विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 June 2023

|| कलगीवाले कवडे तालिम, पंढरपूर. ||

 


|| कलगीवाले कवडे तालिम, पंढरपूर. ||
घरची भली मोठी शेती, पंढरीत अनेक वाडे आणि विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात मोठा हिस्सा असे घरचे गडगंच असणाऱ्या बडवे घराण्यातील गंगाई नामे विधवेने आपल्या मयत भावाच्या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी मराठवाड्यातून त्यांना पंढरीत आणले. त्यांचे संगोपन पालन पोषण केले. उत्तम शिक्षण दिले. उचित कन्या पाहून विवाहही करून दिला. पण आपण पतिविहिन आहोत आपणास पती आधार नाही. पण म्हणून जन्मभर माजघरात बसून केवळ तांदूळ निवडत बसावे वा लोकांच्या सुखदु:खाच्या केवळ गप्पा एेकाव्या हे तिला मान्य नव्हते. लोकांसाठी आपण काही केले पाहिजे. आपला जन्म नुसता तांदुळ निवडायसाठी नाही. त्यातून घरी सधनता आहे. बडवे घराण्याच्या वृत्तीने आपण समाज हितासाठी काही करावे असे सतत वाटे. पण काय करावे? हे काही तिला सुचत नव्हते. वारंवार विचार करून मार्ग दिसत नव्हता. वारंवार ती पांडुरंगाला विनवित होती. काही मार्ग दाखव. ज्याने मला लोकहित सादता येईल. अन समाधान मिळेल. आपण लोकासाठी काही करू शकलो या सुखाने मरता येईल म्हणून म्हातारी बेचैन जगत होती. यज्ञ, याग, जप तप ब्राह्मणभोजन, गोरगरिबांसाठी अन्नदानाच्या उदंड पंगती उठविल्या. दाने केली अनेक गोष्टी करून पाहिल्या तरी म्हातारीला काही तरी राहिल्यासारखे वाटे. पूर्वचांची विठ्ठलसेवा चा वारसा पुढे चालविणेसाठी, स्वत: चे घर चालविण्यासाठी पोटी पुत्र नाही म्हणून भावकीतला नेटका पोरगा दत्तक घेतला. तरी मनाची रूखरूख काही कमी झाली नाही.
आपण इहलोकी येवून परलोक प्राप्तीसाठी काही केले पाहिजे. पोटी पुत्र हवा. देवाने तो दिला नाही तरी दत्तक घेण्याची धर्मबुद्धी दिली तसा तो घेतलाही. परोपकार करावा. आपले हातून दानधर्म घडला पाहिजे अशी इच्छा असल्याने अनेकवार देवद्वारी दाने केली. तिर्थाटन केले. बापाविना पोरक्या झालेल्या भाच्यांना त्यांचे पायावर उभे केले. पण हा परोपकार नाही. ते तर धर्मदत्त कर्तव्य झाले. लोकासाठी काही करावे हि भावना गंगाईला स्वस्थ बसू देईना.
अन् एके दिवशी बुद्धीत प्रकाश पडला. युक्ति सुचली. नामी युक्ती. आता बस् तेच करायचे. घराचे बांधकाम करते वेळी घराचे पूर्वेला असलेला कोस तसाच सोडून घराचे चौरस बांधकाम केले होते. तो कोस तसाच पडला होता. पडिक. रस्त्याकडे सुमारे २० फूट रुंद जी मागे कमी होत ८-९ फूट झालेली. आणि आत ४० फूट लांबी. ज्याला घरात कळी म्हटले जायचे. म्हातारीला या कळाची आठवण झाली. कळी म्हटले तरी चांगली ३००- ४०० चौ फूट जागा होती. तिने पोराकरवी बोलावणे पाठविले. पण कोणाला? पहिले आपल्या वकीलाला. मग माहितीतल्या वस्तादाला. आणि कुळाच्या उपाध्यायला. तिघेही आले. गंगाईने आपला मनोदय त्याचेपुढे सांगितला. हि कळी तालिमासाठी द्यायचा. कुस्ती करणाऱ्या पोरांसाठी वस्ताद जागेच्या शोधातच होते. पोरं कुस्ती करत होते पण हक्काचा जागा नव्हता त्यामुळे पोरांची अबाळ होत होती. आता तर आयतेय तालिमीला जागा मिळतेय पोरांची सोय होतीय. त्यातच वस्ताद आनंदी झाले. त्यांना परमानंद झाला. आंधळा माहतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे असेच त्यांना झाले.
गंगाईने वकिलाला दानाची कागदपत्रे करायला सांगितले. उपाद्धायांचे मंत्राचे उच्चारणात घरात दानाचा संकल्प सुटला. म्हातारीने हातावरून पाणी सोडले. आता कागदोपत्रीही दस्त तयार करून दिला. जागा ताब्यात देवून बांधकामही करून दिले. मधे चौरस सुमारे १२ x १२ चा गुडघ्याएवढ्या खोलीचा दगडी बांधणीचा लाल मातीचा आखाडा त्याचे कडेला बसण्याएवढा कठडा, एके बाजूला मेहनतीसाठी जागा, हौदा आणि त्या जागेवर पत्रा घातला. त्या पलिकडे मोकळे परस ठेवले. तीच ही पंढरपूरची प्रसिद्ध कलगीवाले पक्षाची कवडे तालिम. वस्ताद होते दत्तोबा कवडे म्हणून कवडे तालिम.
कवडे वस्तादांनी मग पोरं घडवायला सुरूवात केली. बामनाची अन् बुरूड, लोणारी, गवळी साळी, माळी या सारख्या गरिब घरातील पोरं इथं नित्य नेमान पहाटे अन् सायं सुरात घुमायला लागली. कुस्ती करत्या पोरांच्या शड्डूच्या तोफखान्याने गल्ली दणाणून चालली. तो आवाज एेकून परिसरातली पोरे सोरं वाढायला लागली. म्हातारीला कृतार्थ वाटू लागले.
गरिबाघरची ही पोरं मेहनत करतील. अगदी जीव तुटेस्तोवर धावतील. शेकड्यानी दंड, बैठका सपाटे चक्री जोराने तालीम भरून जाईल, हौदा जड खोऱ्याने अनेकदा पलटून घामाने माती भिजवतील, पोरं पार रक्ताचे पाणी करणारे श्रम करतील. पण त्यांचे नुसती मेहनतीने भागत नाही, त्यांचे पोटाचीही जुळणी झाली पाहिजे. नाही तर पोर खुराकाविना वठून जातील. वस्तादांनी म्हणून पैसेवाल्या दात्यांची भेटी करून तीही काळजी संपविली. पंढरीच्या अनेक धनिकांनी दत्तोबांच्या हाकेला साद घालून कुणी दूध, कुणी तूप, कुणी बदामाचे ठिके पोरांसाठी देवू केले. दत्तोबा कवडे वस्तादांनी अगदी जीव लावून पोरं घडविली. जसा शिल्पकार मन लावून मूर्ति घडवितो तशी. एक एक मूर्ति अगदी बजरंगबली सारखी घडायला लागली. चित्रात रेखल्यासारखी पोरं दिसायला लागली. केळीच्या खुंटासारख्या बळकट मांड्या, बेंडकुल्या भरल्यागत दंड, चौरस पाठी, तिर्री कोरल्यागत छाती असे जणू कोरीव पुतळेच तालमीत घडायला लागले. ज्यात पंढरपूरच्या कुस्तीक्षेत्रात नावं घ्यावीत असे नारायण पुजारी, विठ्ठल भिसे, व्हंकारे पैलवान, शंकर साळुंखे, अर्जुन शेळके, विठ्ठल लोणारी, दत्ता बुरूड, असे अनेक कर्ते पैलवान झाले. त्यांच्या श्रमानी अन् घामानी तालिम चिंब झाली.
पण येवढ्यावर थांबतिल ते वस्ताद कसले. नाविन्याचा ध्यास असलेल्या वस्तादांनी मुलांबरोबर राही नामक मुलीलाही कुस्तीचे सारे धडे बैजवार दिले. तिनेही नाव कमावले. गुरूच्या विश्वासाला सार्थ ठरविले. महाराष्ट्रात कुस्ती करणारी महिला पैलवान म्हणून किर्तीमान झाली. ती मैदानात मुलांबरोबर इरेने कुस्ती करू लागली. पोरं पटाटा पालथे घालू लागली. तीच्या मैदानात येण्याने मैदानातले पोर पळू लागले. आपल्याला दंगल सिनेमातली पंजाबातली गीता फोगट माहितेय पण पंढरीची "राही" मात्र त्यामानाने आजच्या मराठी जनांना वा पंढरपूरकरानां माहितीच नाही. याच तालमीच्या पैलवान असणाऱ्या जीवन पाटील सरांनी त्यावर झाक कादंबरीही लिहीली.
बांधकामानंतर तालिमीत कुस्तीचे दैवत हनुमंतरायाची स्थापना करण्यात आली. आमच्या आत्याबाई पार्वती पुजारी त्यांचे मालक वै. शंकरराव पुजारींसोबत प्रतिष्ठापनेला बसल्याची आठवण वयाचे ९० दीत आजही सांगतात.
कवडे वस्तादांनंतर तालिमीची धुरा आमचे मातामह नारायण सिताराम पुजारींनी चालविली. मेहनत कर्त्या पोरांनां लोणी, तूप, दूध यांची त्यांनी कमी पडू दिली नाही. प्रसंगी घरची वडिलार्जित जमिन गहाण पडली, पोटच्या पाचही पोराला खायला कमी घातले पण आपल्या तालमीत कष्ट करून कुस्ती करणार्या कुस्तीगीरांचा त्यांनी पोटच्या पोराहून जास्त सांभाळ केला. पुळुजचे प्रसिद्ध मल्ल बालारफी त्याचे वडिल शफि पैलवान, अफसर पैलवान येथे येवून लढतीचे धडे तरूणांना द्यायचे. आजोबांचे पश्चात आमचे हरिमामा, पै. विठ्ठल लोणारी, नगरसेवक वामन बंदपट्टे, आमचे आते भाऊ अभय इचगावकर आदी लोक तालमीची धुरा चालवित आहेत. वस्ताद प्रसंग परत्वे मलाही तालमीत बोलावून घेतात. सध्या सर्वत्र गाजत असलेला तात्या गवळी, कृष्णा गवळी हे बंधु याच तालमीचे पठ्ठे. तात्याने तर पंजाबात नाव कमाविले आहे.
एका महिलेने उभारणी केलेली, महिलेने लाला मातीत बसून हनुमंत स्थापिलेली, आणि महिला पैलवान निर्माण केलेली ही आगळी वेगळी तालिम त्यामुळेच पंढरपूरात किर्तिमान आहे. इथे कुस्ती मेहनत करून तीची कीर्ती वाढविणे हेच खरे तालिमीचे जतन. ते केलं तरच पंढरीची कुस्ती परंपरा टिकेल. ते करणे हे खरे तरुणाईचे काम. नाही तर पंढरीतल्या विशाल कुस्तीपरंपरा असणाऱ्या इतर तालमी बंद पडल्या तशी हि तालिमही कालौघात बंद होईल. मात्र तसे न होवो हि त्या सर्वशक्तीमान, मल्ल दैवत, हनुमंतरायाचे चरणी प्रार्थना.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...