छत्रपती राजाराम महाराज आणि मराठी-हिंदी चित्रपटनिर्मिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोल्हापूरला 'कलापूर' ही ओळख मिळाली ती शाहू छत्रपतींनी नाटक, गायन, शाहिरी, चित्रकला अशा विविध कलांमध्ये तरबेज असलेल्या कलाकारांना आपल्या पंखाखाली घेतले म्हणून.
शाहू छत्रपतींच्या अखेरच्या काळात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कोल्हापूरात 'महाराष्ट्र फिल्म कंपनी' चालू केली. आणि स्वतः बनवलेला कॅमेरा वापरुन 'सैरंध्री' हा चित्रपट बनवला. त्यानंतर 'वत्सलाहरण' संत दामाजी, सिंहगड, कृष्णावतार, सावकारी पाश अशा चित्रपटांची निर्मिती या कंपनीद्वारे झाली.
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज या कलेला सर्वतोपरी सहकार्य करतच होते.
व्ही. शांताराम, केशवराव धायबर, फत्तेलाल, दामले हे या कंपनीतील विश्वासू सहकारी. पण 1926 पासून ही मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडण्याचा विचार करु लागली. शेवटी जून 1929 साली या चौघांनी कोल्हापूरात 'प्रभात फिल्म कंपनी' चालू केली. या कंपनीने बनवलेले चित्रपटही बरेच गाजले. तिकडे 1932 साली बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद केली. 'महाराष्ट्र' आणि 'प्रभात' या कंपन्यांद्वारे तयार झालेल्या यशस्वी चित्रपटांमुळे कोल्हापूरचा बराच नावलौकिक झाला.
या चित्रपटांसाठी लागणारे हत्ती, घोडे, वाघ, शस्त्रे, ऐतिहासिक साहित्य हे कोल्हापूर छत्रपतींकडूनच घेतले जाई. राजाराम महाराजांनी सुरवातीला दिलेल्या उत्तेजनामुळेच प्रभात फिल्म कंपनी नावारुपाला आली, असे व्ही. शांताराम यांनी म्हंटले आहे.
त्यावेळी चित्रपटांचे चित्रीकरण सूर्यप्रकाशात म्हणजे दिवसाउजेडीच व्हायचे. नंतरनंतर चित्रीकरणासाठी विजेचा वापरही होऊ लागला. कोल्हापूरात चित्रीकरण करण्यासाठी नियमित व आवश्यक तेवढी वीज उपलब्ध होत न्हवती म्हणून प्रभात फिल्म कंपनी पुण्याला हलवण्याचा निर्णय व्ही. शांताराम आणि मंडळींनी घेतला. या निर्णयामुळे कंपनीत काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले. 'प्रभात' कोल्हापूरातून जाऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. राजाराम महाराजांनी प्रभातच्या उत्पन्नावरील करात सवलत देऊ केली तरीही 1933 साली 'प्रभात' पुण्याला हलवण्यात आली.
छत्रपतींचा चित्रपटनिर्मिती व वितरण क्षेत्रात प्रवेश
------------------------------------------------------------
कोल्हापूरात सुरु झालेली ही चित्रपट निर्मितीची ही महान परंपरा खंडीत होऊ नये आणि कोल्हापूरच्या कलाकरांची आबाळ होऊ नये म्हणून शेवटी राजाराम महाराजांनी स्वतःच्या मालकीचा 'कोल्हापूर सिनेटोन' सुरु केला आणि स्वतः चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले. तत्कालीन भारतात असलेल्या राजांपैकी 'कोल्हापूर छत्रपती' हे पहिले राजघराणे असावे की ज्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था चालू केली.
'कोल्हापूर सिनेटोन'ची सगळी व्यवस्था महाराजांचे विश्वासू सहकारी मेजर दादासाहेब निंबाळकर हे बघत.
1934 साली श्रीकृष्णाच्या कथेवर 'आकाशवाणी' हा कोल्हापूर सिनेटोनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन होते भालजी पेंढारकर यांचे. यानंतर कोल्हापूर सिनेटोनतर्फे 'कालियामर्दन', 'विलासी ईश्वर' अशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली.
दादासाहेब फाळके यांना कोल्हापूरात आमंत्रित करुन ट्रीकसिन्स चा समावेश असणारा 'गंगावतरण' हा चित्रपट हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये कोल्हापूर सिनेटोन ने काढला. हा चित्रपट सुध्दा बराच गाजला. मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी 'स्वराज्याच्या सीमेवर' हा चित्रपट ही 'कोल्हापूर सिनेटोन' मार्फत काढला. चित्रपट निर्मिती बरोबरच कोल्हापूर सिनेटोनतर्फे मुंबई इथं चित्रपट वितरण संस्थेचे ऑफिस सुरु केले.
पुढे कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ बाबुराव पेंढारकरांच्या 'हंस पिक्चर्स' ने चालवायला घेतला. नंतर भालजी पेंढारकरांनी हा स्टुडिओ विकत घेऊन त्याचे नामकरण 'जयप्रभा स्टुडिओ' असे केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एका बाजूला 'कोल्हापूर सिनेटोन' मार्फत चित्रपट निर्मिती सुरु असतानाच पहिला भारतीय कॅमेरा बनवणारे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची थांबलेली चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु व्हावी यासाठी शाहू छत्रपती महाराजांच्या जेष्ठ कन्या राधाबाई आक्कासाहेब महाराज यांनी बंधू राजाराम महाराजांच्या सहकार्याने रंकाळा तलावा शेजारी 'शालिनी सिनेटोन' हा स्टुडिओ सुरु केला. या स्टुडिओ मार्फत बाबूराव पेंटरांनी 'प्रतिभा' हा हिंदी-मराठी भाषांतील चित्रपट, तसेच 'उषा' हा चित्रपट बनवला. 'सावकारी पाश' या चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड ठरलेल्या आपल्या मुकपटावरुन बाबूरावांनी पुन्हा 'सावकारी पाश' हा बोलपट शालिनी सिनेटोनतर्फे तयार केला.
भालजी पेंढारकरांनीही शालिनी सिनेटोन तर्फे 'कान्होपात्रा' हा चित्रपट दिग्दर्शित केला.
कालांतराने हे दोन्ही स्टुडिओ बंद झाले पण राजाराम छत्रपती महाराज यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या दोन्ही स्टुडिओंमुळे पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडातही बरीच वर्षे कोल्हापूर हे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक निर्मात्यांच्या पहिल्या पसंतीचे ठिकाण बनले.
-इंद्रजीत उदय माने
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
राजर्षी शाहू पुत्र राजाराम छत्रपती जयंती
31 जुलै
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
छायाचित्र : एका चित्रपटाच्या सेटवर
छत्रपती राजाराम महाराज व शिवरायांच्या वेशभूषेतील कलाकार
(छायाचित्र सौजन्य:
Ganesh Khodke Ram Yadavसर)
No comments:
Post a Comment