विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २५ त्रिपुरीराज्यसंस्थापक वामराजदेव..

 




प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग २५
त्रिपुरीराज्यसंस्थापक वामराजदेव...
सन ६२० च्या सुमारास बुद्धराजाचा पराभव होऊन कलचुरी साम्राज्य जवळपास नामशेष झाले होते. मात्र सातव्या शतकाच्या अखेरीस वामराजदेव नामक महत्वकांक्षी राजा कलचुरी घराण्यात होऊन गेला. त्यावेळी दक्षिणेत चालुक्य राज्यसत्ता अत्यंत प्रबळ होती. याउलट मध्य-भारतात हर्षाच्या मृत्यूनंतर सर्वत्र गोंधळ माजलेला होता. ही परिस्थिती लक्षात घेता वामराजदेवाने मध्य-भारतात आपली राज्यसत्ता बळकट करण्यास प्रारंभ केला. त्याने कालंजर या अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्यावर हल्ला चढवून तेथे आपले ठाणे वसवले. तेथून त्याने बुंदेलखंड व बघेलखंड जिंकून घेऊन सध्याचे प्रतापगड, रायबरेली हे जिल्हे पादाक्रांत केले. त्यानंतर श्वेतपद म्हणजेच आजच्या गोरखपूरचा परिसर जिंकून घेऊन तेथील राज्य आपला लहान भाऊ लक्ष्मणराज याला दिले. या लक्ष्मणराजाच्या वंशजांनी त्या भागावर अनेक वर्षे राज्य केले, त्यांना ' सरयुपुरचे कलचुरी ' असे म्हणतात.
वामराजदेवाचे राज्य आता गोमती नदी पासून दक्षिणेत नर्मदेपर्यंत पसरले होते. आणि म्हणूनच त्याने त्या काळातील पद्धती प्रमाणे 'परमभट्टारक ', ‘महाराजाधिराज’, ’परमेश्वर’, या सम्राट निदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. वामराजदेवाच्या दोन राजधान्या होत्या. कालंजर आणि त्रिपूरी. कालंजर ही त्याची लष्करी दृष्टीने केलेली राजधानी होती. त्यामुळे नंतरचे दक्षिणेतील कलचुरी राजे स्वतःस ' कालंजरपुरवरधिश्र्वर ' असे बिरूद मोठ्या अभिमानाने धारण करताना दिसतात. त्याकाळी कालंजर आणि चित्रकूट हे दोन किल्ले लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. ते ज्यांच्या ताब्यात असतं त्यांस आपले वर्चस्व उत्तर भारतात स्थापणे सोप्पे जात असे. त्यामुळे पुढे दक्षिणेतील राष्ट्रकूट राजांनी सूध्दा हे दोन्ही किल्ले आपल्या ताब्यात ठेवल्याचे कोरीव लेखांतून समजते. वामराजदेवाने कालंजर ही जरी लष्करी राजधानी केली असली, तरी त्याला नर्मदा नदीचा पवित्र काठ सोडायचा नव्हता त्यामुळे त्याने त्रिपुरी म्हणजेच आजचे तेवर (जबलपूर पासून सहा मैल लांब ) ही आपली दुसरी राजधानी केली. त्रिपुरी हे नगर भारतातील अनेक प्राचीन नगरांपैकी एक होते, याचे उल्लेख महाभारतात देखील सापडतात. युधिष्ठीराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी सहदेवाने त्रिपुरीच्या राजाचा पराभव केला असा उल्लेख आहे.
वामदेवराजाच्या काळापासून कलचुरींना 'चेदी देशाचे राजे ' किंवा ' चैद्य ' म्हणण्यास सुरुवात झाली. प्राचीन काळापासून चेदी देशांत यमुनेच्या दक्षिणेचा व चंबळ नदीच्या आग्नेय दिशेचा नर्मदे पर्यंत पसरलेला प्रदेश यायचा व यातील बऱ्याचशा भागावर कलचुरींचे राज्य असल्याने त्यांना 'चेदीनृपती' असे म्हणत.
वामराजदेव हा त्रिपुरीच्या कलचुरी घराण्याचा संस्थापक असल्याने त्याचे नाव त्याच्या वंशजांच्या ताम्रपटात अत्यंत आदराने दिलेले आढळते. कलचुरी नृपती कर्ण, यशःकर्ण, गयाकर्ण, जयसिंह, विजयसिंह अशा राजांच्या ताम्रपटात वामराजदेवाचा उल्लेख 'परमभट्टारक - महाराजाधिराज - परमेश्वर - परममाहेश्वर - वामदेव - पादानुध्यात ' असा गौरव पूर्वक केलेला दिसतो.
याच्या नंतरच्या जवळपास शंभर वर्षांच्या कालावधीतील राजांची नावे आज इतिहासला माहीत नाहीत. त्या बद्दलचा कोणताही शिलालेख सापडलेला नाही. साधारण सन ८४१-८४२ च्या कालावधीत राजगादी वर आलेल्या प्रथम लक्ष्मण राजाचा शिलालेख मात्र आज सापडलेला आहे. त्याची माहिती पुढील भागात घेऊ.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...