विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २४ बुद्धराज…

 



प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग २४
बुद्धराज…
शंकरगणानंतर त्याचा पुत्र बुद्धराज सन ६०० च्या सुमारास गादीवर आला. त्यानंतर लवकरच वातापीचा ( बदामीचा ) चालुक्य राजा मंगलेश याने कलचुरी राज्याच्या दक्षिण भागावर स्वारी करून कलचुरींचा पराभव केला. या लढाईत मंगलेशाला खूप लूट मिळाली असे त्याच्या कोरीव लेखांवरून समजते. या विजयानंतर उत्तरेत चाल करून गंगेच्या किनारी आपला विजयस्तंभ उभारावा अशी महत्वाकांक्षा मंगलेशाच्या मनात होती मात्र त्याचा पुतण्या असणाऱ्या द्वितीय पुलकेशीने त्याच्या विरुद्ध बंड केल्याने त्याला दक्षिणेत परत जावे लागले. इतकेच नाही तर या कलहात मंगलिश मारला गेला आणि वातापी चालुक्यांची गादी पुलकेशी कडे आली. या धामधूमीचा फायदा कलचुरी राजा बुद्धराजाने घेतला आणि त्याने आपल्या राज्याचा व्यवस्थित बंदोबस्त केला.
मंगलिशाकडून पराभव झाल्यावर देखील बुद्धराज हा उत्तरेतील माळव्या पासून दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या साम्राज्याचा राजा होता, यात संशय नाही कारण त्याने विदिशा ( बेसनगर ) आणि आनंदपूर ( गुजरात) वरून दिलेले दोन ताम्रपट आज मिळालेले आहेत. त्यात दिलेली गावे अनुक्रमे नाशिक आणि भडोच जिल्ह्यातील आहेत.
पुलकेशी वातापीच्या गादीवर आल्यावर परिस्थिती बदलली. पुलकेशी हा अत्यंत महत्वाकांक्षी राजा होता. त्याने दक्षिणेतील सर्व राज्ये जिंकून वरती महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला. कोकणामध्ये राज्य करणाऱ्या मौर्य राजांची राजधानी पुरी ( जंजिरा संस्थानातील राजापुरी ) त्याने काबीज केली. हे मौर्य नृपती कलचुरींचे मांडलिक होते मात्र हा पराभव बुद्धराजाला टाळता आला नाही. पुलकेशिने इथवर न थांबता लगेचच बुद्धराजाच्या अंमलाखाली असलेल्या महाराष्ट्रावर हल्ला करून संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला. या संबंधीची माहिती आपल्याला पूलकेशिच्या ऐहोळे येथील प्रशस्तीमध्ये आलेली दिसते.
बुद्धराजाच्या पराभवनंतर दक्षिण गुजरात, माळवा आणि गुर्जर यांच्या अधिपतींनी कलचुरींचे स्वामित्व झुगारून देऊन पुलकेशीचे मांडलिकत्व स्वीकारले. बुद्धराजाचा पराभव हा साधारणपणे सन ६२० च्या आसपास झाला असावा. या पराभवानंतर कलचुरींना काही काळ अज्ञातावस्थेत जावे लागले. यानंतर सुमारे दीडशे पावणेदोनशे वर्षांपर्यंत त्यांचे लेख सापडत नाहीत. चालुक्यांच्या कोरीव लेखांनुसार कलचुरी आणि चालुक्यांचे विवाह संबंध देखील झाले, कलचुरींनी आपले गत वैभव परत मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले आणि त्यानंतर त्यांना चालुक्यांचे स्वामित्व कबूल करावे लागले.
सन ५५० ते ६२० पर्यंत म्हणजे सुमारे पाऊणशे वर्षे कलचुरींनी गुजरात, कोकण, विदर्भासह महाराष्ट्रात स्वामित्व प्रस्थापित केले होते. मात्र यानंतर कधीही हे प्रदेश त्यांच्या ताब्यात आले नाहीत. हे कलचुरींचे आद्य घराणे होय. यानंतर सातव्या शतकाच्या अखेरीस कलचुरी वंशात एक महत्वकांक्षी राजा झाला त्याने कलचुरी राज्यसत्ता पुन्हा एकदा भारतात प्रबळ केली तो होता त्रिपुरीशाखेचा संस्थापक राजा वामराजदेव. याची माहिती पुढील लेखात घेऊ.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...