प्रथम कोक्कल
मधल्या काळात उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती खूपच बदललेली होती. उत्तर भारतातील पाल आणि प्रतीहार या दोन्ही राजवटी सम्राट पदासाठी लढत होत्या मात्र या दोघांचाही पराभव दक्षिण भारतातील बलाढ्य राष्ट्रकूट नृपती ध्रुव आणि तृतीय गोविंद यांनी केला. तृतीय गोविंदाने तर हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मुसंडी मारत पाल राजांचा पराभव केला होता. याच काळात कलचुरीनी राष्ट्रकूट राजांचे स्वामित्व कबूल केलेले दिसते आणि म्हणूनच कारीतलाई येथे सापडलेल्या खंडित शिलालेखात राष्ट्रकूट राजा तृतीय गोविंद याचा पुत्र अमोघवर्ष याची स्तुती केलेली आहे. यानंतर राष्ट्रकूट आणि कलचुरी घराण्याचे स्नेहभाव वृद्धिंगत झालेले दिसतात. याचीच परिणती नंतर त्यांच्यात विवाह संबंध निर्माण होण्यास झाली. प्रथम लक्ष्मणराजाने जवळ जवळ सन ८२५ ते ८५० पर्यंत राज्य केले.
लक्ष्मणराजा नंतर प्रथम कोक्कल गादीवर आला. हा मोठा महत्वकांक्षी राजा होता. याने कनोजच्या भोज राजास सहाय्य करून त्याची राजगादी वरिल सत्ता पक्की केली. दक्षिणेतील राष्ट्रकूट राजा द्वितीय कृष्ण हा तर कोक्कलाचा जामात होता. त्यावेळी राष्ट्रकूट राजांचे वेंगीच्या चालुक्यांसोबत दीर्घकाळ युद्ध चालू होते, तेव्हा कोक्कलाने आपला पुत्र द्वितीय शंकरगण यास मोठे सैन्य देऊन राष्ट्रकुटांच्या मदती साठी पाठवले. त्याने राष्ट्रकूटांना, चालुक्यांवर मोठा विजय मिळवून दिला. त्याचप्रमाणे कोक्कलाने चंदेल राजकन्या नट्टादेवी हिच्याशी विवाह करून मध्य भारतातील चंदेल राजवंशाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. अश्या रीतीने उत्तर व दक्षिण भारतात कोक्कलाने आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्याने सुमारे सन ८५० ते ८९० पर्यंत राज्य केले.
प्रथम कोक्कलानंतर त्याचा पुत्र द्वितीय शंकरगण व नंतर त्याचा पुत्र बालहर्ष हा गादीवर आला. मात्र या दोघांच्या कारकिर्दी विषयी आपणास जास्त माहिती नाही.
मात्र नंतर आलेल्या युवराजदेवाबद्दल मात्र बरीच माहिती आज उपलब्ध झालेली आहे.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
No comments:
Post a Comment