विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 27 July 2023

गडावरील अठरा कारखाने :-

 


गडावरील अठरा कारखाने :-
गडावरील कारखाने म्हणजे खाती(Departments). ज्यासंबंधीचे जे खाते असेल त्याबाबतची जबाबदारी त्या कारखान्याकडे दिली जात असे. हे कारखाने अठरा असावेत असा संकेत आहे. अठरा का? तर अठरा ही संख्या भारतीयांची आवडती. पुराने अठरा. गीतेचे अध्याय अठरा. म्हणून बहुतेक कारखानेही अठरा. सर्वच गडावर सर्व अठरा कारखाने असत असे नाही. परंतु मुख्य गडावर ते असत. या कारखान्यांचे नाव पुढील प्रमाणे. यातील काही कारखान्यांची नावे त्यांची कार्ये सांगतात.
1)तोफखाना :- तोफा आणणे, नेणे, खरेदी करणे, फुटक्या तोफांची विल्हेवाट लावणे इत्यादी कामे तोफखान्याची असत.
2)पिलखाना :- हत्ती संबंधीची कामे या खात्यात होत.
3)उष्ट्रखाना :- म्हणजे उंट शाळा.
4)शिलेखाना :- म्हणजे चिलखते आणि शस्त्र ठेवण्याची जागा.
5)फरासखाना :- वस्त्र विषयक कामे या कारखान्यात होत. मानी सरदाराला गादी, तक्के, लोड, मानाची वस्त्रे हे सारे या कारखान्यातून पुरवले जाई.
6)कोठी :- पावसाळ्याच्या वेळी गडावरील वस्तीस लागणारे जिन्नस कोठीत साठवले जाई.
7)जिन्नसखाना :- किरकोळ जिन्नसांसाठी हा कारखाना वेगळा बनवला होता.
8)लकडखाना :- जळण्यासाठी लाकूड, मोळ्या साठवणे, वाटप करणे या खात्याद्वारे होत असे.
9)इमारतखाना :- गडावरील इमारतींची डागडुजी अथवा बांधकाम हा कारखाना करायचा.
10) बागकारखाना :- मंदिरातील पूजा, राजांची दैनंदिन कर्मकांडे आणि सणांना लागणारी फुले या खात्यातून मिळायची.
11)कुरणे :- गडावरील घोडे, बैलांना गवत व अन्न पुरवणे या खात्याद्वारे होत असे. हे खाते गडाखाली असायचे.
12)रथखाना :- गडावर रथ असायचेच अशातला भाग नाही. परंतु राज शिष्टाचार म्हणून राजधानीच्या गडावर रथ असायचा.
13)पेठ कारखाना :- दुकानांची व्यवस्था पाहणारा कारखाना म्हणजे पेठ कारखाना.
14)थट्टी :- म्हणजे घोड्यांची पागा.
15) जामदारखाना :- गडावरील संपत्तीची देखभाल येथे होत असे.
16)औषधीखाना :- नावाप्रमाणेच येथे आयुर्वेदिक औषधी जमा असतात.
17)पुस्तकशाळा :- हा कारखाना प्रत्येकच गडावर नसायचा. किल्ल्यावर कोणी विद्याव्यासंगी असल्यास पुस्तक शाळा असे.
18)खासगी :- पानदाने, पिकदानी, गंजीफा, सोंगट्याचे पट अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी येथे असे. इतर कुठल्याही कारखान्यात वस्तू मिळाली नाही तर शेवटी ती या खासगीत शोधावी असे म्हटले जाई.
संदर्भ :- महाराष्ट्रदर्शन :- गो. नि. दांडेकर
- पृथ्वीराज धवड

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...