विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ३५ मंगलीश..( इ.स.५९७ ते इ.स.६१०)

 



प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ३५
मंगलीश..( इ.स.५९७ ते इ.स.६१०)
किर्तीवर्म्यामागून त्याचा धाकटा भाऊ मंगलिश इ.स. ५७८ च्या सुमारास राजा झाला. त्याने आपल्या पराक्रमांना वडील भावाच्या कारकिर्दीतच सुरुवात केली होती. त्याचे घोडदळ अत्यंत प्रबळ होते, त्याने त्याच्या बळावर पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर स्वाऱ्या करून चालुक्यांचे राज्य बंगालच्या उपसागरा पासून अरबी समुद्रापर्यंत वाढवलं. आपली सत्ता समुद्राला मिळाल्यानंतर त्याने आपले आरमारही सुसज्ज केले. अशाच एका स्वारीत त्याने अरबी समुद्रातील रेवती द्वीप ( आताचे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी ) ताब्यात घेतले. यासोबतच उत्तर महाराष्ट्र व माळवा यांवर चेदी देशाचा कलचुरी राजा बुद्धराज याचा अंमल होता. त्याचा मंगलीशाने इ. स. ६०७ च्या सुमारास धुव्वा उडविला.
आपले राज्य वाढवण्या सोबतच मंगलीशाने बदामीस चांगले रुप आणले. बदामीच्या चार लेण्यांपैकी विष्णुचे लेणे मंगलीशाने निर्मिले. त्यात विष्णु, लक्ष्मी, गरुड, वामन, बळी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंगलीशाने या लेण्यासाठी एक गाव दान दिले त्या शिलालेखात पुढील माहिती मिळते. " राजा मंगलेश्वर याने आपल्या वाढत्या राज्याच्या बाराव्या वर्षी शकनृपतीच्या राज्याभिषेकाला पाचशे वर्षे झाली असता लेण्यात विष्णुचे अद्भुत गृह रचीले व विष्णुप्रतिमेची प्रतिष्ठापना केली. निविम्र लिंगेश्वर नावाचा गाव नारायण बलीसाठी सोळा ब्राह्मणांना दानाकरिता व उरलेले उत्पन्न संन्याशाच्या भोजन घालण्या करिता दिला."
या खंद्या लढवय्या कडून पुढे मात्र एक चूक झाली. मंगलीशाच्या पश्चात चालुक्यांच्या गादीवर किर्तीवर्म्याचा मुलगा असणाऱ्या पुलकेशी दुसरा याचा हक्क होता मात्र, आपल्यानंतर आपल्या मुलासाच गादी मिळावी, असा प्रयत्न त्याने आरंभिला. त्यास अर्थातच पुलकेशीने विरोध केला. त्यामुळे मंगलीश व पुलकेशी यांमध्ये यादवी माजली. या तुंबळ यादवी मध्ये मंगलीश मारला गेला व त्याच्या मागून पुलकेशी दुसरा हा इ.स. ६११ मध्ये गादीवर आला.
चालुक्य वंशातील यथार्थाने सर्वश्रेष्ठ अश्या पुलकेशी दुसरा या राजाची माहिती पुढच्या काही भागात घेऊ.
क्रमश:
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.
३) प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...