विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग २९ महाप्रतापी राजा कर्ण...

 


प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग २९
महाप्रतापी राजा कर्ण...
सन १०४१ मध्ये गांगेयाचा पुत्र कर्ण हा राजा झाला. हा आपल्या पित्यापेक्षा सवाई निघाला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ७-८ वर्षातच त्याने अनेक विजय मिळविले.
प्रथम त्याने वंग ( पूर्व बंगाल ) वर स्वारी करून तेथील गोविंदचंद्र नामक राजाला पदच्युत केले आणि ते राज्य आपला विश्वासू असलेल्या विजयवर्मा याला दिले. सोबतच विजयवर्माच्या जातवर्मा नामक मुलाला आपली कन्या वीरश्री देऊन हा संबंध अधिक दृढ केला. या विजयानंतर त्याने दक्षिणेतील पल्लव, कुंतल, आणि चोल वंशीय राजांचा पराभव केला.
यानंतर कर्णाने गुर्जराधिपतीचा देखील पराभव केला. मात्र नंतरच्या काळात कर्णाने गुर्जरनृपती भीम याच्याशी राजनैतिक सख्य केलेले दिसते.
'कर्णाच्या स्वारीची वार्ता ऐकताच गुर्जररमणींच्या गालांवर काज्जलयुक्त अश्रू गळत असत आणि त्यांच्या भालावरील सौभाग्य निदर्शक तिलक नाहीसा होई ' असे काव्यमय वर्णन कोरीव लेखात आले आहे.
अश्या प्रकारे आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या सात वर्षातच कर्णाने आपल्या सामर्थ्याची चुणूक अनेक राजांना दाखवून दिली. याच काळात माळव्याचा ( धाराधिपती) राजा भोज हा निधन पावला. याच संधीचा फायदा घेण्यासाठी कर्णाने गुर्जरनृपती भीम याच्याशी संधान साधले. या दोघांनी दोन दिशांनी माळव्यावर आक्रमण केले. त्याची राजधानी धारा काबीज करून जयसिंह नामक भोजाच्या उत्तराधिकारीला पदच्युत केले. पुढे कर्णाने संपूर्ण मालव देशच आपल्या राज्यास जोडल्याने त्याचे भीमाशी वैमनस्य उत्पन्न होऊन भीमाने कर्णाच्या राजधानी पर्यंत चाल केली. तेव्हा कर्णाने त्यास लुटितील काही भाग आणि भोजाची सुवर्ण मंडपिका देऊन त्याची समजूत घातल्याचे उल्लेख मेरूतुंगाच्या ' प्रबंधचिंतामणी ' या ग्रंथात आले आहेत.
यानंतर कर्णाने चंदेलांवर आक्रमण करून चंदेल राजा देववर्मा याला ठार मारले आणि त्याचे राज्य जिंकून घेतले. या घटनेचा उल्लेख बिल्हणाने ' कर्ण हा कालांजर गिरीपती चंदेल नृपतीला काळा सारखा होता', अश्या शब्दात केला आहे.
या विजयानंतर कर्णाने मगध आणि गौड देशांचा राजा असणाऱ्या तृतीय विग्रहपाल याच्या राज्यावर हल्ला केला. या राजाने कर्णास मोठी खंडणी देऊन आपले सिंहासन व जीव वाचवले असे हेमचंद्र याने म्हटले आहे. या विजयाची निशाणी म्हणून कर्णाने तिथे आपला विजयस्तंभ उभारला. याचे अवशेष आज बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात पाईकोडे येथे सापडले आहेत.
याप्रमाणे सन १०५२ च्या सुमारास हा महाप्रतापी राजा यशाच्या उत्कर्षावर पोहचला होता. त्याने परमार आणि चंदेल ही राज्ये जिंकून घेतली होती. उत्तरेस त्याच्या राज्याची सीमा आता किर ( कांगडा) देश पर्यंत पसरलेली होती. पूर्वेस असलेले पाल आणि वर्मन ही दोन्ही घराण्याशी त्याने वैवाहिक संबंध जोडलेले होते. पश्चिमेच्या गुर्जर राजांशी त्याचे संबंध सलोख्याचे होते. दक्षिणेतील चोल आणि चालुक्य राजांचा ही त्याने पराभव केला होता. अश्या रीतीने त्याने उत्तर भारताचे चक्रवर्ती पद प्राप्त केले होते. ते जाहीर करण्याकरिता त्याने सन १०५२ मध्ये स्वतः स दुसऱ्यांदा राज्याभिषेक करून घेतला.
या नंतरचा कर्णाचा प्रवास पुढील भागात बघू...
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...