प्रथम युवराजदेव...
प्रथम कोक्कला नंतर कलचुरी घराण्यात झालेला हा एक महत्त्वाचा राजा. तत्कालीन भारतीय राजांत याने आपल्या शौर्याने आणि राजनीतीने महत्त्वाचे स्थान मिळवले होते. याच्या शत्रूच्या ही लेखात याचा उल्लेख ' विख्यातक्षितीपालमौली- रचनाविन्यस्तपादाम्बुज: ' ( ज्याने आपले पदकमल विख्यात नृपतींच्या शिरावर स्थापिले आहे ) असे वर्णन आले आहे.
याने गौडाधिपती, मालवनृपती, आणि दक्षिण कोसलाधीपती या तिघांचाही पराभव केला. या सोबतच त्याकाळातील राष्ट्रकूट राजा तृतीय इंद्र याच्याशी वैवाहिक संबंध जोडून त्याने आपले राजकीय प्राबल्य वाढविले होते. राष्ट्रकूट आणि कलचुरी यांनी एकजुटीने प्रतीहार नृपती महिपाल याचा पराभव करून त्याला आपली राजधानी सोडून पळून जाण्यास भाग पाडले. यानंतर प्रतिहार राजसत्तेला उतरती कळा लागली.
यानंतरच्या काळात दक्षिणेत मोठी राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रकूट राजगादी वर तृतीय कृष्णानंतर चतुर्थ गोविंद बसला. मात्र हा फक्त ख्यलीखुशालीत मग्न होता, त्यामुळे त्याच्या मंडलिकांत आणि प्रजेतही तो अप्रिय झाला. यावरून त्याचे व त्याचा चुलता असलेल्या तृतीय अमोघवर्षाचे भांडण होऊन अमोघवर्ष त्रिपुरीस युवराजदेवाच्या आश्रयास आला. अमोघवर्ष हा युवराजदेवाचा जामात होता. याच संधीचा फायदा घेऊन युवराजदेवाने आपले वर्चस्व राष्ट्रकूट राज्यात स्थापण्याचा विचार केला आणि आपल्या सेनापतीस मोठे सैन्य देऊन चतुर्थ गोविंदावर पाठवले. या सैन्याला अचलापुरापासून दहा मैलावर पायोषणी ( सध्याची पूर्णा)नदीच्या किनारी चतुर्थ गोविंदाचा विश्वासू सामंत असणाऱ्या कर्कर याने अडवले. कर्कराने अनेक समंतांना आपल्या बाजूने वळवून मोठे सैन्य उभे केले होते. या दोन्ही सैन्यामध्ये तुमुल युद्ध होऊन यात कलचुरी सैन्याने प्रचंड मोठा विजय मिळविला. यानंतर लगेच ते राष्ट्रकूट राजधानी असणाऱ्या मान्यखेट वर चालून गेले. याचवेळी दक्षिणेतील चतुर्थ गोविंदाच्या विरुद्ध सामंतांनी उठाव केले आणि त्यांनी चतुर्थ गोविंदाला कंठस्नान घालून कलचुरी सैन्यासोबत आलेल्या अमोघवर्षाला गादीवर बसवून त्याच्या नावे द्वाही फिरविली.
या विजयामुळे युवराजदेवाची चक्रवर्ती राजा होण्याची मनीषा पूर्ण झाली. मात्र राष्ट्रकूट राजा अमोघवर्षानंतर त्याचा पुत्र कृष्ण हा गादी वर आला. हा अत्यंत पराक्रमी व महत्वकांक्षी निघाला त्याने दक्षिण दिग्विजय केला. या दिग्विजय मुळे युवराजदेवाचे चक्रवर्ती सम्राटपद नाहीसे झाले.
युवराजदेवाच्या काळात सुप्रसिद्ध संस्कृत कवी राजशेखर याने 'विद्धशालभंजिका ' नावाचे नाटक आणि ' काव्यमीमांसा ' हा संस्कृत साहित्यशस्त्रावरील बहुमोल ग्रंथ लिहिला.
प्रथम युवराज देवाची कारकीर्द त्याने शैव पंथाला दिलेल्या उदार आश्रयामुळे पण सुविख्यात आहे. त्याचा विवाह चालुक्य वंशातील अवनीवर्मा याची पुत्री नोहला हिच्याशी झाला होता. ही त्याची अत्यंत प्रिय आणि पट्टराणी होती. नोहला ही मोठी शिव भक्त होती. तिच्याच सांगण्यावरून युवराजदेवाने आपल्या राज्यात अनेक शैव मठ व मंदिरे उभारली. त्यांना अनेक गावे दान म्हणून दिली. यासोबतच याच्याच काळात भेडाघाट जवळील टेकडीवर योगिनिंचे वर्तुळाकार देवालय बांधण्यात येऊन त्यात अनेक योगिनिंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच मंदिराजवळ बांधलेल्या शैव मठास गोलकी मठ असे म्हणले गेले. पुढे त्याच्या शाखा संपूर्ण भारतात पसरल्या. मलकापूरम याठिकाणी सापडलेल्या शिलालेखात म्हटले आहे की युवराजदेवाने गोलकी मठाला तीन लक्ष ग्रामांची भिक्षा दिली होती.
युवराजदेवानंतर त्याचा पुत्र द्वितीय लक्ष्मण राज हा गादीवर आला.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
No comments:
Post a Comment