पुलकेशी दुसरा
मंगलीश मरून पुलकेशी सिंहासनावर स्थिर होई पर्यंत काही काळ अस्वस्थतेत गेला. त्या काळात आपला अंमल मुलखात पक्का करण्यासाठी पुलकेशीने आपले सेनापती आप्पायिक आणि गोविंद यांना भीमेच्या उत्तरेकडील प्रदेशावर स्वारी करण्यास पाठवले. त्यापैकी आप्पायिक पराभूत झाला तर गोविंद विजयी झाला. स्वतः पुलकेशी पराक्रमी असल्याने तो सेनापतींवर अवलंबून राहणारा नव्हता. संपूर्ण दक्षिण भारतात पुन्हा एकदा चालुक्यांचे एकहाती सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी त्याने कदंबांची राजधानी वनवासी हिजवर स्वारी करून जिंकून घेतली. तेथून तो उत्तरेत कोकणात उतरला. कोकणात मौऱ्यांचे राज्य होते त्यांची समुद्रकाठी पुरी ( दंडाराजपुरी) ही राजधानी होती. तिला जमिनीवरून सैन्याने व समुद्रातून नौकातून वेढा घालून पुलकेशीने मौऱ्यांचा पराभव केला. यासोबतच नल, कलचुरी, राष्ट्रकूट, उत्तरेकडील गुजरात मधील लाट, मालव आणि गुर्जर या राजांना त्याने नमविले. गंग व अळूप राजे तर न लढताच घाबरून त्याला शरण आले. अश्या तऱ्हेने पुलकेशी दुसरा महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या त्रिमहाराष्ट्र देशाचा स्वामी बनला. पूर्वेस असणारे कोसल व कलिंग राजे त्यास शरण आले आणि प्रतिष्ठेचा पिष्ठपुरचा किल्ला त्यांनी बिनविरोध पुलकेशीच्या ताब्यात दिला. दक्षिणेतील केरळ व चेर प्रांतात शिरून तेथील राजांशी त्याने मैत्री संपादली. पल्लव राजा महेंद्र यास उत्तर आंध्रातून पिटाळून लावले व त्याच्या कडून पिठापुर हे नगर घेतले. या सोबतच चेदी राजांनाही त्याने शरण येण्यास भाग पाडले व पर्यायाने तो दक्षिणेचा सर्वसत्ताधीश झाला.
अश्या रीतीने पुलकेशी दुसरा याच्या काळात चालुक्यांच्या सार्वभौम सत्तेचा पुष्कळ फैलाव झाला.
परंतु या लढायांपेक्षा पुलकेशीची जी कामगिरी ऐतिहासिक व महत्त्वाची समजली जाते ती म्हणजे उत्तराधिपती सम्राट हर्षवर्धनाचा नर्मदा तटी केलेला पराभव होय.
याची माहिती पुढील भागात घेऊ.
क्रमश:
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.
३) प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment