विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 July 2023

करवीर गादीचे दिवाण-रत्नाकरपंत राजाज्ञा

 

# इतिहासाने नोंद घेतलेली दिवाण मंडळी
६-

करवीर गादीचे दिवाण-रत्नाकरपंत राजाज्ञा
लेखन ::- Prakash Lonkar
`` रत्नाकरपंत सुमारे २९ वर्षे करवीर राज्याचा कारभारी होता.अनेक अडचणीतून कोल्हापूर राज्याचा निभाव लावल्याबद्दल रत्नाकरपंताची वाहवा झाली आहे.तो निरिच्छ व स्वामीहीत्दक्ष असून यजमान इनाम देत होते ते सुद्धा त्याने घेतले नाही.याबद्दल रामशास्त्र्याप्रमाणे त्याचा लौकिक कोल्हापुरात गाजतो.
अव्वल मराठेशाहीत जसा रामचंद्रपंत अमात्य त्याच धर्तीचा रत्नाकरपंत राजाज्ञा करवीरच्या राज्यात निर्माण झाला..इतिहासास या पुरुषाचे ऋण अद्यापि फेडावयाचे आहे.``
हे गौरवोदगार जुन्या पिढीतील प्रख्यात इतिहासकार गो.स.सरदेसाई ह्यांनी करवीर गादीच्या chhatrapati शिवाजी महाराज(दुसरे)यांच्या रत्नाकरपंत राजाज्ञा (पंत) ह्या दिवाणांच्या बहुमोल योगदानाची चर्चा करताना काढले आहे. करवीर राज्याचे तिसरे राज्यप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज(दुसरे)यांची कारकीर्द इ.स.१७६२ ते १८१३ अशी सुमारे अर्ध शतकाहूनही अधिक काळाची झाली. यापुढे त्यांचा उल्लेख छ.शिवाजी महाराज म्हणून केला आहे. ते शककर्ते छ.शिवाजी महाराजांचे पणतू,छ.राजाराम महाराज- राणी राजसबाई यांचे नातू होय. रत्नाकरपंत इ.स.१७८३ ते १८०८ अशी पंचवीस वर्षे कोल्हापूर राज्याचे दिवाण होते. रत्नाकरपंतांचे मूळ उपनाम(आडनाव)सरवळे असून मूळ गाव सातारा जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील ऐतवडे हे होते. त्यांचे वडील रामाजीपंत यांच्याकडे ऐतव्ड्याचे कुलकर्णीपण होते. गावकऱ्यां बरोबर काही वाद झाल्याने रत्नाकरपंतांचे आजोबा शिवाजीपंत यांनी ऐतवडे गाव सोडून दिले आणि ते पन्हाळ्याला स्थायिक झाले.पुढे रामाजीपंतांना करवीर राज्यात् पोतनीसाचे काम मिळाले.कालांतराने रत्नाकरपंताना आधी पोतनीसाचे लेखनिक आणि नंतर पोतनीस पद मिळाले. अंगच्या गुणांनी त्यांनी आपल्या वरिष्ठांना प्रभावित केले ज्यामुळे प्रायः त्यांना फौजेच्या हिशेबाचे काम देण्यात आले.रत्नाकरपंत तत्कालीन कोल्हापूर राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे)यांचे ते लहानपणचे सवंगडी असल्याचे पण म्हटले जाते.
छ.शिवाजी महाराजांची कारकीर्द करवीर राज्याच्या दृष्टीने खूपच महत्वपूर्ण राहिली. कोल्हापूर राज्याच्या भोवती पटवर्धन,इचलकरंजीकर घोरपडे आणि सावंतवाडीचे भोसले यांचे प्रदेश होते.कोल्हापूर राज्य आणि त्याच्या शेजाऱ्यांत कायम कुरबुरी,भांडणे,तंटे होत असत.त्यामुळे करवीर राज्य नेहमी alert mode वर असायचे. छ.शिवाजी महाराजांच्या यशवंतराव शिंदे ह्या मुख्य कारभाऱ्याचे १ मे १७८३ रोजी निधन झाल्यावर त्यांच्या जागी रत्नाकरपंत करवीर राज्याचे दिवाण झाले. रत्नाकरपंत जसे राजकारणात कुशल मुत्सद्दी होते तसेच युद्धक्षेत्रात शूर लढवय्ये पण होते.त्यांनी छ.शिवाजी महाराजांना राज्यकारभारासंबंधी वेळोवेळी योग्य सल्ला दिला.अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात करवीर राज्याच्या इतिहासात रत्नाकरपंत राजाज्ञा आणि हिम्मतबहाद्दर प्रीतीराव चव्हाण ह्या उभयतांनी अनन्य साधारण महत्वाच्या भूमिका अदा केल्या. पेशवे, पटवर्धन, इचलकरंजीकर घोरपडे, सावंतवाडीकर, शिदोजीराव निपाणीकर इत्यादींशी करवीर राज्याचे जे लहानमोठे संघर्ष झाले त्या प्रत्येकात करवीर राज्याचे दिवाण म्हणून रत्नाकरपंतांचा सहभाग होता.
रत्नाकरपंत राजाज्ञानी दिवाणपदी असताना बजावलेल्या काही उल्लेखनीय कामगिऱ्या:
-सावंतवाडीकर भोसल्यांबरोबरच्या लढाया: सावंतवाडीच्या खेमसावंत भोसल्यांची स्वतंत्र राज्य प्रमुखाप्रमाणे आपल्यालाही मोर्चेल असावे अशी खूप दिवसांची इच्छा होती. त्यांचे आणि महादजी शिंद्यांचे सोयरे संबंध असल्याने महादजींनी मोगल बादशाहाकडून सावंतवाडीकरांसाठी मोर्चेलचा मान आणि ` राजेबहाद्दर `असा किताब मिळवून दिला.(इ.स.१७८५) छ.शिवाजी महाराज आणि सावंतवाडीकर भोसले यांचे संबंध अगोदरपासूनच ठीक नव्हते. सावंतवाडीकराना मिळालेल्या सन्मानामुळे त्यात आणखी बिघाड झाला. पेशव्यांनी या प्रकरणात करवीर राज्याच्या भूमिकेला पाठींबा देऊन करवीर राज्याच्या मदतीस सरदार हरिपंत फडके ह्यांना पाठविले. करवीर राज्याच्या फौजांनी इ.स.१७८७ मध्ये सावंतवाडीवर स्वारी करून त्यांचे बरेच किल्ले,ठाणी जिंकली. ह्यावेळी पोर्तुगीज फौज सावंतवाडीकरांच्या मदतीला आली. त्यामुळे करवीर फौजेस काही ठिकाणांहून माघार घ्यावी लागली पण त्यांनी जिंकलेली ठाणी मात्र परत केली नाही.सावंतवाडीकरांशी झालेल्या लढायात रत्नाकरपंत आणि सेनापती प्रीतीराव चव्हाण ह्या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
-आळत्याची लढाई करवीरकरांनी सावंतवाडीकर भोसल्यांचे जिंकलेले किल्ले ठाणी सावंतवाडीकर भोसल्यांस परत करावी म्हणून ते महाद्जीन्मार्फत करवीर राज्यावर सातत्याने दडपण आणत असत.महादजींच्या मागणीकडे पुणे दरबारने इ.स.१७९२-महादजी उत्तर हिंदुस्थानातून पुण्याला येयीपर्यंत विशेष लक्ष दिले नाही.महादजींनी खूपच नेट लावल्याने पुणे दरबाराने शेवटी आपले मातब्बर सरदार परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांस कोल्हापूरवर चालून जाण्याचे आदेश दिले.परशुरामभाऊ पेशव्यांच्या हुजुरातीचे काही सैन्य व पलटणे घेऊन तासगावला आले.त्यांनी लढाईची सूत्रे आपला मुलगा रामचंद्रपंताकडे सोपविली. रामचंद्रपंत करवीर राज्याच्या आळते ह्या ठाण्याकडे फौज घेऊन निघाल्याचे समजताच छ.शिवाजी महाराज २७ डिसेंबर १७९३ रोजी रामचंद्रपंतांवर चालून गेले.महाराजांनी आपल्या सैन्याचे दोन भाग करून एक तुकडी स्वतःकडे तर दुसरी रत्नाकरपंतांकडे सोपवली.ह्या दोन्ही तुकड्यांनी पटवर्धनांच्या फौजेस दोन्ही बाजूनी वेढले.रत्नाकरपंतानी पटवर्धनांच्या फौजेचा पाठलाग करून तिचा पराभव केला. स्वतः रामचंद्रपंतासहित पेशव्यांचे रास्ते,शिरोळे यांसारखे नामांकित सरदार करवीर फौजेच्या हाती लागले. रत्नाकरपंतानी जखमी रामचंद्रपंतास पालखीतून आणून छ.शिवाजी महाराजांच्या चरणांवर घातले.महाराजांनी रामचंद्रपंतांस पोषाख, अलंकार, दोन गावे इनाम देऊन महिनाभर त्यांच्यावर औषधोपचार करून रत्नाकरपंतांसमवेत सन्मानपूर्वक तासगावी रवाना केले.करवीर राज्याकडून रामचंद्रपंत पटवर्धनांचा पराभव त्यांचे वडील परशुरामभाऊ यांच्या फारच जिव्हारी लागला.छ.शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राला दिलेले जीवदान आणि सन्मानाची वागणूक हे महाराजांचे कर्तव्यच होते असे म्हणून परशुरामभाऊ रामचंद्रपंतांचा विरोध असूनही करवीर राज्यावर चालून गेले. परशुरामभाऊनी कोल्हापूरची सगळीकडून नाकेबंदी करून कोल्हापूरच्या तटबंदीवर नित्य तोफांचा भडीमार सुरु ठेवला. अखेरीस दोन्ही पक्षात तह होऊन परशुरामभाऊनी कोल्हापूरचा वेढा उठवला.
-कर्नाटकातील स्वाऱ्या: सवाई माधवरावांचा ऑक्टोबर १७९५ मध्ये निपुत्रिक अवस्थेत मृत्यू झाला. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावरून पुणे दरबारात न भूतो न भविष्यती अशी कट कारस्थाने,राजकारणे सुरु झाली. छ.शिवाजी महाराजांनी पुणे दरबारातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन इ.स.१७९७ मध्ये रत्नाकरपंत आणि हिम्मत्बहाद्दर प्रीतीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करवीर राज्यांच्या फौजा कर्नाटकातील पेशव्यांच्या मुलुखात घुसवल्या. चिकोडी, मनोळी, रामदुर्ग, नरगुंद, जमखंडी, गोकाक, हुबळी इत्यादी ठिकाणे काबीज केली, खंडण्या वसूल केल्या. पोर्तुगीजांनी कोल्हापूर राज्याचा बळकावलेला मुलुख मोकळा केला. कर्नाटक मोहिमेत सावनुर इथे हिम्मत्बहाद्दर प्रीतीराव चव्हाण आणि रत्नाकरपंत यांच्या तुकड्यांनी धोंडोपंत गोखले ह्या पेशव्यांच्या मातब्बर सरदाराशी कडवी झुंज घेतली. दोन्ही पक्षांची भरपूर हानी,नुकसान होऊन देखील कुणासहि विजय मिळाला नाही.करवीर राज्याजवळ ह्या वेळी पैसा,फौज आणि प्रत्यक्ष साह्य या सर्वच बाबतीत प्रतिकूलता असूनही,कर्नाटकात पेशव्यांच्या सरदारान प्रमाणे कुणी विश्वासू सरदार नसून देखील रत्नाकरपंत आणि प्रीतीराव चव्हाणांनी कर्नाटक मोहीम आपल्या अंगच्या कल्पकता, शौर्य आणि राजनिष्ठा यांच्या जोरावर यशस्वी करून दाखवली.ह्यावेळी महाराजांनी रत्नाकरपंतानचा ` राजाज्ञा ` पद देऊन गौरव केला.
-पट्टणकुडीची लढाई: सवाई माधवरावांच्या निधनानंतर बऱ्याच घडामोडी,कटकारस्थाने होऊन शेवटी राघोबादादा पुत्र दुसरे बाजीराव पेशवेपदी आरूढ झाले. (५ डिसेंबर १७९६) करवीरकरांच्या कर्नाटक मोहिमा, टिपू सुलतानचे पेशव्यांच्या मुलुखावरील हल्ले आणि सातारकर छत्रपतींचा उठाव अशा तिहेरी समस्यांना तोंड देण्यासाठी बाजीराव द्वितीय्ने परशुरामभाऊ पटवर्धन यांना नियुक्त केले.मराठे आणि इंग्रज यांनी हातमिळवणी करून श्रीरंगपट्टणला वेढा घातला होता. त्या वेढ्यात मे १७९९ मध्ये टिपू मारला गेला. कर्नाटकात इंग्रजांचा प्रवेश होऊन तेथील संपूर्ण राजकारण बदलून जाऊन करवीर राज्याला नवीन परिस्थितीत विशेष महत्वाचे स्थान राहिले नाही. टीपुवरील मोहीम उरकून परशुरामभाऊ जुलै १७९९ पासून आपला मोहरा कोल्हापूर राज्याकडे वळवला. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी कोल्हापूरच्या फौजाही तयारीत होत्या.स्वतः छ.शिवाजी महाराज सुद्धा आपल्या फौजांबरोबर होते. दोन्ही फौजांच्या अधून मधून परस्परांना अजमावण्याच्या दृष्टीने चकमकी उडत असायच्या.कोल्हापूरच्या फौजेचा तळ हमिदवाडा इथे पडला होता तर पटवर्धनांच्या फौजांचा मुक्काम तेथून आठ मैलांवर होता.इथे दोन्ही फौजांची समोरासमोर गाठ पडून झालेल्या निकराच्या लढाईत उत्तर मराठेशाहीतील मातब्बर सरदार परशुरामभाऊ करवीर फौजेच्या हातून मारले गेले. (१७ सप्टेंबर १७९९)परशुरामभाऊनच्या मृत्यूने पेशव्यांचे दक्षिणेकडील सामर्थ्य नाहीसे झाले. त्यामुळे छ.शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील पट्टणकुडीचा विजय सर्वात मोठा आणि महत्वाचा समजला जातो.
5- रामचंद्रपंतांकडून कोल्हापूरला वेढा (इ.स.१८००) परशुरामभाऊनच्या पराभवाचा आणि मृत्यूचा बदला घेण्यासाठी रामचंद्रपंतानी पुण्याला जाऊन पेशवे आणि नाना फडणीस यांच्याकडे फौजेची मदत मागितली.पेश्व्यानाही कोल्हापूरचे प्रस्थ वाढणे धोक्याचे वाटत होते. दौलतराव शिंद्यानी मेजर ब्राउनिंगच्या नेतृत्वाखालील २७ तोफांचे पथक,मानाजी फाकडे,मालोजी घोरपडे,गणपतराव पानसे,विंचूरकर,जाधव,पवार,धोंडोपंत इत्यादींची पथके रामचंद्रपंतांबरोबर होती.कोल्हापूर बाजूने प्रीतीराव चव्हाण,रत्नाकरपंत राजाज्ञा,चतुरसिंह भोसले,सरलष्कर पाटणकर,सेनापती नारायणराव घोरपडे आदि मंडळी होती.रामचंद्रपंतांच्या फौजेने कोल्हापूर शहराला वेढा घातला.शिंद्यांच्या पलटणीणे मोर्चेबंदी केली.कोटाभोवती मोठी लढाई होऊन तटबंदीला खिंडार पडले तेव्हा रत्नाकरपंतानी खिंडारा समोर जागोजाग मोर्चे बांधले. छ.शिवाजी महाराजांनी दौलतराव शिंदे आणि त्यांचे कोल्हापूरकर सासरे सर्जेराव घाटगे ह्यांना निरोप पाठवून कोल्हापूर शहराला चार महिन्यांपासून घातलेला वेढा उठण्याविषयी कळविले. दौलतरावानी महाराजांच्या निरोपास अनुकूल प्रतिसाद देऊन लढाई थांबविण्याचे आपल्या फौजेस आदेश पाठविले. जासुदाच्या चुकीमुळे दौलतरावांचे आदेश रामचंद्रपंतांच्या हाती पडले.त्यामुळे त्यांनी भावी घटनांचा रागरंग ओळखून आपल्या फौजेसह ३० एप्रिल १८०० रोजी रातोरात तासगावकडे प्रयाण केले.
- शिधोजीराव निंबाळकर उर्फ अप्पासाहेब निपाणकर यांच्या बरोबर सावगाव इथे लढाई छ.शिवाजी महाराज आणि अप्पासाहेब निपाणकर यांचे संबंध फार पूर्वीपासूनच तणातणीचे राहिले होते.निपाणकरना बाजीराव द्वितीय चे साह्य असल्याने कोल्हापूर,कर्नाटक भागातील लहान मोठे सरदार हि त्यांना सामील होते. फेब्रुवारी १८०८ मध्ये शिधोजीरावांचा बंदोबस्त करण्यासाठी छ.शिवाजी महाराजांनी रत्नाकरपंतना फौज आणि तोफखाना घेऊन पाठवले. पण नंतर राजाज्ञाना कोल्हापूर शहराच्या बंदोबस्तास ठेवून स्वतः महाराज फौजेबरोबर गेले. दोन्ही पक्षांच्या गाठी सावगाव इथे पडल्या.कोल्हापूर फौजेत निपाणकरानी फितुरी घडवून आणली.महाराजांचे सरलष्कर नारायणराव पाटणकर निपाणकरांचे मावसभाऊ होते. ऐन वेळी त्यांनी बाजू बदलली. ४ फेब्रुवारी १८०८ रोजी उभय फौजात झालेल्या लढाईत करवीरच्या फौजांचा पराजय झाला. दस्तुरखुद्द महाराज पण यात भाला लागून जखमी झाले. रायाजी जाधव जप्तनमुल्क यांनी मोठ्या शिताफीने महाराजांना सुरक्षित जागी नेले.कोल्हापूर फौजेच्या पराजयाची आणि महाराज जखमी झाल्याची बातमी कोल्हापुरात बंदोबस्त करत असलेल्या राजाज्ञाना कळताच त्यांनी महाराजांच्या शोधासाठी रात्रीच सगळीकडे स्वार रवाना केले.वाड्याचा व शहराचा बंदोबस्त करून स्वतः विजापूर वेशीच्या दरवाजात जाऊन बसले.महाराज रुकडीजवळ आल्याची बातमी रत्नाकरपंताना कळताच त्यांनी शहरात साखर वाटली,महाराजांना सामोरे जाऊन चरणी मस्तक ठेवले.महाराज सुखरूप परत आले हाच मोठा लाभ झाला,प्रतिसृष्टी करू,निपाणकराची काय कथा? असे धीराचे शब्द देऊन सांत्वन केले.
अशा प्रकारे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ रत्नाकरपंत राजाज्ञानी कोल्हापूर राज्याची निरपेक्ष,निरलसपणे सेवा केली.त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला कर्तृत्व दाखविण्यास वाव मिळत नाही अशी तक्रार कोल्हापूर दरबारातील सयाजीराव जाधव सरनोबत आणि हैबतराव गायकवाड विश्वासराव ह्या कर्त्या सरदारांनी छ.शिवाजी महाराजांकडे केली. नाईलाजाने महाराजांनी रत्नाकरपंताना जड अंतःकरणाने करवीर राज्याच्या सेवेतून मुक्त केले. (१८०८-०९) ह्याच दरम्यान प्रीतीराव चव्हाण यांचे सावनुरच्या लढाईत झालेल्या जखमांमुळे निधन झाले. ह्या दोघांच्या राज्य कारभारात नसल्याने सर्व कारभार विस्कळीत होऊन गेला. शिधोजीरावांनी याचा फायदा घेउन पुन्हा इ.स.१८११ मध्ये कोल्हापूरवर आक्रमण करून करवीर फौजेस पराभूत केले. कोल्हापूर राज्य बाह्य शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी छ.शिवाजी महाराजांनी इंग्रजांबरोबर १ ऑक्टोबर १८१२ रोजी मैत्रीचा करार केला, ह्या करारानंतर सहा महिन्यांनी महाराजांचे निधन झाले.(२४ एप्रिल १८१३) रत्नाकरपंत मे १८१९ मध्ये मृत्यू पावले.
-- Prakash Lonkar
संदर्भ:१-करवीर रियासत ले.स.मा.गर्गे
२-मराठी रियासत. खंड ८ ले.गो.स.सरदेसाई
३-मराठ्यांचा इतिहास खंड तिसरा-संपादक अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...