कपिलेश्वर महादेव मंदिर शिलालेख –मुडावद -अमळनेर
हा शिलालेख जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे निम मुडावद गावी येथील तापी व पांझराआणि कपिल गंगा या तीन नदीच्या संगमावर मध्ययुगीन कपिलेश्वर महादेव मंदिराच्या मुख मंडपावर दर्शनी भागावर आडव्या तुळईवर गणेश पट्टीच्या वर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून २ ओळीचा शुद्ध देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून दोन्ही बाजूला उभे दंड चरणरेघा कोरलेल्या असून अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात.
.गावाचे नाव : निम मुडावद ,ता. अमळनेर, जि. जळगाव
शिलालेखाचे वाचन :
१.॥ श्री गणेशायनम: प्रा.शके १७०५ सा .शके १७०६ क्रोधि(क्रोधिनं) सत ॥
२.॥ पौप वद्य २ तेदिनि सपूर्ण ॥ मास १६ ॥
जी.पी.एस. :-२१.२२ ”३३ ’६१ ,७४ .९४ ’’५२.’ ४७
शिलालेखाचे स्थान :- मंदिराच्या मुख मंडपावर आडव्या तूळईवर कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - प्रा.भाद्रपद शके १७०५शोभन संवत्सर सा.पौष वद्य२शके१७०६क्रोधन संवत्सर,
काळ वर्ष : अठरावे शतक = ( २८ ऑगस्ट १७८३ - २६ सप्टेंबर १७८३). ते २८ डिसेंबर १७८४ मंगळवार
कारकीर्द :-सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:-
शिलालेखाचे संशोधन /वाचक : ,श्री अनिल किसन दुधाने, श्री. संजीव बाविस्कर
प्रकाशक :
संक्षेप :- प्रा- प्रारंभ, सा-समाप्त , क्रोधि-क्रोधन , सत-संवत्सर. पौप -पौष ,
संदर्भ:- IE VI- ३६८-३७०
अर्थ :- श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम शालिवाहन शकाच्या १७०५ व्या वर्षी सुभानु नाम संवत्सरातील पौष २ म्हणजेच सोमवार २०ऑगस्ट१७८३ च्या दिवशी चालू होवून शके १७०६ क्रोधि(क्रोधन ) संवत्सर पौष २ म्हणजेच ९. जानेवारी १७८४ शुक्रवार रोजी मंदिर संपूर्ण बांधून पूर्ण झाले .सदरील मंदिराचे बांधकाम करण्यासाठी एकूण कालावधी १६ महिने लागला ,
शिलालेखाचे महत्व :- उत्तर मराठेशाहीच्या कारकिर्दीत येथे एक मंदिर स्थापन केले .मंदिरावर असलेला शिलालेख हा मंदिराचे बांधकाम सन १७८३ चालू आणि १७८४ साली पूर्ण केल्याच्या संबधित आहे शिवाय सर्व कालावधी १६ महिने लागला हे ही महत्वपूर्ण नोंद आहे .कोरक्याने शिलालेखातील अक्षरांना लघु रूप दिलेलं आहे .तर शिलालेख सुरुवात व शेवटी चरण रेघा आहेत हेच या शिलालेखाचे महत्व आहे.
.
2.कपिलेश्वर महादेव मंदिर नदी घाट शिलालेख –मुडावद अमळनेर
हा शिलालेख जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे निम मुडावद गावी येथील तापी व पांझराआणि कपिल गंगा या तीन नदीच्या संगमावर मध्ययुगीन कपिलेश्वर महादेव मंदिराच्या समोरील तापी नदीच्या घाटावर दीपमाळेच्या खालील चौथरा बांधकामावर नदी घाटाकडे जाणाऱ्या पायऱ्या मार्गावरउजव्या बाजूला भिंतीवर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून २ ओळीचा शुद्ध देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून दोन्ही बाजूला उभे दंड चरणरेघा कोरलेल्या असून अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात.
.गावाचे नाव : निम मुडावद ,ता. अमळनेर, जि. जळगाव
शिलालेखाचे वाचन :
१. श्री कपिलेस्वर च्यरणि
२. निरंतर नारो दादा
३. जि नेवाळकर सके
४. १६८८ व्यय नाम सवछरे
जी.पी.एस. :-२१.२२ ”३३ ’६१ ,७४ .९४ ’’५२.’ ४७
शिलालेखाचे स्थान :- नदीघाटाकडे जाताना दीपमाळेच्या चौथऱ्या खालील भिंतीवर आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : नदीवर घाट बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १६८८ व्यय नाम संवत्सर ,
काळ वर्ष : अठरावे शतक = सन १७६६
कारकीर्द :- माधवराव पेशवे ,
व्यक्तीनाम:- नारोदादाजी नेवाळकर
शिलालेखाचे वाचक : ,श्री अनिल किसन दुधाने
संक्षेप :- कपिलेस्वर-कपिलेश्वर , च्यरणि-चरणी ,सके-शके ,सवछरे-संवत्सरे
संदर्भ:- IE VI- ३३४
अर्थ :- श्री कपिलेश्वर महादेवाच्या चरणी तत्पर असलेले श्री नारोदादाजी नेवाळकर यांनी शालिवाहन शकाच्या १६८८ व्या वर्षी व्ययनाम संवत्सरात म्हणजेच सन १७६६व्या वर्षी तापी नदीवरील घाटाचे काम पूर्ण केले .किवा त्याचा जिर्णोधार केला.
शिलालेखाचे महत्व :- नदी काठी नेहमी संस्कृती नांदत असते सन १७६६ साली तापी नदीवरील घाटाचे काम नारोदादाजी नेवाळकर यांनी पूर्ण केल्याच्या शिलालेख घाटावर लावलेला आहे . नदीवर घाट किवा मंदिर बांधणे हे एक समाजाचे लोकोपयोगी कार्य आहे .यावरून ते सामाजिक ,धार्मिक वृत्तीचे होते हे सिद्ध होते मराठा स्थापत्याच्या दृष्टीने या घाटाचे बांधकाम फार महत्व पूर्ण आहे याच बरोबर मराठेशाहीचा उत्तरे कडील धार्मिक विस्तार याची माहिती मिळते हेच या शिलालेखाचे महत्व आहे.
कपिलेश्वर महादेव मंदिर माहिती .
जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर तसेच अमळनेर, शिंदखेडा व शिरपूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले सूर्यकन्या तापीनदी , पांजरा व गुप्तकपिला या तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेले हे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. कपिलेश्वर महादेव मंदिर हे सारयाशस्त्राचे जनक महर्षी कपिलमुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे .प्राचीन काळात तप साधना करीत असताना कपिल मुनींनी या ठिकाणी काळ्या पाषाणाच्या शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका सांगितली जाते .कपिल मुनीच्या साधनेमुळे भगवान शिव या क्षेत्रावर प्रकट झाले . महाशिवरात्री ला या ठिकाणी येथील यात्रा भरते .येथे मनोभावे शिवाची पूजा केली असता मनोवांछित फळ प्राप्त होत असते. भारतातील अनेक थोर तपस्वी साधुसंताच्या पद स्पर्शानी पावन झालेली ही भूमी आहे .भारतातील १०८ नदी संगम स्थळांवरील शिव मंदिरापैकी हे एक महत्वाचे स्थळ आहे .या स्थळाचे वर्णन स्कंद पुराणातील तापी महात्म्य ग्रंथात वर्णन आलेले आहे .मंदिरस्थापत्य मराठे शाहीतील असून मंदिराचा सभामंडप व मुख मंडप १६ खांबां वर उभा आहे . मंदिराच्या सभामंडपाची रचना आकर्षक असून दगडी सभामंडप, तिन्ही दिशांना प्रवेशद्वार आहे प्रत्येक मार्गावर अर्धमंडप आहे. मंदिराच्या गाभार्यात तिन शिवपिंडी असून सकाळ चे पाहिले सूर्य किरण मंदिरातून त्रिपिंडीवर पडते.गाभाऱ्यात पार्वती व गणपती यांची मूर्ती आहे .
स्कंद पुराणातील श्री कपिलेश्वर माहात्म्य-तापी मंदिरस्थळाचे वर्णन :-
श्री गणेशाय नमः । श्री रुद्र उवाच । आमर्दक । चे ईशान्येस ।। वसता झाला कपिलेश । पातळ बिळीं करुनि वास । दर्शने प्रसन्न होय ||१|| येथे असे प्रत्यक्ष देव । पांझरा संगमी स्वयमेव ||हे पूजावे करुनि सद्भाव । तापी ते तिरी ॥२॥ येथे असे पाताळबीळ । रुद्रोपदेशें प्राप्त होईल ।। जो शिवाले अराधील । तो पावले बिळाते ||३|| आणि अमृत लिंग जळी जाण । करिता दर्शन स्पर्शन ॥ `जना होईल स्वर्ग गमन | पावले मुक्ति ||४|| सूर्यजेंचे बहुतीर्थे करुन । कपिल मुनि येथे येऊन ॥शिव उपदेश घेऊन । बिळी प्रवेशला ||५||दक्षिणायणी एक दुर्लभ स्नान आणि कपिल मुनींचे दर्शन ।। न पावती भाग्यें वाचून । हीनकर्मी ||६|| जो कपिल मुनिसी पाहील। भवभय त्याचे नाशेल || आणि जो स्थान करील । तो होईल कपिल सम तेज ||७||जो जाऊ म्हणेल पाताळासी । त्याने सेवावे ष्णमासासी ॥तो नागकन्या पावेल निश्चयेसी । रुप मनोहर ||८||
इतिश्री तापी महात्म्ये कपिलेश्वर प्रभवोन्नाम । एकच त्वा रिंशी ध्याय ||४१|| अध्याय ।
तापीच्या पैलतीरावर थाळनेर परगणा येतो, जो १७५० मध्ये होळकरांना सरंजाम म्हणून पेशव्यांकडून मिळाला. त्यामुळे मंदिराच्या जिर्णोद्धारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही महत्त्वाचे योगदान आहे हे स्पष्ट होते. आज महामंडलेश्वर पूज्य हंसाजी तीर्थ महाराज वेदशाळेच्या माध्यमातून पवित्र स्थानाची अखंड सेवा करीत आहेत.
©माहिती व संकलन –अनिल दुधाने ७७९८१८७४७८
सदर कार्यात जगनाथ लोहार व स्थानिक महंत बाबाजी यांची मदत व सहकार्य लाभले..
No comments:
Post a Comment