विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ३४ कीर्तीवर्मा

 


प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ३४
कीर्तीवर्मा
पुलकेशी (१) यास दोन पुत्र होते. दोघेही आपल्या पित्यासारखेच वीर आणि कर्तृत्ववान होते. पित्याच्या मृत्यूनंतर थोरला मुलगा किर्तिवर्मा हा ई.स. ५६७ च्या सुमारास गादीवर आला.
सातवाहनांची सत्ता संपुष्टात आल्यावर दक्षिणेत ज्यांनी आपली सत्ता वाढवली त्यात पश्चिम कर्नाटकावर कदंब, कोकणावर मौर्य आणि त्याच्या पूर्वेस बहुदा नळदुर्ग भागावर नळ नामक राज घराणे राज्य करत होते. आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत कीर्तीवर्म्याने कोंकणातील मौर्य आणि नल राजांचा पराभव करून उत्तर कोकण, बेल्लारी, कुर्नुल आणि उत्तर कानडा म्हणजेच कारवार हा भाग आपल्या राज्याला जोडला. त्याच प्रमाणे त्याने कदंब राजा कृष्णवर्मा याच्या कडून वनवासी सुद्धा जिंकून घेतले. उत्तरेकडे बंगाल आणि बिहार पर्यंत त्याच्या फौजा पोहचल्या होत्या. तसेच दक्षिणेकडे चोल व पांड्य राजांवरही त्याने आक्रमण केले होते असे दिसते. मात्र यात अतिशयोक्ती असावी असे काही विद्वानांचे मत आहे.
राजा किर्तीवर्म्याची सौंदर्यदृष्टी सुद्धा कौतुकास्पद होती. बदामीच्या लाल पिवळ्या पर्वतात अत्यंत सुंदर आणि मनोहारी लेणी खोदण्याचे काम याने सुरू केले, सोबतच या पर्वताच्या पायथ्याशी अत्यंत रमणीय असं अगस्त्य सरोवर बांधून घेतलं. कीर्तीवर्मानं बदामीला अधिक शोभिवंत केलं हे दुसऱ्या पुलकेशीच्या चिपळूण ताम्रपटावरून समजते.
कीर्तीवर्मा हा राजकारणचतुर व शास्त्रात निपुण होता. व्याघ्रस्वामी नामक राजनीतीविशारद पुरुष त्याचा मुख्यमंत्री होता. किर्तीवर्म्याने अनेक दाने दिलेली दिसतात. त्यातील तुलगल नावाचे गाव कृष्णस्वामी नावाच्या वेदपारंगत ब्राह्मणास दान दिल्याचे उल्लेख आहेत.
अतिशय सफल आयुष्य जगलेला कीर्तीवर्मा सन ५९७ मध्ये कालवश झाला. त्यावेळी त्याचा पुत्र दुसरा पुलकेशी हा अल्पवयीन होता आणि म्हणून किर्तीवर्म्याच्या लहान भावाने मंगलीशाने कारभार आपल्या हाती घेतला.
त्याची माहिती पुढील भागात घेऊ.
क्रमशः
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.
३) प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...