विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ३७ पुलकेशी दुसरा

 


प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ३७
पुलकेशी दुसरा आणि इतर चालुक्य राजांनी मौर्य, वनवासी या राजांवर अनेक वेळा हल्ले केल्याचे आपण आधीच्या भागांमध्ये पाहिले मात्र असे का? व कश्यासाठी हे आपण या भागात बघू...
पुलकेशीच्या कारकिर्दीत चालुक्यांच्या सार्वभौम सत्तेचा फैलाव पुष्कळच झाला. मात्र सार्वभौम सत्ता व स्वराज्य यात फरक असतो. सार्वभौम सत्ता वाढली म्हणजे स्वराज्य वाढते असे नव्हे, मात्र स्वराज्याची अभिवृद्धी नक्कीच होत असते.
सार्वभौम राजा कितीही प्रबळ झाला तरी तो ज्या ज्या राजाला जिंकील त्या त्या राजाचा मुलुख खालसा करण्याची पद्धत त्याकाळी नसे. त्या राजास शरण आणून त्याजपासून खंडणी घेतली म्हणजे सार्वभौम राजा स्वतःस कृतकृत्य मानी. दुसरे असे की इतका विस्तृत मुलुख सार्वभौम राजाने खालसा करण्याचे मनात आणले तरी तो कायमचा ताब्यात ठेवणे शक्य नसे. ज्यांनी सार्वभौमत्व कबूल केले ते मांडलिक राजे संधी येताच सार्वभौम सत्तेस लवकर झुगारून देऊन स्वतंत्र होत. जर सार्वभौम राजाच्या अंगात पूर्वीचे सामर्थ्य असेल तर तो पुन्हा स्वारीस निघे व आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करी. प्रत्येक राजापाशी काही सैन्य, पगार देऊन कायमचे ठेवावेच लागे. त्याचप्रमाणे इतर सर्व खर्च सरकारी उत्पन्नातून भागवणे अशक्य होत असे. तेव्हा एका राजाने दुसऱ्या राजाच्या मुलखात शिरून तो लुटणे व खंडणी मिळविणे हा एकच उपाय असे. एकमेकांच्यामुलुखावर वारंवार स्वाऱ्या होण्याचे हेच मुख्य कारण होते.
असे असले तरी सार्वभौम राजाचे स्वराज्य असे व त्या स्वराज्याच्या विस्तारावर त्याचे वैभव व सामर्थ्य अवलंबून असे. राज्यकारभाराच्या व्यवस्थेसाठी स्वराज्याचे लहान विभाग पाडण्यात येत व त्यांचा कारभार बघण्यासाठी सुभेदार नेमले जात. हे सामंत वा सुभेदार लायकी पाहून नेमले जात. पण राजघराण्यात संतती उत्पन्न होऊन राजपुत्र वा राजबंधू वयात आले म्हणजे त्यांना राज्यकारभारात जोखमीची कामे दिल्यास राजसत्तेस एकजीव येई व त्याच प्रमाणे राज्यात बखेडा माजण्याचा संभव कमी होई. असे राजमंत्री स्वतंत्र होत नसत असे नाही मात्र परकीय सुभेदारांनी स्वतंत्र होऊन राज्याचे लचके तोडण्या पेक्षा राजघराण्यातील पुरुषांनी तोडलेले राजाला परवडत असे.
यामूळेच आपल्याला बदामीच्या चालुक्यांच्या सुद्धा वेंगीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य तसेच गुजरातचे सोळंकी अश्या उपशाखा झालेल्या दिसतात.
क्रमश:
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.
३) प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...