात?" आवाज गावातल्या नेहमीच्या परिचिताचा होता. त्याने सांगितले,
"हे मला प्रल्हादबाबांचं घरं विचारत हुतं, म्हनून त्यास्नी तुमचे घरी गेवून आलो. काय काम हाय म्हनंत हुंत, हे बाबा."
त्यानं सोबतच्या गृहस्थाकडे तोंड केल, हात पंताकडं केला आणि म्हणाला,
"हे बाबांचं वंशज आता तुमचं काय काम हाये ते सांगा त्यास्नीच, मी जातो. तुमची गाठ घातली. माझं काम झालं. जयहरि."
त्याच्या सोबत गेले ४-७ दिवस ज्याला आपण पाहतोय, नित्य भोजनाला चला म्हणतोय, आणि प्रेमाने जो नाकारतोय, कारण विचारता भगवद्प्रसादास्तव मी अनुष्ठान मांडलेय, प्रसादाविना अन्नग्रहण करणार नाही म्हणतोय तोच ब्राह्मण आज आपले घर विचारत आलाय हे पाहिले आणि परशरामपंत जवळ जवळ तरा तरा पळतच अंगणात आले. दोघांचा एकमेकांना जय हरि झालां. पंतानी घरांत पानं घ्या म्हणून आदेशच सोडला.
आलेल्या अभ्यागताच त्यांनी स्वागत केलं. त्यांना हात पाय धुवायला पाणी दे म्हणून घरगड्याला सांगितले. पाहुण्यांनी हात पाय धुतले. गड्याच्या हातचे उपरणे घेवून पुसले. बैठकीवर येवून बसले. तोवर पंतांनी गुळखड्याची वाटी आणि पाण्याचा तांब्या समोर ठेवला. बोलले.
"आता जेवायची वेळं झालीय. थोडं खावा. मग तुमचं कामाचे पाहू! "
"कोण आपण? कुठले? "
पाहुणा विनयानं म्हणाला,
"नाही, मी भोजन नाही करणार." "प्रसादाविना भोजन नाही हे मी तुम्हाला काल परवाच्या भेटीतच सांगितलेय."
"आधी प्रसाद द्या मग जेवेन."
"मी गार गावच्या बल्लाळ क्षीरसागराचा पुत्र गंगाधर. धामधुमीत शिरवळास आलो. आम्ही ऋग्वेदी ब्राह्मण. भावंडात मी ८ वा. मात्यापित्याला वय उलटत चालले तरी अपत्य नाही. त्या विवंचनेत असतानाच एका सत्पुरूषाच्या कृपेने आम्ही ४ भाऊ ४ बहिणी जन्मलो."
"मी विठ्ठल भक्तिच्या ओढीने पंढरपूराकडे खेचलो. अनेकदा वाऱ्याही केल्या. पण आता प्रसाद पाहिजे म्हणून इथेच राहिलो. अनशन केलं ते आपल्याला माहितही आहे."
"आता तुम्हीच मला प्रसाद द्या"
पंत गोंधळेच.
त्यांना कळेचना.
मी प्रसाद देणारा कोण.
ते ब्राह्मणास म्हणालेही,
"तुम्ही तर ईशप्रसादास्तव अनुष्ठानी बसलात. मी पामर काय करणार?"
"मी कोण, आणि काय प्रसाद देणार तुम्हाला?"
पाहुणा म्हणाला,
"आज पहाटे भजन करते वेळी मला देवदर्शन झाले. परमात्माला दर्शन नको, प्रसाद दे म्हणता, त्यानेच माझा भक्त बडवे कुळातला प्रल्हादाचे घरी जा तिथे असलेली तुकोबारायांची अभंगाची वहि तुला प्रसाद मिळेल म्हणून सांगितले. स्नानादी करून त्यास्तव चौकशी करत तुमचे कडे आलो. आता मला प्रसाद द्या." विप्राने पंतपुढे उपरणे पसरले.
पंताना काही कळेना. त्यांची मनस्थिती अजूनच गोंधळली. थोरं चित्त स्थिर केलं. मनन केलं. अन् त्यांचे ध्यानी आले. देवघरात देवांच्या शेजारी आपण गेल्या ६ पिढ्या देवपूजेबरोबर ज्याची पूजा करतो ती वहि हे मागताहेत. पंतासाठी ती केवळ वही नव्हती. तो कुळाचा ठेवा होता. कुळात धनसंपदा, वित्त, सोनं नाणं, घर स्थावर यांचे पिढ्या दरपिड्या भाऊबंदात वाटप होत होतं. पण ती वही तिचं वाटप नव्हते. ती देव्हाऱ्यात पुजली जातं होती. सारी भावकी प्रल्हाद महाराजांच्या पादुकांचे नित्य दर्शन करित त्यावेळी चांदीच्या फुलांनी मडविलेल्या चंदनाच्या देवपाटा शेजारच्या तशाच दुसऱ्या पाटावरिल रेशमी वस्त्रांतील त्या वहिचे नव्हे पोथीचे दर्शन करत होते. कारण ती पोथी तेवढी मोलाची होतीच. ती होती तुकोबारायांची अभंगाची वही. तुकोबापुत्र महादेव बुवांनीच ती प्रल्हाद बाबांना दिली होती. त्यावेळे पासून ती अतिव निष्ठेने जपली होती. पुर्वसुरींनी कधी मधी तिचे पारायण केले होते. तिचेवरून नकलही करून घेतली होती. वाळवी, कसर, पाणी आदि पासून तिचे निष्ठेने अन् पराकाष्ठेने रक्षण केलं होतं. प्रल्हादबाबांचं तो ठेवा होता. तो बडवे घराण्याचा ठेवा होता. तुकोबारायांचा तो वसा अन् वारसा होता. तो पंढरीनगरीचा ठेवा होता. तो वारकऱ्यांचा अन् सकल भक्तजनांचा ठेवा होता.
आणि आता हा ब्राह्मण तीच मागतोय. नाही नाही हे होणं नाही. पण या विप्राला सांगावं तरी काय.
पंत थोडं विचार करून बोलले,
"तुमचे खोटं आहे असं म्हणत नाही मी. पण आमचे घराचा ठेवा आम्ही आपणाला काय म्हणून द्यावा? आपलेला देवाने सांगीतले, पण मला कुठे आदेश आहे तसा?"
पंत भावनेपोटी बोलून गेले. पुन: पुन्हा विनवण्या करून ब्राह्मण हिरमुसून परतता जाला. देवा तुच मार्ग काढ म्हणून म्हणत त्याने पुन्हा अनुष्ठान मांडले. पुन्हा भजनात रंगून गेला.
सगळा दिवस उलाघालीत गेला. पंतांची दिवसभर तगमग होत राहिली. कसे बसे रात्री पंत भुईला टेकले. पहाटे पहाटे उठले ते हाताने वारंवार नमस्कार घालतच. पत्निलाही अचंबा वाटला. त्यांच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. परशरापंतांनी नेहमीपेक्षा पटापट आन्हिक आटोपले घरात गोडाधोडाचे रांधांयला अन् जरा दहा बाराजणांचे जास्तीच करायला सांगितले. देवदर्शन केलं आणि कालचा ब्राह्मण बसला होता त्या ठिकाणी गेले. त्याचे हाताला धरून घरी आणलं. ब्राह्मणाला आन्हिक आटोपायला सांगितलं. म्हणाले
"आता जेवायला बसा."
ब्राह्मण हट्टाने म्हणाला
"आधी पोथीप्रसाद! मग भोजन"
पंत म्हणाले "हो हो काल तुम्हाला विन्मुख पाठविले. पण काय करावे. घरचे ठेवा असा कसा द्यावा."
"काल मी बोलून गेलो, पण आज मला जाग आली ती भगवद् दर्शनानेच. भगवंतानेच पहाटे आज्ञा केली, "मी दारी विप्र पाठविला आणि तू विन्मुख पाठवलास उद्या त्याला प्रसाद दे!" आता काय त्याने द्यायला सांगितले. त्याची आज्ञा कोण मोडणार? मी तो हमाल भारवाही. मी पोथी देतो. तो प्रसाद आपण घ्यावा सोबतच आपण भोजनही करावे."
पंतांनी साऱ्या भावंडांना बोलावणे केले. घरात पुजेची सिद्धता केली. सोवळे नेसले. ओसरीवर समोरासमोर पाट मांडले. देवघरातील पोथी पंतांनी बाहेर काढली. एका पाटावर मांडली. दुसऱ्या पाटावर ब्राह्मणाला बसविले. तोवर सगळी भावकी घरी आली. पंतांनी झाली हकिकत कथली. विचारले 'बोला काय करायचे?' साऱ्यांनी माना डोलावल्या. भगवंतानेच सांगितल्यावर आपण ते केलेच पाहिजे म्हणत नमस्कार केला. होकार भरला.
आता पंतांनी पूजा आरंभिली या घरातली पोथीची शेवटची पूजा. यथासांग पूजा केली. त्या ब्राह्मणाचीही पूजा केली. कपाळी केशरमिश्रित चंदन, त्यावर अष्टगंध, बुक्का लावला, हार घातले. भरजरी शाल अंगावर घातली. भरल्या डोळ्यांनी, जड अंतकरणाने पोथी उचलली ब्राह्मणाचे हाती दिली. नमस्कार केला. थरथरत बोलले,
"सांभाळा!"
उत्तर आले,
"निष्ठेने! "
पंतांकडे तो ब्राह्मण पंताचे भाऊबंधासह अशी पंगत झाली. ब्राह्मण तृप्त झाला. सुग्रास भोजनाने नव्हे. मिळालेल्या प्रसादामुळे. असा प्रसाद कोणाला मिळत नाही. जो अनेक पिढ्या भक्षून लोकांना वाटूनही अक्षय्य आहे. तो कधी संपत नाही.
हा ब्राह्मण म्हणजेच वारकरी संप्रदायाचे भुषण थोर भगवद्भक्त गंगुकाका शिरवळकर होय. प्रसाद प्राप्तीनंतर काकांनी शिरवळ सोडले ते कायमचेच. त्यांनी भुवैकुंठ पंढरीत विठ्ठलासंनिधच कायमचा वास केला. नुसता गाथा पोथी प्रसाद मिळणे तो सांभाळणे म्हणजे त्याचा खरा सांभाळ नाही हे ओळखून काकांनी त्याचे नियमित भजन चालू केले. प्रल्हादवंशीचे परशरामपंतांनी प्रसाद देताना उच्चारलेला "सांभाळा" शब्द काकांनी असा पाळला.
संत जळोजी मळोजी सारख्या भक्तांना काकांनी सहाय्य केले. नव्हे त्यांचे अंतकर्मही काकांनी केले. पंढरपूरतील रहिवासासाठी पुढे चंद्रभागा तटाकी असणारा, शिंदे सरकार वाड्याचे दक्षिणेचा माणकेश्वर सरदार यांचा वाडा काकांना मिळाला. त्यातील आणि अन्य एका वाड्यातील ब्रह्मसमंध काकांच्या भजनाने वाड्यातून पळून गेले ते कायमचेच. येथेच काकांनी अंतापावेतो निवास केला. भजनासाठी अनेक विषयांचे अवधान पाहून काकांनी गाथा भजनाची त्यांचे वाड्यात प्रथा सुरू केली. त्यामुळे या वाड्यात वर्षातून २ वेळा संपूर्ण महिना महिना गाथा भजन सकाळी ८ ते २ पावेतो चालू असते. हेच खरे गाथा प्रसाद प्राप्तीचे फलीत आहे. नाही तर भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रंथ प्राप्त झाला आणि तो घराचे देवघरात वा पुस्तकशाळेत न वाचता ठेवला तर त्याचा काय उपयोग?
काकांनी आपल्या वाड्यात अखंड विणा चालू केला जो अजून सुमारे १५० वर्षापासून अव्याहत या वाड्यात चालू आहे. प्रारंभी काका स्वत: तासोनतास वीणा घेवून भजन करीत. काकांपासून प्रेरणा घेवून टेभूकरांकडेही वीणा सूरू झाला त्यालाही आता जवळ जवळ शंभर सव्वाशे वर्षे झाली. अद्यापी दोन्हिकडे हे हरिभजन अव्याहत चालू आहे. प्रसंगी काकांचे वारस आजही ४-६ तास वीणा घेवून भजन करतात. कारण करिन आपुले जतन हा वारकरी संप्रदायाचा बाणा काकांच्या पासून त्यांचेत आला आहे.
काकांचे नित्याचे भोजन आपल्यासोबत देवाचे प्रतिनिधी म्हणून बडवे, आईसाहेबांचे प्रतिनिधी उत्पात, नामदेवरायांचे वंशीचे नामदास आणि पुंडलिकाचे पुजारी कोळी यांचे सहच होई. आजही काकांकडच्या पंगती या परंपरेविना चालत नाहीत. दिवाळीच्या आणि जळोजी मळोजींचा पुण्यतिथी उत्सव, पुंडलिकाचा उत्सव आदि च्या पंगतीचे आमंत्रण पहिलेदा प्रल्हाद महाराजांचे वंशी दिले जाते. पंगतीला त्यांना घेवूनच पंगत बसते.
अशा गंगुकाकांनी माऊलीपुढेही भजन सेवा केली. त्यामुळेच आज वीणामंडपात शिरवळकरांचा पहारा आहे. बरोबरच पालखी सोहळ्यात शिरवळकरांची दिंडी रथापुढे १३ व्या क्रमांकाला चालते. आदर्श भजनी पारंपारिक दिंडी म्हणून त्यांचा लौकिक आहे. काकांच्या दिंडीचे वैशिष्ठ्य म्हणजे ते ज्येष्ठाची पंढरीची वारी करून द्वादशीला दिंडीने आळंदीला माऊलींना आणायला जातात माऊलींसवे आषाढीत पंढरीस येतात. पुन्हा माऊलींना सोडायला आळंदी ला जायचे अन् श्रावण वारीला परत पंढरीला दिंडीनेच यायचे. हे २ महिने दिंडी चालविणेचे खडतर व्रत अव्याहत चालू आहे. दादांच्या अकाली निधनाने त्यांचे माघारी भागवत अन् श्रीनाथ हे बंधू ग्रुप परंपरा आज चालवित आहेत.
काकांच्या माऊलींवरिल निष्ठेमुळे आणि सेवेमुळे पालखी सोहळ्यामधे वाल्हे मुक्कामी शिरवळकरांचे मानाचे कीर्तन आहे. फलटण मुक्कामी जागरणाची सेवा आहे. बरोबरच माऊली परत आळंदीला पोहोचल्यावर आळंदीत आषाढ व ११ ला हजेरीचे भजन पंढरपुरातील एकट्या शिरवळकरांचेच असते. त्यामुळेच प्रस्थान समयी शिरवळकरांना मानाचा नारळ दिला जातो.
त्याशिवाय पंढरपूरात श्री विठ्ठलाकडे गोकुळअष्टमी सप्ताहात अन् रूक्मिणीमातेकडे नवरात्र उत्सवात, आळंदीला माऊलीच्या मंदिरात, देहूला तुकोबारायांचे मंदिरात अन् इतरही ठिकाणी सेवा आहेत.
गंगूकाका ब्रह्मचारी राहिले. त्यामुळे काकांचा वारसा त्यांचे चालविला. पुढे त्यांचे वारस चालवित आहेत.
काकांचा वारसा केवळ तोंडी न सांगता वै. धोंडोपंत तथा दादा शिरळकरांनी त्यात भर घातली आहे. त्यांनी आमचे पिताश्री अनिलकाका बडवे यांचे मदतीने पंढरपुर क्षेत्राची शेकडो वारकरी भक्तासह दिंडीने परिक्रमा केली. बहुधा शतकांनंतरची हि पहिलीच दिंडी परिक्रमा असावी.
माऊलिंचे समाधी सोहळ्याला आळंदिला जाताना काकांची दिंडी आजही प्रल्हाद महाराजाचे निवासस्थाना समोर आवर्जुन थांबून अभंग आरती करूनच जाते. संप्रदायात अनेकविध कार्ये केल्यामुळे काकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. सन १८७० चे कार्तिक शु|| ५ चे दिनी काकांनी पंढरीक्षेत्री देह ठेवला. त्यांचे विष्णुपदाजवळ समाधीस्थान आहे. काकांचे पुण्यतिथीचा मोठा उत्सव काकांचे वाड्यात अन् धोंडोपंत दादांचे फडावरही साजरा होतो. काकांचे ओवीबद्ध चरित्र संत दासगणु महाराजांनी लिहिले आहे.
काकांचा वाडा हा समस्त वारकरी बांधवांचे पुण्यस्थान आहे. गाथा संग्रहस्थान आहे. गाथा प्रसाद स्थान आहे. गाथा संरक्षण स्थान आहे. त्याहून मोठा गाथा प्रसार स्थान आहे. ते पंढरपूरचे भुषण आहे म्हणून जपले पाहिजे. रक्षिले पाहिजे. तसेच काकांची सेवा निष्ठा भजन मार्ग याचे अनुसरण करायला हवे. त्यामुळेच वारकरी संप्रदायाची विजय पताका फडकत राहणार आहे.
® ©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...