द्रष्टी आई आणि कर्तबगार मुलगा हे नाते अधोरेखित करणार्या इतिहासप्रसिद्ध माता-पुत्रांशी आपण परिचित आहोत. ही परंपरा दैदीप्यमान करणारे आई आणि मुलगा म्हणून जेव्हा महाराणी जमनाबाई आणि महाराजा सयाजीराव या माता-पुत्र जोडीचा आपण आज विचार करतो तेव्हा अंगावर शहारे आणणारा दैदीप्यमान परंतु पूर्णतः अज्ञात इतिहास आपल्यासमोर येतो. दुर्दैवाने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याच अफाट कर्तृत्वाची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते तेव्हा त्यांच्या द्रष्ट्या आईबद्दल माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरा द्रष्टेपणा काळाच्या पुढे शंभर पावले टाकण्यात असतो. सयाजीरावांना बडोद्याच्या गादीचे दत्तक वारस म्हणून जेव्हा जमनाबाईंनी निवडले तेव्हा त्यांचे वय अवघे २२ वर्षे होते. तर सयाजीरावांचे वय १२ वर्षे होते. आधुनिक भारतातील आजअखेरचा सर्वोत्तम राज्यकर्ता हा लौकिक सयाजीरावांनी ज्या कष्टाने मिळवला त्याला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. त्याचप्रमाणे अवघ्या १२ वर्षाच्या सयाजीरावांमध्ये सर्व बाजूंनी संकटात असणार्या बडोदा संस्थानला बाहेर काढणारा राजा शोधणे हीसुद्धा तितकीच असामान्य बाब आहे. म्हणूनच शीर्षकात जमनाबाईंसाठी ‘द्रष्टी माता’ हे विशेषण वापरले आहे.
१७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘रयतेचे राज्य’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रीयन जनतेच्या आकांक्षांची परिपूर्ती होती. परकीय सत्तांच्या जाचातून मुक्ती ही त्यावेळच्या समाजाची सर्वात महत्वपूर्ण गरज होती. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लढवय्यांना सोबत घेत जनतेची परकीय जाचातून सुटका केल्यामुळेच समाजासाठी शिवाजी महाराज ‘क्रांतिकारक’ ठरले. या सर्वामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभ्या होत्या. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची पुढची आवृत्ती ज्यांनी प्रत्यक्षात उतरवली ते आधुनिक भारताचे आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निर्माते महाराजा सयाजीराव गायकवाड यांना घडवण्यात त्यांच्या दत्तक आई महाराणी जमनाबाईंची भूमिका महत्वपूर्ण होती. सयाजीरावांनी आपल्या संस्थानात जी काही ध्येयधोरणे राबवली, लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला या सर्व कामात जमनाबाई यांनी दिलेल्या शिकवणीचे पुरावे आपल्याला सयाजीरावांच्या राज्यकारभारात सापडतात. राजमाता जिजाबाई ज्या प्रकारे शिवबाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत्या त्याचप्रमाणे जमनाबाईसुद्धा सयाजीरावांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत्या. सयाजीरावांची निवड करण्यापासून ते त्यांच्यामधील उत्तम प्रशासक घडविण्यात मोलाचा वाटा असणार्या जमनाबाईंचे स्मरण त्यांच्या जयंतिदिनी करणे औचित्यपूर्ण ठरेल.
महाराणी जमनाबाईंची कौटुंबिक पार्श्वभूमी
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गावातील माने कुटुंबात २९ जुलै १८५३ रोजी महाराणी जमनाबाईंचा जन्म झाला. माने घराण्यातील कित्येक पुरुषांनी विजापूर दरबारासाठी व पुढे मराठेशाहीतही चांगली कामगिरी बजावली होती. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी रहिमतपूरची पाटीलकी व वतन मिळवली होती. ही पाटीलकी माने घराण्याला जमनाबाईंचे पणजोबा विठोबा यांच्यापासून मिळाली होती. जमनाबाईंच्या आई बजुबाई या बडोद्याच्या सरदार काळे यांच्या घराण्यातील होत्या. बजुबाईंना खाशीबाई, आनंदराव, तान्हीबाई व गणपतराव अशी चार अपत्ये होती. जमनाबाईंचे लग्नाआधीचे नाव तान्हीबाई असे होते. पुढे लग्न झाल्यावर तान्हीबाईंचे नाव यमुनाबाई असे ठेवण्यात आले. गुजराती भाषेच्या उच्चाराप्रमाणे ‘य’ चे ‘ज’ होऊन यमुनाबाईचे जमनाबाई या नावात रुपांतर झाले. जमनाबाई सर्व प्रजेवर आईप्रमाणे प्रेम करत. त्यामुळे बडोद्यातील सर्व प्रजा त्यांना ‘माँसाहेब’ या नावाने संबोधत असे.
जमनाबाईंच्या जन्मावेळी रहिमतपूरची पाटीलकी त्यांच्या वडिलांकडे होती. पाटीलकीच्या उत्पन्नाशिवाय त्यांची शेतीही भरपूर होती. पाटीलकी सांभाळणार्या वडिलांची कार्यपद्धती पाहतच जमनाबाई मोठ्या झाल्या. गावातील न्यायनिवाडा करणे, गावच्या विकासासाठी कामे करणे किंवा गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन गावचा कारभार सुरळीतपणे करण्याच्या वडिलांच्या पद्धतीचे निरीक्षण जमनाबाई करत होत्या. याचा परिणाम म्हणून त्यांच्या अंगी हे सर्व गुण भिनले. माहेरी असतानाच त्यांच्या ह्या गुणांची चाहूल लागली होती.
महाराणी जमनाबाईंचे बालपण
जमनाबाईंचे उदारमतवादी गुण त्यांच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासूनच दिसत होते. कोणी भिकारी किंवा भिक्षुक दारात आले तर त्यांना दक्षिणा, धान्य किंवा पीठ देण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे. त्यांच्या घरी कोणी भिकारी, साधुसंत, गोसावी, बैरागी किंवा कोणी अपंग व्यक्ती आली तर जमनाबाई घरातील धान्य, पीठ जे काही मिळेल ते त्यांना देत. एवढेच नव्हे तर कोणी भिकाऱ्याची मुले नग्नावस्थेत पाहिली तर त्या आपली साडी-चोळी किंवा परकर यापैकी जे काही हाती लागेल ते त्यांना देत. भिक्षा थोडी घालावी, हात आखडून दानधर्म करावा यासंदर्भात त्यांना घरातील लोक नेहमी सांगत. त्यांची ही सवय बंद व्हावी यासाठी आई-वडिलांनी त्यांना कित्येकवेळा मारही दिला. परंतु तरीही त्यांची दानधर्माची सवय गेली नाही. त्यांच्या वाड्यामध्ये एक शाळा होती. तेथे जमनाबाई धुळाक्षर व बाराखडी शिकल्या. मोडी व बालबोध अक्षरांची ओळख त्यांना त्याच शाळेत झाली होती. त्यांची स्मरणशक्ती खूप तीव्र होती.
महाराणी जमनाबाईंचा विवाह
जमनाबाई १३-१४ वर्षांच्या असताना बजुबाई जमनाबाईंना बडोद्याला माहेरी सोबत घेऊन गेल्या होत्या. बडोद्याच्या काळे सरदारांकडून जमनाबाईंना वर पाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्या वेळी बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड हे विधुर स्थितीत होते. खंडेराव महाराजांचे याआधी दोन विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी सावित्रीबाई आधी वारल्या आणि १८६५ मध्ये दुसर्या पत्नी अंबाबाईसाहेबांचे निधन झाले. या दोन्हीही राण्यांना मुलबाळ नव्हते. आईच्या आग्रहास्तव खंडेराव महाराज तिसर्या लग्नास तयार झाले. परंतु चांगली सुरेख, सुस्वभावाची, कुलीन आणि हुशार वधू मिळाली तरच पुन्हा लग्न करण्याची अट त्यांनी घातली.
काळे सरदार यांच्या घरी रहिमतपूरच्या मानेंची कन्या आहे असे समजल्यावर खंडेराव महाराजांनी तिच्याच सोबत विवाह करण्याचा निश्चय केला. त्या वर्षी लग्नाचे मुहूर्त नव्हते. त्यामुळे एक वर्ष लग्न पुढे ढकलण्यात आले. लग्नाचे पक्के झाल्यामुळे अप्पासाहेब माने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन बडोद्याला आले. या सदस्यांच्या राहण्याच्या व्यवस्था नजरपागेत करण्यात आली. तसेच त्यांच्या खर्चासाठी सरकारकडून दरमहा ५०० रुपये दिले जात होते. एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर १८६६ साली खंडेराव महाराज व जमनाबाई यांचा विवाह नजरपागेच्या लग्नमंडपात संपन्न झाला. हा विवाह समारंभ १८ दिवस चालू होता. या विवाहासाठी ४ लाख रुपये खर्च झाला.
महाराजा खंडेराव गायकवाड
खंडेराव महाराज हे नेहमी साध्या पोशाखात राहत असत. त्यांना शिकारीचीही आवड होती. आपली प्रजा नेहमी आनंदी राहावी यासाठी ते नेहमी तत्पर होते. दुष्काळाच्या काळात लाखो रुपयांचा दानधर्म करून त्यांनी लोकांचे जीव वाचवले होते. मुंबईमध्ये गोऱ्या खलाशी लोकांसाठी इंग्रज सरकारने बराका (खोल्या) बांधल्या होत्या. त्यासाठी खंडेराव महाराजांनी २ लाख रुपयांची मदत केली. तसेच मुंबईत महाराणी व्हिक्टोरियाचा पुतळा उभा करण्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची भरघोस देणगी खंडेराव महाराजांनी दिली.
१८५७ च्या बंडावेळी खंडेराव महाराजांनी दोस्त ब्रिटिश सरकारला आर्थिक व फौजेची मदत केली होती. हे उपकार स्मरून सरकारने त्यांना ‘जी. सी. एस. आय’ हा मानाचा किताब दिला. गायकवाडांनी इंग्रज सरकारला ३ लाख रुपये खंडणी द्यावी लागत होती. ती ही यावेळी ब्रिटिश सरकारने माफ केली. गायकवाड घराण्याला औरस संतती नसल्यामुळे ब्रिटिश सरकारने ११ मार्च १८६२ रोजी दत्तक पुत्र घेण्याची परवानगी त्यांना दिली. ही परवानगी मिळाल्यानंतर चार वर्षांनी जमनाबाईंचे लग्न झाले होते. खंडेराव महाराजांच्या काळात मुस्लीम धर्माला उत्तेजन मिळाले. खंडेराव महाराजांनी पैमाषखाते सुरु करून राज्याचा महसुल वाढविला. मुंबईहून अहमदाबादकडे बडोद्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला लागणारी जमीन देऊन आपल्या संस्थानात रेल्वेचे जाळे विस्तारले. खंडेराव महाराजांच्याच काळात बडोद्यात पोलीस खात्याची स्थापना करण्यात आली.
महाराणी जमनाबाईंचे शिक्षण
विवाहानंतर खंडेराव महाराजांनी जमनाबाईंना शिक्षण देण्याचे ठरविले. त्या माहेरी धुळाक्षरे व बाराखडी शिकल्या होत्या. यानंतर संस्कृत व मराठी लिखाण आणि वाचण्याचा अभ्यास केला. रुपावली, समाश्र्चक्र व स्त्रोतही त्या खूपच लवकर शिकल्या. तसेच गणित, मोडी, जमाखर्चाची माहिती, बालबोध वाचन व लिखाण या सर्वांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले. बाहेरून आलेली पत्रे त्या वाचत व स्वतः उत्तर लिहित किंवा काही वेळा कारकुनाकडून लिहून घेऊन त्यावर सही करत. त्यांचे मोडी अक्षर अतिशय सुंदर होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्या पोथ्या, पुस्तके व वर्तमानपत्रे नियमितपणे वाचत होत्या. मोडी भाषेबरोबरच त्या प्राकृत पोथ्यादेखील वाचत. याबरोबर जमनाबाई गायन व विणकामही शिकल्या. राजघराण्यातील स्त्रियांसाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्या अंगी होते. खंडेराव महाराजांना आवडणारे खाद्यपदार्थ त्या स्वतः करून वाढत. दानधर्म, पूजाअर्चा, कथन, पुराणश्रवण, कीर्तन यामध्ये जमनाबाई यांचा बराच वेळ जात होता.
कठीण कालखंड
महाराणी जमनाबाई यांचे लग्न झाल्यावर बडोदा संस्थानचा कारभार सुरळीत सुरु होता. जमनाबाई आणि खंडेराव महाराज यांच्या लग्नाला पाच वर्षे होण्याआधीच २८ नोव्हेंबर १८७० रोजी खंडेराव महाराजांचे अल्पशा आजाराने मकरपूराच्या राजमहालात निधन झाले. मृत्यूप्रसंगी खंडेराव महाराजांचे वय ४५ वर्ष होते. तर जमनाबाईंचे वय १७ वर्षे होते. एवढ्या लहान वयात त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. खंडेरावांना पुत्र नसल्यामुळे त्यांचा लहान भाऊ मल्हारराव महाराज यांच्याकडे राज्यकारभाराची सूत्रे सोपवण्यात आली. मल्हारराव महाराजांनी इंग्रज सरकारच्या संमतीने लगेचच राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्नल बार हे बडोद्याचे रेसिडेंट होते. याचदरम्यान महाराणी जमनाबाई गरोदर होत्या.
खंडेराव महाराज व मल्हारराव महाराज यांच्यातील वादामुळे जमनाबाईंच्या जीवाला राजवाड्यात धोका होता. गरोदर असताना राजवाड्यात त्यांना भरपूर संकटांना तोंड द्यावे लागले. जमनाबाईंच्या गर्भपात आणि विषप्रयोगाचे अनेक प्रयत्न या काळात करण्यात आले. याशिवाय जमनाबाई गरोदर नाहीत अशा वावड्या बडोद्याच्या रेसिडंटपर्यंत पोहचवण्यात आल्या. तैनातीला असणार्या माणसांवरही जमनाबाईंचा विश्वास राहिला नव्हता. परंतु राजवाड्यातील काही विश्वासू माणसांमुळे महाराणी जमनाबाईंचा राजवाड्यात निभाव लागला.
खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिने जमनाबाई राजवाड्यात वास्तव्यास होत्या. पण विषप्रयोगाचा प्रयत्न झाल्यानंतर राजवाड्यात राहणे जमनाबाईंना धोक्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी रेसिडंटच्या कानावर ही घटना घातली आणि मार्च १८७१ मध्ये त्या रेसिडेंटच्या आश्रयाखाली राहण्यासाठी गेल्या. त्या ठिकाणीच ५ जुलै १८७१ ला त्यांनी मुलीला जन्म दिला. पुढे तिचे ताराबाई असे नाव ठेवण्यात आले. जमनाबाईंना पुत्र न झाल्याने मल्हाररावांना गादीचा पूर्ण अधिकार मिळाला. त्यामुळे जमनाबाईंनी आपल्या मुलीसह बडोद्याऐवजी पुण्यात राहणे पसंत केले. पुण्याला जाताना अंगावर होते तेवढेच दागिने आणि कपडे त्यांना मिळाले. अन्य कोणतेही जडजवाहीर त्यांना मिळाले नाही. जमनाबाईंना स्त्रीधन म्हणून मल्हारराव महाराज १ लाख रुपये देण्यास तयार झाले. पण जमनाबाईंनी ते स्वीकारले नाहीत. शेवटी एका एजंटामार्फत पत्रव्यवहार करून बडोद्याच्या खजिन्यातून वर्षाला ३६ हजार रुपये जमनाबाईंना देण्याचे ठरले. पुण्यात असताना इंदुरचे महाराज तुकोजीराव होळकरांनी जमनाबाई यांची काळजी घेतली. पुण्यातील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांना खूप हाल सहन करावे लागले.
मल्हारराव महाराजांचा अनागोंदी राज्यकारभार
मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभारामध्ये अनागोंदीपणा होता. इंग्रज सरकारच्या सूचनांचे पालन न करता राज्यकारभार चालू होता. मल्हाररावांची कटकारस्थाने इंग्रज सरकारच्या लक्षात आली. कर्नल फेयर यांची बदली होऊन १८७४ ला त्यांच्या जागी सर लुईस पेली हे स्पेशल कमिशनर म्हणून बडोद्यात आले. त्याच वर्षी कर्नल फेयर यांना विषप्रयोगाचे प्रकरण झाले. कर्नल फेयरला सरबतामधून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये मल्हारराव महाराजांचा हात असावा असा संशय घेऊन इंग्रज सरकारने त्यांना तुरुंगात ठेवले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक कमिशन नेमले. मल्हारराव महाराज या आरोपातून निर्दोष मुक्त झाले. परंतु राज्य चालवण्यास अपात्र ठरवून इंग्रज सरकारने त्यांना पदच्युत केले. तसेच त्यांच्या पुत्रांकडे गादीचा वारसाहक्क न ठेवता त्यांना १८७५ साली मद्रास या ठिकाणी पाठवण्यात आले.
बडोद्याची गादी रिकामी पडल्यामुळे इंग्रज सरकारला खंडेराव महाराजांनी १८५७ च्या बंडावेळी इंग्रज सरकारला मदत केल्याने १८६२ ला राणी सरकारकडून त्यांना देण्यात आलेल्या दत्तक पुत्राच्या परवानगीचे स्मरण झाले. बडोद्याचे राज्य चालवण्यासाठी जमनाबाईंना मुलगा दत्तक घेण्याची परवानगी देण्याचा विचार विलायत सरकार व हिंदुस्थान सरकार यांच्यात चालू होता. सरकारकडून सूचना येताच जमनाबाई बडोद्याला गेल्या. होळकर सरकारचे दिवाण सर टी. माधवराव यांना इंग्रज सरकारने बडोदा राज्याची जबाबदारी देऊन दिवाण नेमले. दत्तक पुत्र निवडण्याची जबाबदारी जमनाबाई यांच्याकडे आली.
क्रांतिकारक दत्तकविधान व सयाजीरावांचे शिक्षण
१८७५ मध्ये बडोद्याच्या राजगादीस वारस निवडण्यासाठी महाराणी जमनाबाईंनी गायकवाड घराण्याच्या नाशिकमधील वंशजांपैकी गोपाळ, संपत आणि आनंदा या तीन मुलांना बडोद्यात बोलावून घेवून त्यांची परीक्षा घेतली. या मुलाखतीमध्ये महाराणी जमनाबाईंनी तिन्ही मुलांना ‘तुम्ही इथे कशासाठी आलात?’ असा प्रश्न विचारला. त्यावर १२ वर्षाच्या गोपाळने ‘मी बडोद्याचा राजा होण्यासाठी आलो आहे’ असे हजरजबाबी उत्तर दिले. या चातुर्यपूर्ण उत्तरामुळे राजगादीचा वारस म्हणून त्यांची निवड झाली. २७ मे १८७५ रोजी गोपाळचे दत्तकविधान होवून सयाजीराव तिसरे असे नामकरण करण्यात आले.
दत्तकविधान होईपर्यंत निरक्षर असणाऱ्या सयाजीरावांच्या शिक्षणाकडे मातोश्री जमनाबाई व बडोद्याचे तत्कालीन दिवाण टी. माधवराव यांनी विशेष लक्ष पुरवले. सयाजीरावांना अक्षरओळख आणि अंकगणित शिकवण्यासाठी महाराणी जमनाबाईंनी केशवराव पंडित आणि भाऊ मास्तर यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर सयाजीरावांना इतर विषयांचे औपचारिक शिक्षण देण्यासाठी महाराणी जमनाबाई आणि दिवाण टी. माधवराव यांनी तज्ञ शिक्षकांचा शोध सुरु केला. अखेर १० डिसेंबर १८७५ रोजी तत्कालीन वऱ्हाड प्रांतातील शिक्षण खात्याचे संचालक एफ. ए. एच. इलियट या तरुण आय.सी.एस. अधिकाऱ्याची सयाजीरावांचे मुख्य शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली.
आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या बडोदा संस्थानची धुरा सक्षमपणे सांभाळू शकेल असा वारस घडवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या इलियट सरांनी सर्वप्रथम सहकारी शिक्षकांच्या मदतीने सयाजीरावांना शिकवण्यासाठीच्या अभ्यासक्रमाची आखणी केली. ब्रिटीश पब्लिक स्कूलच्या धर्तीवर सयाजीरावांसाठीच्या शाळेच्या इमारतीचा आराखडा आखून त्यानुसार बांधकाम करून घेतले. निकोप स्पर्धेच्या माध्यमातून सयाजीरावांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडावा या उद्देशाने त्यांच्यासोबत बंधू संपतराव, दादासाहेब, गणपतराव व इतर सरदारांच्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला. इलियट सरांच्या नेतृत्वाखाली या सर्व विद्यार्थ्यांना मराठी, गुजराती, इंग्रजी, उर्दू या भाषांसोबत इतिहास, भूगोल आणि गणित या विषयांचे शिक्षण देण्यात आले. १८७५-७६ च्या प्रशासकीय अहवालामध्ये दिवाण टी. माधवरावांनी सयाजीरावांच्या शिक्षणाविषयी जमनाबाई किती दक्ष होत्या याबाबत लिहिले आहे. टी. माधवराव लिहितात, “महाराजांच्या शिक्षणासंबंधाने महाराणी जमनाबाईसाहेब अत्यंत काळजी घेतात. हे त्यांना फार भूषणावह आहे. त्यांच्या शिक्षणाच्या ज्या सोयी त्यांनी करून दिल्या त्याहून जास्त चांगल्या सोयी कोणत्याही देशी संस्थानात आढळावयाच्या नाहीत. महाराणीसाहेब फार बुद्धिवान व धोरणी असल्यामुळे बडोद्याच्या भावी राज्यकर्त्याला चांगले शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे त्या पूर्णपणे जाणून आहेत, ही मोठ्या सुदैवाची गोष्ट होय. ... तरुण गायकवाडांच्या शारीरिक व नैतिक शिक्षणावर महाराणीसाहेबांची देखरेख पूर्ववत चांगली आहे. तसेच कारभारी मंडळीला कारभारांचे काम सुयंत्रपणे चालविण्यास त्यांचे चांगले पाठबळ आहे. हल्ली त्यांच्या देखरेखीखाली जी खाती आहेत त्यांच्या खर्चाचा प्रश्न त्यांच्यापुढे आलेला आहे. अशा वेळी त्यांच्या हातून शहाणपणाने योग्य काटकसर होईल अशी आम्हास उमेद आहे.”
महाराणी जमनाबाई आणि दिवाण टी. माधवराव
मल्हारराव महाराजांच्या कारकिर्दीत संस्थानात प्रचंड अनागोंदी माजली होती. महाराणी जमनाबाईंनी राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केल्यानंतर टी. माधवरावांची त्यांना खूप मदत झाली. त्यासंबंधी दिवाण टी. माधवराव लिहितात, “राज्यकारभारात योग्य फेरफार करण्याच्या कामी महाराणीसाहेबांकडून आम्हास पूर्ववत साह्य मिळत आहे. राज्यकारभारात सुधारणा झाली तर पुढे राज्याचे हित होणार आहे, ही गोष्ट त्यांच्या शहाणपणामुळे व सदसद्विवेकबुद्धीमुळे त्यांना कळून चुकली आहे. त्या निग्रही व धोरणी असल्यामुळे त्यांचे आप्त, स्वकीय, मित्र किंवा नोकर यांना राज्यकारभारात ढवळाढवळ करण्यास फावत नाही. तरुण गायकवाडांच्या शिरावर पुढे जी जबाबदारी पडणार आहे ती नीटपणे बजाविण्यास ते तयार राहतील अशा तऱ्हेचे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे, हे नेहमी माँसाहेबांच्या हृदयात घोळत असते. तसेच श्रेष्ठ प्रेरक शक्तीचा राज्यकारभारात जरी कदाचित योग्य उपयोग झाला नाही तरी राज्यरूपी यंत्राची रचना सर्व गोष्टी पुढे सुरळीत चालतील अशा घाटाची करून ठेविण्याविषयी त्यांची उत्कट इच्छा आहे.” टी. माधवराव यांनी महाराणी जमनाबाई यांच्याबद्द्ल लिहून ठेविलेल्या आठवणींमधून महाराणी जमनाबाई राज्याप्रती किती संवेदनशील होत्या हे अधोरेखित होते.
सर टी. माधवरावांनी आपल्या कारकिर्दीत महाराणी जमनाबाईंच्या स्मरणार्थ दवाखान्याची इमारत बांधून त्या इमारतीला ‘जमनाबाई हॉस्पिटल’ असे नाव दिले. १८८२ पासून दरवर्षी या दवाखान्यातून रुग्णांच्या उपचारावर १० हजार रुपये खर्च केले जात होते. या माध्यमातून हजारो गरीब लोकांना मोफत आरोग्य सुविधा व अन्न पुरवले जात होते.
महाराणी व्हिक्टोरिया आणि महाराणी जमनाबाई
१८७७ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया दिल्लीत हिंदुस्तानच्या सार्वभौम राणीचा किताब धारण करणार होत्या. महाराणी व्हिक्टोरिया यांनी या कार्यक्रमाला पुत्रासमवेत उपस्थित राहण्याचे निमंत्रण जमनाबाईंना दिले होते. त्याप्रमाणे महाराणी जमनाबाई पुत्र सयाजीराव आणि कन्या ताराबाई यांना घेऊन दिल्लीच्या दरबारास गेल्या. त्यांच्यासोबत मे. एजंट गव्हर्नर जनरल मि. मेलव्हील, सर टी. माधवराव तसेच राज्यातील मोठमोठे सरदार, मानकरी व अधिकारी लोक होते. १४ डिसेंबरला महाराणी जमनाबाई या सर्व मंडळींसह दिल्लीला पोहोचल्या. १ जानेवारी १८७७ रोजी दिल्ली दरबारात सर्व राजेराजवाड्यांसमोर सयाजीराव महाराज यांना राणी व्हिक्टोरिया यांच्यामार्फत ‘फर्जंदे-खास-दौलते-इंग्लीशिआ’ हा किताब देण्यात आला. तर ६ जुलै १८७८ ला ‘क्रौन ऑफ इंडिया’ (हिंदुस्तानचा मुकुटमणी) हा किताब राणीसरकारने बडोद्याच्या ब्रिटिश एजंटांच्यामार्फत महाराणी जमनाबाईंना दिला.
इंग्रज सरकार आणि गायकवाड यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. खंडेराव महाराजांप्रमाणे महाराणी जमनाबाईसुद्धा इंग्रज सरकारच्या मदतीला धावून जात होत्या. बापटलिखित जमनाबाई चरित्रात जमनाबाईंनी इंग्रज सरकारला मदत केल्याविषयी एक आठवण दिली आहे. या संदर्भात बापट लिहितात, “इंग्रज सरकारला अफगाणिस्थानच्या अमीराशी लढण्याचा प्रसंग येऊन चोहीकडून सरहद्दीवर फौजा रवाना होऊ लागल्या, तेव्हा जो प्रसंग इंग्रज सरकारावर तोच आपल्यावर असे समजून मासाहेबांनी एजंटमार्फत कलकत्याचे लाटसाहेब यांजकडे एक खलिता पाठविला, त्यात कापांतील पलटणे सरहद्दीकडे पाठविण्याची जरूर असल्यास पाठवावी. इकडे कापांतील तिजोरी व रेसिडेन्सींचा बंदोबस्त आमच्या लोकांकडून ठेवू, असे मोठ्या आदराने लिहिले होते. ही मासाहेबांची राजनिष्ठा व प्रेम पाहून तिकडून उत्तर आले की, आपल्या सूचनेबद्दल आम्ही आभारी आहोत, जरूर लागल्यास आपल्यास कळवू.” यावरून महाराणी जमनाबाईंची कर्तव्यदक्षता स्पष्ट होते.
गुणवान व्यक्तींची पारख
महाराणी जमनाबाईंना गुणांची पारख चांगल्या प्रकारे करता येत होती. जमनाबाईंनी टी. माधवराव, सर जंग बहादूर, सर सालारजंग, सर दिनकरराव राजवाडे अशा विद्वानांची निवड करून प्रशासन उत्तम प्रकारे चालवले. राज्यकारभार चालवत असताना त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. सयाजीरावांप्रमाणेच राजकन्या ताराबाई यांच्या शिक्षणासाठी त्या आग्रही होत्या. ताराबाईंनाही सर्व प्रकारचे शिक्षण देऊन त्यांनी सक्षम बनवले होते. जमनाबाई शिक्षणाबाबत इतक्या दक्ष होत्या की, ताराबाईंचा अभ्यास कसा झाला आहे हे पाहण्यासाठी त्या अधून मधून टी. माधवराव किंवा जनरल साहेबांचे एजंट यांना ताराबाईंची परीक्षा घेण्यासाठी बोलावत असत. जमनाबाई यांना गाता येत नव्हते पण त्यांना गायन-वादनाची आवड होती. त्यामुळे गायन-वादन करणाऱ्या लोकांचा सन्मान त्यांच्याकडून होत होता.
मुलांचे विवाह
सयाजीरावांच्या दत्तकविधानानंतरची सहा वर्षे ताराबाई आणि सयाजीरावांच्या शिक्षणात गेली. सयाजीरावांचा बहुतांश वेळ जमनाबाईंच्या सहवासात जात होता. कोणत्याही प्रकारचे दुर्गुण त्यांना लागू नयेत म्हणून जमनाबाईंनी सर्वतोपरी काळजी घेतली. पक्षाभिमानी, कारस्थानी, महत्त्वाकांक्षी लोकांपासून त्यांना नेहमी दूर ठेवले.
महाराजांना अठरावे वर्ष आणि ताराबाई यांना नववे वर्ष लागल्याने महाराणी जमनाबाई यांना आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी लागली. राजकन्या ताराबाई यांचा विवाह सावंतवाडीचे राजेबहाद्दूर रघुनाथराव बाबासाहेब सरदेसाई यांच्याशी निश्चित करण्यात आला. तर महाराजा सयाजीरावांचा विवाह तंजावरच्या मोहिते या राजघराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याबरोबर ठरविला. दोन्ही लग्नाची जबाबदारी जमनाबाई आणि टी. माधवराव यांच्यावरच होती. ताराबाई यांचा विवाह ३१ डिसेंबर १८८९ रोजी बडोद्याच्या नजरपागेत मोठ्या थाटामाटात पार पडला. ताराबाईंच्या लग्नाच्या सातव्या दिवशीच ६ जानेवारी १८८० रोजी सयाजीरावांचा विवाह चिमणाबाई (पहिल्या) यांच्यासोबत नजरपागेतच संपन्न झाला. सयाजीरावांचा विवाह संपन्न झाल्यावर संपूर्ण बडोद्यात महिनाभर रोज विविध समारंभ सुरु होते. जमनाबाईंनी राजकन्या ताराबाई आणि राजपुत्र सयाजीराव या आपल्या मुलांच्या विवाहाकरिता लाखो रुपये खर्ची घातले.
राज्याधिकाराची सूत्रे सयाजीरावांच्या हाती सोपविली
विवाह झाल्यानंतर महाराजा सयाजीरावांना राज्याधिकार मिळावा असे जमनाबाईंना वाटू लागले. त्यावेळी महाराजांनी एकोणविसाव्या वर्षात पदार्पण केले. त्यांचा अभ्यासही चांगला झाला होता. सर्व विषयात त्यांनी प्राविण्य मिळविले होते. सयाजीरावांकडे राज्याची जबाबदारी सोपवण्याची विनंती जमनाबाईंनी पत्राद्वारे हिंदुस्तान सरकारकडे केली. ब्रिटीश सरकारची परवानगी घेऊन सयाजीरावांना राज्याधिकार देण्याचे ठरले. त्याप्रमाणे २८ डिसेंबर १८८१ रोजी सयाजीरावांना राज्याधिकार प्रदान करण्यात आले. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतीय जनतेच्या उत्कर्षाची संकल्पना आणि मार्ग यामध्ये अमुलाग्र बदल घडून आला होता. बदललेल्या परिस्थितीत ‘तलवारी’ऐवजी ‘पुस्तक’ हे समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण साधन बनले होते. या बदलाचे भान तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांमध्ये सर्वप्रथम वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत निरक्षर राहिलेल्या बडोद्याचे महाराज सयाजीराव यांना आले. त्यामुळेच ५८ वर्षांच्या कारकिर्दीत सयाजीराव महाराज आपल्या जनतेच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवू शकले. ५८ वर्षे लाभलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सयाजीरावांनी मामा परमानंद, महात्मा फुले, गुरु एफ.एच. इलियट, न्यायमूर्ती रानडे इ. नामवंत व्यक्तींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा त्यांच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन पूर्ण केल्या. म्हणूनच या राज्यारोहणाला समाजक्रांतिकारक राज्यारोहण संबोधणे समर्पक ठरेल.
महाराणी जमनाबाई यांना बालपणापासूनच दानधर्माची सवय होती. कन्या ताराबाईंच्या मृत्युनंतर महाराणी जमनाबाई आपला मोक्ष शोधण्यासाठी दानधर्म, पूजाअर्चा, भजन कीर्तन यामध्ये वेळ घालवत होत्या. त्या वाईमध्ये पाच महिने राहिल्या. त्या ठिकाणी त्यांनी भरपूर दानधर्म केला. राज्याधिकार प्राप्तीनंतर सुरूवातीला काही दिवस सयाजीरावांनी त्यांच्या या अवास्तव दानधर्माकडे दुर्लक्ष केले. ‘एक घाव दोन तुकडे’ न करता आपल्या सवयीप्रमाणे महाराणींना वेळ देत सयाजीरावांनी कालांतराने जमनाबाईंच्या दानधर्मावर नियंत्रण आणले. वाईवरून परतल्यानंतर जमनाबाई महिनाभरच बडोद्यात राहू शकल्या. २९ नोव्हेंबर १८९८ रोजी स्वतः निवडलेल्या आपल्या कर्तबगार दत्तक मुलाच्या मांडीवर डोके ठेऊन मातोश्री जमनाबाईंनी या जगाचा निरोप घेतला.
महाराणी जमनाबाई यांनी अतिशय कमी वयात केलेला संघर्ष, दाखवलेली मुत्सद्देगिरी, हाताळलेली परिस्थिती हा एखाद्या महाकादंबरीचा विषय आहे. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्रातील कर्तबगार १५० लोकांची यादी केली होती हे आपण जाणतोच. ही यादी तीन टप्प्यात गळत-गळत शेवटी महाराष्ट्रातील ७ प्रतिभाशाली व्यक्तींची निवड राजवाडेंनी केली होती. या ७ लोकांमध्ये रानडे, टिळक, गोखले यांच्यासारखे महारथी होते. या ७ लोकांच्या यादीत सयाजीरावांच्या सुधारणांचे कडवे विरोधक असणार्या राजवाडेंनी सयाजीरावांना चक्क पहिल्या क्रमांकावर ठेवले होते हे विशेष. या यादीतील बाकीचे ६ प्रतिभावान ब्राह्मण होते ही बाब येथे नोंद घेण्यासारखी आहे. या १५० लोकांच्या यादीत पहिल्या १५ मध्ये बडोद्याचे ४ गायकवाड होते. या यादीत गणपतराव गायकवाड यांचे नाव ४ नंबरला होते. त्यांचा समावेश राजवाडेंनी बरा आणि अभिमानी संस्थानिक या गटात केला होता. तर ५ नंबरला खंडेराव गायकवाड हे बरा संस्थानिक आणि मल्लविद्या विशारद म्हणून समाविष्ट होते. तर ६ नंबरला सयाजीराव गायकवाड प्रतिभावान व कर्तृत्ववान संस्थानिक म्हणून स्थिरावलेले दिसतात. १५ नंबरला महाराणी जमनाबाई गायकवाड यांचा समावेश मुत्सद्दी म्हणून केल्याचे दिसते. ही बाब फारच लक्षणीय आहे. कारण या १५० जणांच्या यादीत फक्त ४ च स्त्रिया आहेत. बायजाबाई शिंदे आणि जमनाबाई या दोन मराठा तर रमाबाई रानडे आणि पार्वतीबाई आठवले या दोन ब्राह्मण स्त्रिया आहेत. बायजाबाईंचा समावेश दानशूर आणि अभिमानी संस्थानिक म्हणून केला आहे. रमाबाई रानडे आणि पार्वतीबाई आठवले या दोघींचा समाजसेविका म्हणून समावेश दिसतो. या पार्श्वभूमीवर मुत्सद्दी म्हणून जमनाबाईंचा केलेला समावेश महत्वाचा आहे.
हे सर्व वाचताना जिजाऊ आणि शिवराय या माता-पुत्राची आठवण होते. ज्याप्रमाणे शिवरायांना घडवण्यामध्ये एक मुत्सद्दी म्हणून जिजाऊंनी क्रांतिकारक भूमिका पार पाडली होती. त्याचप्रमाणे सयाजीरावांना निवडण्यात आणि घडवण्यात जमनाबाईंचा मुत्सद्दीपणासुद्धा क्रांतीकारक होता. परंतु आपल्या रणरागिणींच्या यादीत या ‘क्रांतिमाते’चा समावेश आढळत नाही. यातच आपल्या इतिहासाच्या पुनर्मांडणीचे महत्व लपले आहे.
No comments:
Post a Comment