विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २३ कलचुरीवंशसंस्थापक राजा कृष्णराज.

 





प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग २३
कलचुरीवंशसंस्थापक राजा कृष्णराज...
माहिष्मातीस उदयास आलेल्या कलचुरी कुळाचा मूळ पुरुष कृष्णराज हा होय. त्याने सुमारे सन ५५० ते ५७५ राज्य केले. याचे कोरीव लेख आजपर्यंत सापडलेले नाहीत मात्र याची नाणी उत्तरेत माळवा, राजपुताना पश्चिमेस मुंबई - साष्टी बेट, दक्षिणेत सातारा तर पूर्वेस अमरावती व बैतूल जिल्ह्यात सापडलेली आहेत. ही नाणी चांदीची असून त्यांच्या पुढील बाजूवर राजाचा मुखवटा व मागील बाजूवर मध्यभागी नंदी आणि सभोवार ' परममाहेश्वरमातापितृपादानुध्यातश्रीकृष्णराज ' असा लेख दिसतो. या नाण्यांना 'कृष्णराजरूपक ' असे म्हणतात. ही नाणी जवळपास इ.स. ८ व्या शतकापर्यंत म्हणजे कृष्णराजाच्या दीडशे वर्षांनंतर सुद्धा चलनात होती हे कोरीव लेखांमुळे समजते. या सोबतच कृष्णराजाच्या मांडलिकाचा एक ताम्रपट रामटेक जवळ नगरधन येथे सापडलेला आहे, त्यावरून कृष्णराजाचे साम्राज्य उत्तरेस माळवा, गुजरात; पश्चिमेस कोकण; दक्षिणेस सातारा व नासिक जिल्हे; पूर्वेस नागपूर व बैतूल जिल्हे असे विस्तृत पसरलेले होते.
या साम्राज्यविस्ताराचे मुख्य कारण म्हणजे त्याकाळी असलेली अनुकूल राजकीय परिस्थिती. सहाव्या शतकाच्या मध्यात सन ५२५ च्या दरम्यान मध्य व दक्षिण भारतातील वाकाटकांचे वर्चस्व कमी होऊ लागले होते. यामुळे लहान लहान राज्ये स्वतंत्र होत होती. पूर्वेत गंग व विष्णुकूंडी राजांनी आपला अंमल स्थापन केला होता, दक्षिण कोसलात पांडववंशी राजे प्रबळ झाले होते, पश्चिमेस असलेले त्रैकूटक राजे हे कोकण, गुजरात, उत्तर महाराष्ट्र येथे राज्य करीत होते तेही हळू हळू हतप्रभ होऊ लागले होते. या सगळ्याचा फायदा कृष्णराजाने घेतला व आपल्या साम्राज्याचा विस्तार गुजरात, कोकण, उत्तर महाराष्ट्र, आणि विदर्भात केला.
कृष्णराज हा भगवान शंकराचा अत्यंत एकनिष्ठ असा भक्त होता. तो स्वतःस 'परममाहेश्वर ' असे म्हणवून घेत असे.
कृष्णराजाच्या माघारी त्याचा पुत्र शंकरगण हा गादीवर आला. याचा एक ताम्रपट नाशिक जिल्ह्यातील अभोण गावी सापडलेला आहे. हा ताम्रपट त्याने उज्जैनीहून दिला होता. या सोबतच त्याच्या मंडलिकाचा एक अपूर्ण ताम्रपट गुजरात मध्ये सापडलेला आहे. या दोन्ही ताम्रपटांवरून शंकरगणाने आपल्या पित्याकडून मिळालेले साम्राज्य उत्तम रीतीने सांभाळले व टिकवले होते असे दिसते.
हाही आपल्या पित्या प्रमाणेच शिवोपासक होता. याने जवळपास सन ५७५ ते ६०० असे पंचवीस वर्षे राज्य केले.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...