विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 June 2023

भिवाजीबुवा टेंभुकर दिंडी

 


भिवाजीबुवा टेंभुकर दिंडी
आपण सकल भरत वर्षीय लोक त्याचे नित्य अथवा कारण परत्वे सप्ताहनिमित्त अत्यंत श्रद्धेने श्रीमद् भागवत वाचन वा श्रवण करतो. खरे तर नित्य भागवत कथा श्रवण करण्याचे कारणच आपले जीवन आदर्श कसे असावे. कसे बनवावे याचा वस्तुपाठ म्हणजे भागवत असल्याने पूर्वसुरीनी त्याचे श्रवण वा वाचन अत्यावश्यक मानून त्याचा समावेश नित्य पाठात केला आहे. नित्य नसले तरी वर्षभरात एकदा तरी त्याचे श्रवण व्हावे म्हणून प्रौष्ठप्रदी भागवत सप्ताह सांगितला आहे. हे भागवत कथा वाचन वा श्रवण करताना अनेक कथा आणि बोधपर वचने वाचतो वा श्रवण करतो मात्र त्याप्रमाणे कोणी आचरण करताना दिसत नाहीत. मात्र जो भागवतामधील वचनावर दृढ विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करतो त्याला सत्सत्तेने भगवंत प्राप्ती होते. त्यालाच लोक संतत्व प्रदान करतात.
न यम वैकुण्ठं कथा सुधापगा । न साधवो भागवता स्तदा श्रयाः । न यत्र यज्ञेश मखा महोत्सवा सुरेश लोकोऽपि न वै स सत्यताम् ।।
भगवंत कथेची अमृत सरिता वहात नाही, भगवद्भक्त निवास करीत नाहीत, नृत्यगीता सह समारंभपूर्वक भगवत् पूजन केले जात नाही. तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय करू नये असे वचन श्रीमद् भागवतामध्ये पाचवे स्कंधातील १९ व्या अध्यायात आले आहे. भागवतातील हे बोधवचन अगदी अनादि कालातील असले तरी ते तेव्हापासून आजचे काळातही आयुष्याची कालक्रमणा करताना मानवाला पथदर्शक आहे. त्यावर विश्वासून वर्तल्यास जीवन श्रेयस्कर सुफल आहे. अशा अनेक विध वचनामुळे भागवताचे महत्त्व हिंदुस्थानचे जीवनात अनन्य साधारण आहे. त्यामुळेच हिंदुस्थानातील बहुविध पंथ, संप्रदाय त्यानुरुप चालतात. महाराष्ट्रभुत विकासाला गेलेला आणि
विश्व स्वधर्म सूर्य पाहो । ज्ञा.म.
म्हणत विश्वाला बंधुत्वाची शिकवण देऊन विश्व आपले कवेत घेऊ पहाणारे वारकरी ही याच धारेवर चालताना दिसत आहे. त्यातही केवळ पडीक पोपटाप्रमाणे वारकरी संप्रदायात केवळ बोलणे, सांगणे याला महत्त्व नसून शास्त्र आणि धर्म ग्रंथ यावर तसेच संत वचनावर चालणाऱ्यांचे महत्त्व विशेष आहे.
ज्यांनी देवदर्शनार्थ सकल हिंदुस्थान उभा आडवा पादाक्रांत केला मात्र वरील भागवत वचनाप्रमाणे एकही स्थान त्यात दिसून आले नाही. मग ते महातीर्थ असो वा महाक्षेत्र असो आणि त्यामुळेच जिथे या साऱ्यांचे पालन होतेय तेथेच आपला आयुष्यक्रम ज्यांनी घालविला अशा व्यक्तीला संतत्व प्राप्त झाले. अशी विभूती म्हणजे थोर भगवद्भक्त वैकुंठवासी श्री भिवाजी महाराज टेंभूकर हे होत. त्यांनी यौवनात पदार्पण करताच आपले गांव सोडून ऐन तरुणपणी सकल भारतवर्षाचे भ्रमण केले. यावत् तीर्थक्षेत्र धुंडाळली मात्र त्यांना वरीलप्रमाणे भागवत वचनाची सत्यता केवळ भूवैकुंठ पंढरीचे क्षेत्रातच दिसून आली. अनेक तीर्थक्षेत्रे पाहून त्यातील न्यूनता त्यांना जाणवली. तुकाराम महाराज वर्णन करतात.
वाराणसी गया पाहिली द्वारका । परि नये तुका पंढरीच्या ||
कोठेही समाधान झाले नाही. ते फक्त पंढरीत झाले आणि त्यामुळेच त्यांनी आपले उर्वरित आयुष्य पंढरीक्षेत्रात विठोबारायाचे चरणी व्यतीत केले.
फारसे लौकिक शिक्षण नाही. ग्रामीण भाग असल्याने फारसे विश्वही ज्ञात नाही. तरीपण भागवत वचन त्यांना ज्ञात होते. कारण पूर्वजन्मी केलेले अध्ययन होय. असे म्हटले तर वाऊगे होणार नाही.. कारण कोणी महात्मा, संत, साधु पुरुष एकदम जन्म घेत नसतो. तर त्यासाठी त्यांनी पुर्वजन्मात घोर तप, जप, चिंतन, मनन, अभ्यास केलेला असतो.
जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ।। -ना.म.
असे असल्याने श्री भिवाजी महाराजांचा या जन्मी भागवत वचनावर मागचे जन्मी केलेल्या अभ्यासामुळे विश्वास होता. त्यामुळे या जन्मी अनेक तीर्थक्षेत्रे फिरूनही
बहु फिरलो ठायाठाव । कोठे भाव पुरेचि ना ॥ तु. म.
अशी अनुभूती आल्याने आणि त्याहून पुढे जाऊन
समाधान तो पावलो । उरलो बोलो यावरी ।। तु.म.
असे झाल्याने पंढरी क्षेत्री वास केला. भागवत वचनावर आणि संत वचनावर विश्वास ठेवून वर्तन केले. शुद्धाचरण केले त्यामुळे त्यांना मोठेपणा संतत्व प्राप्त झाले. त्यामुळेच आज सुमारे १५० हून अधिक वर्षे झाली तरी त्यांच्या चारित्र्याची आणि चरित्र्याची कीर्ति गाईली जाते. ती ही केवळ त्यांच्या वंश परंपरेतील वा शिष्य परिवारच नव्हे तर सकळ वारकरी त्यांची कीर्ति गात आहेत.
गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ।। -ना.म.
त्यांच्या चरित्रातील संसार- विरक्ती, देव-भक्ती, भजन- निष्ठा, निर्लोभीपणा, संत वचनावरील विश्वास अशा अनेक सद्गुणांमुळे ते सकलांना वंदनीय व आचरणीय आहेत. त्यामुळेच अशा चरित्राचे गुणगान पुराणे देखील वर्णन करतात. वैष्णवांची कीर्ति गाईली पुराणी । - तु. म.
वै. श्री भिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या नेमबंधाचे पालन त्यांचे वंशज आणि पाईकाकडून केले जात आहे.
अशी थोर व्यक्तीची चरित्रे कळाल्याने पुढची पिढी अधिक सक्षमतेने कार्यप्रवण होते. तसेच नवीन लोकांना हा भक्तीमार्ग अनुसरण्याची सद्बुद्धी होते म्हणून या चरित्र गाणाला विशेष महत्त्व आहे.
अशा भिवाजी बुवांचा ना जन्म काव ना मृत्युशक उपलब्द आहे. मात्र त्यांचे हयातीत त्यांनी वारकरी संप्रदायाचे काम एवढे केले की ते लोकांच्या लक्षात आहेत.
त्यांनी आपल्या पंढरीच्या राहते जागेत एकदा सप्ताह केला त्यावेळी वीणापहारा उभा केला. भक्तलोकांनी उदारहस्ते भजनी मंडळींसाठी धान्य दिले. सप्ताहभर भोजनावळी होवून धान्य शिल्लक राहिले. तेव्हा भिवाजीबुवांनी आलेले धान्य भजनासाठी आले आहे तेव्हा धान्य संपेतो वीणा पहारा चालूच ठेवण्याचे ठरविले. तो पहारा अद्याप १५० वर्षे हून अधिक काळ चालूच आहे. भिवाजी बुवांनी ब्रह्मचारी राहून जीवनभर संप्रदाय सेवा केली. त्यांचे पश्चात त्यांचे बंधु कृष्णाजी यांना बंधूचा वारसा चालविला त्यांचे वारस आता तोच वारसा चालवित आहेत.
चैत्रात गोरक्षनाथाला जाणारी दिंडी भिवाजीबुवांनीच आरंभली. शिवाय भिवघाटातील शुकाचार्याचे देवस्थानालाही महाशिवरात्रीचा उत्सव टेंभुकर घराण्याच अव्याहत चालू आहे. पौष एकादशीची निृत्तीनाथांची यात्रा त्र्यंबकेश्वरी भरतेतिथेही टेंभुकरांची गाडी असतेच.
सकल वारकऱ्यांच्या निष्ठेचे स्थान म्हणजे आळंदी अन् पालखी सोहळा या पालखी सोहोळ्यात टेंभुकरांच्या रथामागे १ नव्हे तर २ दिंड्या आहे. दिंडी क्र २ अन् ३ या त्या दिंड्या असून भजनभक्ती काय असते अन् अभंग विविध रागात कसे गावाचे याचा आदर्श या दिंड्या त दिसू येतो. आजही अनेक दिग्गज गायक अन् शिकावू वारकरी विद्यार्थी या दिंडीत भजन ऐकायला मोठ्या उत्सुकतेने येतात. पालखी सोहोळ्यात नित्य सायंकाळचे समाज आरतीचेवेळी टेंभूकरांचे दिंडीचे विणा पालखीचे दांडी समोर आल्यावरच आरती सुरू होते. शिवाय प्रस्थानावेळी अन् समाधी सोहोळ्याला टेंभुकरांना मानाचे नारळ दिले जातात.
स्वतंत्र फड निर्माण करण्याची शक्ती भक्तसमुह अन् अनुकूलता असतानाही टेंभुकरांनी मांडी ना स्वतंत्र फड| अंगा येईल अहंता वाड| या नाथ महाराजांचे वचनाचा विचार करून नवा फड। निर्माण केला नाही तर सदैव विठ्ठल महाराज देहूकर यांचे फडावर निष्ठावंत सेवेकरी दिंडी वाले म्हणून एकनिष्ठपणे भजनसेवा केली आहे. करीत आहेत.
विशेष म्हणजे जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा अन् टेंभुकरांचा विशेषऋणानुबंध आहे. कारण नामदेव बुवा आणि किसनबुवा हे बंधुद्वय नंतर महादेव बुवा सोपान काका अन् आता विष्णु टेंभुकर अशा तिन पिढ्यानी संस्थेत राहून अध्ययन पुर्ण केले आहे. पैकी सोपानकाकांनी गाथा मुखोद्गत केला आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या इतिहासातील संस्थेत तिन पिढ्या शिकलेले बहुधा हे एकमेव घराणे असेल.
भक्तवत्सल परमात्मा पांडुरंगरायाचे आशीर्वादे करून सकल समाजात अज्ञात असणारे महान हरिभक्त वै. प.पू. भिवाजी महाराजांचे चरित्र सुधापानाने नवीन वारकरी पिढी घडावी ज्यानी संप्रदाय सेवा एकनिष्ठतेने करावी या आशेने हे लिखाण थांबवितो.
©® आशुतोष अनिलराव बडवे पाटील. पंढरपूर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...