विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 July 2023

नारायणराव पेशव्यांच्या वधोत्तर घडामोडी.

 



नारायणराव पेशव्यांच्या वधोत्तर घडामोडी.
लेखक ::प्रकाश लोणकर
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यू नंतर(18-11-1772)त्यांचे धाकटे बंधू नारायणराव १३ डिसेंबर 1772 रोजी पेशवेपदी स्थानापन्न झाले.त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांनी म्हणजे 30 ऑगस्ट 1773 रोजी गणेशोत्सवाची सांगता होण्यास अवघा एक दिवस बाकी असताना,आजपासून २४९ वर्षांपूर्वीवव (अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी,भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १६९५) राघोबा दादांच्या( दादा) सांगण्यावरून भाडोत्री शिपायांनी(गारदी)भर दुपारी नारायणराव पेशव्यांची हत्त्या केली.नारायणरावांच्या हत्त्येचे तीन कट रचण्यात आले होते.पहिल्या कटात नारायणरावांच्या नजर कैदेत असलेल्या दादांची मुक्तता करून त्यांना पुण्याबाहेर नेऊन फौज उभी करून देऊन नारायणरावांस गुडघे टेकायला लावायचे असे नियोजन होते.ह्या कटाचे सूत्रधार नागपूरकर मुधोजी भोसल्यांचे वकील व्यंकटराव काशी,लक्ष्मणराव काशी तसेच पुणे दरबारातील बुजुर्ग सरदार सखाराम हरी गुप्ते होते.कटासाठी लागणारे द्रव्यबळ आणि हिम्मत कमी पडल्याने हा कट बारगळला.दुसरा कट भवानराव प्रतिनिधी,सदाशिव रामचंद्र,विठ्ठल विश्राम,चिंतो विठ्ठल आणि सखाराम बापू बोकील यांनी रचला होता.ह्यात दादांची सुटका करून नारायणरावांस कैदेत टाकून त्यांच्या जागी दादांस पेशवा करण्याचा विचार होता.हा कट सुद्धा पेशव्यांच्या निष्ठावान सरदारांच्या भीतीने अंमलात येऊ शकला नाही. तिसऱ्या कटाचे मुख्य सूत्रधार दादा आणि सुमेरसिंग गारदी यांचा असा विचार होता कि नारायणरावास धरावे असे करताना विरोध झाला तर जीवे मारण्यास पण मागेपुढे पाहू नये,कारण कट असफल झाला तर पेशव्यांचे निष्ठावंत कटात सामील मंडळीना सहीसलामत जाऊ देणार नाहीत. तिसऱ्या कटाची कुणकुण रघुजी आंग्रे यांना लागली होती.त्यांनी नारायणरावांना त्या दिवशी शनिवारवाड्यावर जाऊ नये असा इशारा पण दिला होता.पेशव्यांचे सेनापती हरिभाऊ फडके यांना पण असं काही विपरीत घडण्याची शक्यता असल्याचे कळविले गेले होते.पण नारायणराव आणि हरिभाऊ ह्या दोघांनी हे इशारे विशेष गांभीर्याने घेतले नाही.ह्या दोघांनी धोक्याच्या सूचना गांभीर्याने न घेणे नारायणरावांच्या जीवावर बेतले.
नारायणरावांच्या हत्त्ये प्रसंगी मारेकऱ्यांनी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांना अडविणाऱ्या सात ब्राह्मण,एक हुजऱ्या,एक नाईक,दोन कुणबिणी अशा अकरा व्यक्तींना ठार केले.तसेच यावेळी एक गाय पण मारली गेली.दादांच्या आज्ञे नुसार त्रिंबकमामा पेठ्यांनी नारायणरावांच्या तुकडे तुकडे झालेल्या शवाचे अंतिम संस्कार मुठा नदीच्या काठी रात्री अत्यंत गुपचुपपणे उरकले.त्याच दिवशी रात्री तत्कालीन रूढी नुसार नारायणराव यांची पत्नी गंगाबाईच्या केशवपणाचा विधी पार पडला.दादा घरात सूतक असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी दरबार भरवून ‘ वैऱ्याचे सूतक कशाला पाळायचे?असे निर्लज्जपणे सांगून पेशव्यांच्या मसनदीवर जाऊन बसले.तसेच आपण पेशवेपदी आरूढ झाल्याची दवंडी पुणे शहरात दादांनी पिटवली.गारद्यांना दोन किल्ले आणि आठ लाख रुपये देऊन दादांनी त्यांना शनिवारवाड्या बाहेर काढले.18 सप्टेंबरला दादांनी नारायणरावांचे मारेकरी महमद इसाफ आणि सुमेरसिंग गारदी यांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव केला. नारायणरावांच्या दहाव्या दिवशी ओंकारेश्वरी तिलांजली साठी जमलेल्या मंडळींपैकी त्र्यंबकमामा पेठे,सखारामबापू बोकील,नाना फडणवीस,हरिपंत तात्या फडके,यांनी नदीतील वाळूचे शिवलिंग बनवून त्यावर हात ठेवून शपथ घेतली कि ते थोरल्या पातीशीच ( नानासाहेब)एकनिष्ठ राहतील,दादांच्या वंशास नमस्कार करणार नाही. दुसरीकडे दादांनी आपला दत्तक पुत्र अमृतरावला साताऱ्याला छत्रपती रामराजांकडे आपल्यासाठी पेशवाईची वस्त्रे( नियुक्ती पत्र)आणण्यास रवाना केले.३१ ऑक्टोबर १७७३ रोजी दादांनी पुण्याजवळील आळेगाव इथे पेशवाई ची वस्त्रे स्वीकारली.मधल्या दीड दोन महिन्यात न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावांच्या हत्तेची चौकशी पूर्ण केली.चौकशीअंती त्यांनी या प्रकरणात दादा मुख्य सूत्रधार असल्याचे जाहीर केले.पेशव्याचा खून करणारी व्यक्ती पेशवा बनून कारभार करण्यास सर्वथैव अपात्र असल्याचे त्यांनी दादांस सांगितले.रामशास्त्रीना नारायणराव हत्त्याकांडात दादांची पत्नी आनंदीबाई हिचा सहभाग असल्याचे आढळले नाही.स्त्रियांना त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल या राज्यात शिक्षा नसल्याने कटातील म्होरक्यांनी आपल्या बचावासाठी नारायणरावांच्या वधाचे खापर धूर्तपणे आनंदीबाईवर फोडल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.न त्यांनी आनंदीबाईंची चौकशी केली न बारभाईनी ` ध `चा ` मा ` कुणी केला याची सखोल चौकशी करावी म्हणून रामशास्त्रींकडे आग्रह धरला.मराठेशाहीचा ताबा घेतल्या नंतर इ.स.१८२४ आणि १८२६ मध्ये इंग्रजांनी पेशवे दफ्तराचा सखोल अभ्यास केल्यावर त्यांना सुद्धा ध चा मा करण्यात आनंदीबाई चा सहभाग असल्याचे सूचित करणारे पुरावे मिळाले नाही.आजतागायत कुणाही इतिहास संशोधकाला याबाबतचा पुरावा मिळालेला नाही.त्यामुळे रामशास्त्री प्रभुणेनचे आनंदीबाईस दोषी न धरणे योग्य दिसते.
पेशवे घराण्यातील आपल्या स्थानाकडे पाहून दोष परिहारार्थ रामशास्त्री आपणास ब्राह्मण भोजन,यज्ञयाग जपजाप्य यासारखी छोटी मोठी प्रायश्चित्ते घ्यायला सांगून सोडून देतील असेल दादांना वाटत होते.पण तसे घडले नाही.शास्त्रीबुवांनी दादांनी केलेल्या कृत्यास केवळ देहांत प्रायश्चित हीच सजा असल्याचे ठणकावून .सांगितले.दादांनी अर्थातच राम्शास्त्रींचा आदेश मानण्यास इन्कार केला.दादांच्या दंडेलीच्या कारभाराचा वीट येऊन रामशास्त्रीनी न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊन आपल्या गावी जाऊन भिक्षुकी सुरु केली.
३१ ऑक्टोबर १७७३ रोजी पेशवे पदाची वस्त्रे स्वीकारल्यानंतर दादानी कर्नाटकात हैदर अलीच्या बंदोबस्तासाठी मोहीम काढली.दादा त्यानिमित्ताने नोव्हेंबर १७७३ मध्ये पुण्याबाहेर पडल्यावर पुन्हा दादांचे पाय पुण्याला कधी लागले नाही.कर्नाटक मोहिमेवर दादांबरोबर असलेले सखाराम बापू,हरिपंत तात्या आणि नाना फडणवीस दादांची दिशाभूल करून मध्येच पुण्याला परतले.पुण्याला आल्यावर दादांच्या विरोधकांनी बारभाई मंडळ नावाचा गट स्थापन करून नारायणराव पत्नी गंगाबाई ज्या त्यावेळी गरोदर असून बारभाईनच्या संरक्षणात पुरंदर किल्ल्यावर होत्या,यांना पेशवा म्हणून छत्रपती रामराजांकडून मान्यता मिळविली.तसेच दादांस पेशवेपदावरून बडतर्फ करविले.ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून बारभाई मंडळाकडे मोठ्या प्रमाणात मराठे सरदार आकृष्ठ झाले आणि त्यांची बाजू मजबूत झाली.बारभाई मंडळाने दादांचा पाठलाग सुरु केला.बाजू कमजोर पडल्याने दादा इंग्रजांच्या आश्रयास गेले.
बारभाई मंडळाने नारायणरावांच्या मारेकऱ्यांची,कटात सामील लोकांची धरपकड सुरु केली.गुन्हेगारांना पकडून शिक्षा देण्यचा सिलसिला अनेक वर्षे चालू होता.महमद इसाफला इ.स.१७७५ मध्ये आणि खरकसिंह व तुळ्या पवार यांना इ.स.१७८० मध्ये देहांत शासन दिले गेले.सुमेरसिंहला काळी नदी काठी दोन हात(भुजा)छाटून गर्दन उडवून मारण्यात आले.ह्या शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीच्या घराण्याला भूजकाटे ते भुस्कुटे असे आडनाव रूढ झाले.सुमेर सिंहच्या मुलांना व इतर गुन्हेगारांना आजन्म कारावास देण्यात आला.त्यांची घरे,मालमत्ता जप्त करण्यात आल्या.इंग्रजांकडे पळून गेलेल्या गारद्यांना पुण्यास धरून आणून त्यांना पायांस सुया टोचून,हत्तीचे पायी बांधून,कानात तापलेल्या सळया घालणे,सांडसाने शरीरावर जखमा करून चुना,मिठाचे पाणी शिंपडून मारले.त्यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या (मारेकरी,कटातील गुन्हेगार)देखत शिरकाण केले गेले.
इंग्रजांच्या आश्रयाला गेलेले राघोबा दादा मराठे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या पुरंदर तहान्वये मराठ्यांच्या ताब्यात आले.दादा आणि त्यांच्या कुटुंबियांची कोपरगाव(जिल्हा अहमदनगर)इथे रवानगी करण्यात आली.तिथेच दादांचे ११ डिसेंबर १७८३ रोजी निधन झाले.तत्पूर्वी काही महिने दादांनी नारायणराव माता गोपिकाबाई ज्या त्यावेळी नाशिकमध्ये वास्तव्यास होत्या,भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.गोपिकाबाईनी दादा केलें अपराध कबुल करून प्रायश्चित घेत असतील तरच त्यांना भेटेन असा निरोप दिला.हे प्रायश्चित ६ ऑगस्ट १७८३ ह्या दिवशी सांगवी इथे दारणा नदीच्या काठी ब्राह्मणांकरवी दादांनी घेतले.अशा प्रकारे ३० ऑगस्ट १७७२ ला नारायणराव पेशव्यांच्या हत्त्येने सुरु झालेले चक्र ११ डिसेंबर १७८३ रोजी राघोबा दादांच्या मृत्यूने पूर्ण झाले.
संदर्भ: १-मराठी रियासत खंड ५-गो.स.सरदेसाई
२-पेशवाई-लेखक कौस्तुभ कस्तुरे
३-पेशवे—लेखक श्रीराम साठे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...