चंद्रभागेत स्नान करून झालेवर वाळवंटातून गावाकडे वर येताना महाद्वार घाटावरून डावीकडे पाहिले की दिसतो भव्य दगडी बुरूजांचा किल्ला. वाटतो मराठेशाहीतला अजिंक्य योद्धा असणारा बुलंद किल्ला. पण तो काही किल्ला नाही. किल्लाच काय पण साधी गढीही नाही. ती आहे, नव्हे तो आहे शिंदे सरकारांनी बांधलेला वाडा. त्यांनी स्थापिलेल्या द्वारकाधिशाचे मंदिर. म्हणजे कृष्ण मंदिर. आपण महाद्वार घाटाकडे पाहिले की उत्तर बाजूला होळकर आणि दक्षिण बाजूला शिंदे यांचे भव्य वाडे दिसतात. जणू भासते सुलतानी सत्तेच्या संकटापासून पंढरीचे रक्षणासाठी सदैव सज्ज असल्यासारखे उभारलेत. जसे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षणार्थ ते उत्तरेत जरब बसविते झाले. त्यापायी इंदौर अन् ग्वाल्हेरात त्यांनी आपले ठाणे वसविले तसे हे त्यांचे पंढरीतले वाडे. त्यातला हा शिंदे सरकार वाडा.
घाटाच्या वर आले की डावी कडे दगडी कमरेएवढ्या जोत्यावर उत्तराभिमुख घडीव बांधणीचे दो बाजूला असणाऱ्या दगडी खांबावर कोरलेले भव्य दगडी कमानदार प्रवेशद्वार. त्याचा दगडी आम्रफलाचे तोरण. त्याचेवर तडफेने फडकणारा परमपवित्र भगवा ध्वज. ज्याचे रक्षणार्थ मराठ्यांनी आपले प्राण वेचले. केवळ जुन्या काळीच नाही तर आधुनिक भारताच्या मराठा सैन्य तुकडीचा ध्वजही भगवा आहे. शिवाय भारताचे सरसेनापती थोरात यांनी ही आम्ही भगव्या पट्टीसाठी लढतो असे म्हटले आहे. तो भगवा या दारावर दिमाखाने फडकतो. या दगडी बांधणीच्या द्वाराचे वर वीटांचे बांधकामात आहे तो शानदार नगारखाना.
द्वारातून आत जाता समोर उंच छातीएवढ्या जोत्यावर सुंदर बांधणीचे दगडी द्वारकाधिशाचे मंदिर. २४ खांबांवर उभारलेला सभामंडप. त्यांचे वरचे छतही दगडी छावण्याचेच. गाभाऱ्याला प्रदक्षिणा मार्ग. मंदिराभोवती मोकळे पैस अंगण. त्याबाहेर दगडी जोत्याच्या प्रशस्त ओवऱ्या त्यांचे छतही दगडीच. सारे कसे दणकट. बळकट. कायम टिकणारे. चिरंतन. त्यापलिकडे दक्षिणेला उंचवटा त्यावर गर्भागार. गाभाऱ्याचे दाराला चांदीने मढविलेले नक्षीदार काम. त्यातच जय विजय. आत उत्तर भारतीय शैलितील चांदीने मडविलेली छत्री ज्यात चतर्भुज भगवान कृष्णाची मुर्ती. जिने धर्मरक्षणार्थ हाती गदा, शंख, चक्रादी आयुधे धारण केली आहेत. शेजारी संगमरवरी राधा, सत्यभामेच्या सुबक मुर्ती. डाव्या हाती गरूड, गणपती. तर उजवी कडे पूजामुद्रेतील महाराणी बायजाबाई शिंदे यांची २ फुटी मुर्ती. पुर्वी येथे शाळिग्रामही पुजेत होते. या मंडपात महादजी शिंदेंपासून ते विद्यमान ज्योतिरादित्य राजे सिंदिया यांचे राजपोशाखातील फोटो लावले आहेत.
इथला द्वारकाधिश काळा तर त्याची सखी राधा आणि सत्यभामा गोऱ्या आहेत. जशा त्या खऱ्या होत्या. कारण कृष्ण काळ्या पाषाणातून तर दोन्ही देवी संगमरवरातून साकारल्यात. या साऱ्या देवतांना अलंकारही आहेत.
मंदिराभोवती मोठे अंगण. त्याबाहेर चारी बाजूला ओवऱ्या ज्यात भक्तगणांनी येवून खुशाल रहावे. विसावा घ्यावा. शिंद्यांच्या अन्नछत्रात भुक शमवावी. नित्य सुमारे २५ लोक जेवतील अशी अन्नछत्राची तरतूदही ग्वाल्हेर राज्ञी बायजाबाईंनी केली होती.
मंदिरावर चुना वीटकाम केलेले उत्तम शिखर. २ आमलकाचे शिखर असून त्यावर कळस आहे. या वाड्याचे आणि मंदिराचे स्थापत्य अभ्यासायला अनेक अभ्यासक पंढरीत आजही येतात ते वाड्याच्या विविध वैशिष्ठ्यांमुळे.
शिंदे घराण्याचे पंढरपूरचे नाते विशेष आहे. उत्तर हिंदुस्थावर आपला धाक बसविणारे महादजी शिंदे पंढरीचे वारकरी होते. त्यांनी पुज्य मल्लापा वासकरांकडून वारकरी संप्रदायाची माळ घातली होती. त्यामुळेच शिंदे घराण्यात विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आलू आहे . महाराणी बायजाबाई म्हणजे श्रीमंत दौलतराव शिंद्यांची पत्नी. या राणीसाहेब म्हणजे दुसऱ्या अहिल्यादेवीच. या जनकोजींच्या दत्तक माता. मोठ्या दानी. देव कार्यी सतत अग्रेसर. देवकार्यी आणि दानधर्माला त्यांचा हात कधी मागे नाहीच. त्यामुळे पंढरीस येणाऱ्या भक्तांचे सुविधेकरिता इथे मोठा खर्च करून हे मंदिर आणि १२५ खणांचा भव्य २ चौकी लाकडी असा वाडा त्यांनी सन १८४९ मधे बांधला. त्याकाळी खर्च केला रूपये १,२५,०००/- चा. या वाड्याचे बांधकाम खरेच मजबूत झाले की नाही हे पाहण्यासाठी मजल्यावरून हत्ती फिरवून पाहिल्याच्या गोष्टी अजूनही पंढरीत आवडीने एेकविल्या जातात.
ज्येष्ठ व|| ५ ला देव प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्याला स्वत: बायजाबाई राणीसाहेब उपस्थित होत्या. त्यावेळी सरकारातून इतका दानधर्म केला की याचकांची दाटी झाली. वाड्याचे दक्षिणद्वारी याचकांची चेंगराचेंगरी झाली पार गोंधळ उडाला. ढालाईतांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागले. दाराच चेंगराचेंगरी झाली आणि दार चिणले ते कायमचे. सहस्त्रो ब्राह्मणांच्या पंगती उठल्या. त्यावेळी एकूण सुमारे ७५ हजार रूपये दानधर्मी खर्ची पडले.
यावेळी बायजाबाईंनी विठ्ठल रूक्मिणी ची यथासांग सालंकृत पूजा केली. त्यावेली गंमत झाली. देवाचे ताट अन् आईसाहेबांचे ताट देवापूढे ठेवले गेले. अशी दागिन्याची ताटांची अनावधानाने अदलाबदल झाली. ज्यामुळे देवीचा दागिना देवाला आणि देवाचा देविला वाहिला गेला. आजही ते तसेच वापरले जातात.
शिंद्यांनी दिलेले हिऱ्याचे लफ्फे म्हणजे विठोबाच्या दागिन्यांचे वैभव आहे. या त्यांचे पंढरी भेटीवर स्वतंत्र असा बायजाबाईंचा पोवाडाही रचला गेला होता. मागच्या पिढीपर्यंतचे शाहिर गोंधळी तो पंढरीत सादर करून वाहवा मिळवायचे. कारण त्यात पंढरीचे आणि तत्कालिन व्यक्तिचे साद्यंत वर्णन होते.
बायजाबाईंनंतरही शिदे सरकारांच्या अनेक पिढ्या येथे येवून गेल्या आहेत. राजमाता विजयाराजे, सध्याचे केंद्रिय नेते ज्योतिरादित्य शिंदे हे ही पंढरीत येवून गेले आहेत. मात्र त्यांच्या पुर्वजांनी दिलेले बहुमुल्य दागिने मंदिर समितीने त्यांना इच्छा व्यक्त करूनही दाखविले नाही. पूर्वी अशी पद्धती होती. एखाद्या मान्यवराने देवाचे दागिने पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देवाचे अनमोल अलंकार अशा व्यक्तिला दाखविले जायचे. आजही तशे दागिने अर्पिण्याची एेपत आणि दानत असताना मंदिर समितीने तेवढे औदार्य दाखविले नाही. ते दाखविले असते तर कदाचित भगवंताचे संपत्तीत मौलिक भरच पडली असती.
या वाड्याचे व्यवस्थापन शिंदेनी आपले परंपरागत बडवे घराण्याकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही संस्थानी थाट होता. त्याची वै. बाळाकाका शिंदे बडवे यांची आठवण ते सदैव सांगायचे की त्यांचे अन् त्यांचे बंधु रामसखा, कृष्णसखा यांचे मुंजीची भिक्षावळीची मिरवणूक पुढे फरिगदगा, लेझिमवाले यांचे खेळ वाजंत्री उजेडासाठी बत्त्या अशी मोठी साग्रसंगित संस्थानी थाटात निघाली होती अन नव उपनित बटूला घोड्यावरून नव्हे तर हत्तीवरून मिरविले होते. शिंदे सरकरांचे बडवे असल्याने त्या घराण्याला आजही शिंदे बडवे म्हणूनच ओळखले जाते. तसेच सरकार म्हणून आदराने त्यांच्याशी आजही बोलले जाते.
या वाड्याचे पूर्वेच्या दारातून नदीचे वाळवंटीच उतरता येते. जवळच मुबलक पाणी असल्याने पूर्वी इथे घोडे, हत्ती, बैल बारदाना आदी मोकळ्या प्रांगणात असत. वाड्याचे पश्चिम बाजूचे दाराने आत जाता १ चौकात आता तिथे मेवा मिठाई संघाचा कारखाना आहे. बाहेर अनेकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत.
पूर्वी गोकुळअष्टमीला ९ दिवस मोठा उत्सव चालायचा. कथा जन्मोत्सवाची धमाल असायची. जेवणावळी झडायच्या. सारा गाव प्रसादाला वाड्याकडे धावायचा. कोणालाही हाकलून दिले जायचे नाही. द्वारकाधिश कृष्णाची पालखी रात्रौ हिलाल, दिवट्यांच्या उजेडात वाजत गाजत मिरविली जायची. दसऱ्यालाही देव शिलंगणाला पालखीने वाजत गाजत जायचे. कायम नेमणूकीचे घडशी, हरकामे, पुराणिक, कथेकरी, कारकून, १ कारभारी असा मोठा सरंजामच इथे होता.देवापुढे पुराणिक ८ महिने महाभारत, रामायण सांगे, तर ४ महिने भागवत चाले.
आता काळमानाने वाड्याचे वैभव ओसरले. संस्थानेच खालसा झाली. तर या संस्थानिकांची देवस्थाने आणि मंदिरे तरी कशी चालणार. त्यातून पुरोगामी लोकांचे देवाच्या मिळकतीवरच चित्त आहे. ते संस्थानिकांसारखे देवसाठी काही खर्च करणे एेवजी मोघलांप्रमाणे देवधन लुटणेस तत्पर वाटतात. तरिही शिंदे घराण्याचे सध्याचे वारसांनी या वाड्याचे पडझड झालेल्या भागाची दुरूस्ती हाती घेतली असून जुना बाज ठेवून जसेच्या तसे लाकडी बांधकाम सध्या चालू इथे. आहे.
या द्वारकादिशापुढे पंढरीतील अनेकांची उपनयन, विवाहादी कार्ये साजरी झाली आहेत. त्याच्या सुखद आठवणी समग्र पंढरीवासियांच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. त्यामुळे हा वाडा म्हणजे पंढरीचे स्मरणस्थान, वैभव आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. तो जपला पाहिजे.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.
No comments:
Post a Comment