विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २८ गांगेयादेव- विक्रमादित्य

 


प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग २८
गांगेयादेव- विक्रमादित्य
युवराजदेवाच्या माघारी त्याचा पुत्र द्वितीय लक्ष्मणराज हा गादीवर आला. हाही आपल्या पित्याप्रमाणे महाप्रतापी होता. याने वंग, पांड्य, लाट, गुर्जर आणि प्रतीहार राजांचा पराभव केला होता असा उल्लेख कोरीव लेखात आलेला आहे. आपल्या पित्याप्रमाणे यानेही दक्षिण कोसलावर स्वारी केली, एवढेच नाही तर अजून पुढे जाऊन त्याने ओरिसाच्या राजाचाही पराभव केला. त्याच्या कडून कालियानागाची रत्नजडित सोन्याची मूर्ती हस्तगत केली आणि ती पुढे सौराष्ट्रातील सोमनाथाला अर्पण केली.
लक्ष्मणराजा नंतर त्याचा पुत्र शंकरगण हा राजगादी वर आला. याने ही कनोजच्या प्रतीहारांशी आणि महोत्सवपुराच्या चंदेलांशी युद्धे केली. बहुतेक कलचुरी राजे हे शैव होते मात्र हा वैष्णव होता. त्याला करितलाईच्या शिलालेखात परमवैष्णव म्हटले आहे.
याच्या नंतर द्वितीय युवराजदेव आणि द्वितीय कोक्कल हे राजे होऊन गेले. त्यांच्या काळात कलचुरी राजसत्तेला उतरती कळा लागली होती. याच काळात उत्तर भारतात गजनीचे सुलतान सबक्तगिन व महमूद यांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या.
अश्या परिस्थितीत द्वितीय कोक्कला चा मुलगा गांगेयादेव हा इ.स. १०१५ च्य सुमारास राजगादीवर आला. हा अत्यंत महाप्रतापी आणि महत्वकांक्षी राजा होता. याने थोड्याच अवधीत कलचुरी राजवंशाला पुनः उज्वल कीर्ती प्राप्त करून दिली.
महमूदापुढे भित्रेपणाने मान तुकविणाऱ्या कनोजच्या प्रतीहारांच्या विरुद्ध उत्तरेतील चंदेल, परमार आणि कलचुरी या तिन्ही राजवटी चंदेलांच्या निषाणाखाली एकवटल्या होत्या. मात्र पुढे गांगेयाने आपले सामर्थ्य वाढवून चंदेलांना झुगारून दिले. परमार व कलचुरी यांचेही सख्य फार काळ टिकले नाही. परमार आणि कलचुरी या शेजारच्या दोन
राजवंशातील भांडणे अनेक पिढ्या टिकली व त्यामुळे दोघांचीही अपरिमित हानी झाली.
यानंतर गांगेयाने उत्कलावर ( ओरिसा ) स्वारी करून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आपला विजयस्तंभ उभारला. या विजयाची निदर्शक अशी 'त्रिकलिंगाधिपति ' अशी पदवी धारण केली. यानंतरच्या सर्व कलचुरी राजांनी या पदवीचा उल्लेख आपल्या लेखात अभीमान पूर्वक केलेला आहे.
महमूदाच्या स्वाऱ्यांमुळे कानोजच्या प्रतिहारांची सत्ता संपुष्टात आली होती. सोबतच चंदेल राजे सुद्धा निष्प्रभ झाले होते. ही संधी साधून गांगेयाने गंगा यमुना नद्यांचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला आणि प्रयाग ही आपली दुसरी राजधानी केली. सोबतच त्याने वाराणसी सुद्धा आपल्या ताब्यात आणली.
गांगेयाने महाराजाधिराज व परमेश्वर या सम्राट निदर्शक पदव्या धारण केल्या होत्या.
महमूदाचा आश्रित असणाऱ्या अलबेरूनी याने आपल्या ग्रंथात फार थोड्या भारतीय राजांचा उल्लेख केलेला आहे त्यात डाहलाधिपती गंग चा उल्लेख आलेला आहे.
गांगेयाची कलचुरी वंशातील अत्यंत महत्त्वाच्या राजांमध्ये गणना होते. त्याच्या शत्रूच्या ही लेखात याचे वर्णन जीतविश्र्व ( जगज्जेता ) असे आलेले आहे. त्याने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती. हिंदूंना पवित्र असणाऱ्या प्रयाग आणि काशी या दोन्ही नगरी त्याने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. गांगेय स्वतः शिवभक्त होता. त्याने काशी मध्ये मेरू पद्धतीचे एक उत्तुंग शिवालय बांधले होते.
त्याने आपल्या नावाची सोन्याची नाणी पाडली होती. त्यावर पुढील बाजूस तीन ओळीत राजनाम असून मागील बाजूस चतुर्भुज लक्ष्मीची आकृती आहे. याचे अनुकरण पुढे अनेक हिंदू राजांनी केले.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...