- दिनेश पाटील, वारणानगर
(९६२३८५८१०४)
भारतीय
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यासला असता त्याचे दोन प्रमुख टप्पे
आपल्याला दिसतात. त्यातील पहिला टप्पा हा जहाल विचारधारेचा होता.
इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करून त्यांना आपल्या देशातून हाकलून
लावण्याचे धोरण यामध्ये होते. १८५७ च्या उठावाच्या प्रभावात ही विचारधारा
विकसित झाली होती. या विचारधारेचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे
होते. साधारणत: १९२० पर्यंत ही विचारधारा स्वातंत्र्य लढ्याच्या
नेतृत्वस्थानी होती. १९२० नंतर मवाळ म्हणून ओळखली जाणारी विचारधारा
स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वस्थानी आली. या विचारधारेचे नेतृत्व महात्मा
गांधी करत होते. असे असले तरी १९२० नंतरही सशस्त्र उठावाद्वारेच
स्वातंत्र्य मिळू शकते या विचारावर श्रद्धा असणारा एक गट स्वातंत्र्य
चळवळीत कार्यरत होता. या गटाचा अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी
आग्रही असणार्या
प्रबळ गांधीवादी प्रवाहाशी प्रसंगी संघर्ष होत होता. कमी अधिक फरकाने या
दोन्ही प्रयत्नांचे एकत्रित यश म्हणजे भारताचे स्वातंत्र्य होय.
१९
व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्धचा असंतोष वाढत
चालला होता. जानेवारी १८८५ मध्ये ‘मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन’ची स्थापना
करण्यात आली. फिरोजशहा मेहता, बहरुद्दीन तैय्यबजी, दिनशा वाच्छा हे या
संघटनेचे संस्थापक सदस्य होते. पुढे डिसेंबर १८८५ मध्ये अखिल भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या दोन्ही संस्थांच्या सदस्यांशी व
पदाधिकाऱ्यांशी सयाजीरावांचे जवळचे संबंध होते. मुंबई प्रेसिडेन्सी
असोसिएशनच्या तीन सदस्यांना इंग्लंडला जाण्यासाठी महाराजांनी अडीच हजार
रुपयांचे आर्थिक साहाय्य केले होते. सयाजीराव काँग्रेसच्या अनेक अधिवेशनास
हजर राहिले होते. सयाजीरावांबरोबरच रावबहादूर माधवलाल नंदलाल, हरिलाल
हर्षदराय, अब्बास तैय्यबजी, सुमंत मेहता, मोहनलाल पंड्या आणि दिवाण अंबालाल
साकरलाल हे बडोदा संस्थानचे अधिकारीही काँग्रेसच्या अधिवेशनात उत्साहाने
भाग घेत.
या
सर्व पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव आणि टिळक यांच्यातील संवाद समजून
घ्यावा लागतो. महाराजा सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत सर्व विचारधारांच्या
लोकांशी संवाद ठेवला होता. सत्यशोधक समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज,
अभिनव भारत, हिंदू महासभा या संस्थांना सयाजीरावांचा राजाश्रय होता.
प्रागतिक आणि सनातनी अशा दोन्हीही विचारधारांचे लोक सयाजीरावांच्या
प्रशासनात आणि कारभारात महत्वाच्या पदांवर होते. आपल्या तुलनात्मक धर्म
अभ्यासाच्या जोरावर सयाजीरावांनी कमावलेली दृष्टी या ठिकाणी फलदायी ठरली.
बडोदा संस्थानात सनातनी विचारधारा डोईजड होणार नाही याची पुरेशी काळजी
सयाजीरावांनी घेतली होती.
सयाजीराव
आणि टिळक यांच्यातील नाते तपासले असता स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने
सयाजीराव टिळकांना पाठबळ देताना दिसतात. तर स्वातंत्र्यलढ्याला सर्व
प्रकारची मदत सयाजीरावांकडून घेणारे टिळक आणि इतर सनातनी मंडळी
सयाजीरावांच्या जात आणि धर्म विषयक धोरणांवर सातत्याने टोकाची टीका करताना
दिसतात. येथे उल्लेखनीय बाब म्हणजे टिळक आणि शाहू हा संघर्ष आपल्याकडे
चर्चिला गेला. परंतु सयाजीराव आणि टिळक यांच्यातील असा संघर्ष शाहूंबरोबरच
सुरु असतानाही तो आपण शाहू-टिळक संघर्षाशी जोडून घेतला नाही. परिणामी
पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी या आधुनिक महाराष्ट्रातील संघर्षाचे पूर्ण
चित्र स्पष्ट झाले नाही.
बडोद्याचे शंकर मोरो रानडे – टिळकांचे गुरु
सयाजीराव
आणि टिळक यांना जोडणारा अजून एक महत्वाचा दुवा म्हणजे महाराजांच्या पदरी
नोकरीस असणारे शंकर मोरो रानडे हे संस्कृत तज्ञ टिळकांचे गुरु होते.
महाराजांनी त्यांचा संस्कृत भाषा संवर्धन आणि धर्म सुधारणेसंदर्भातील ग्रंथ
निर्मितीमध्ये कौशल्याने उपयोग करून घेतला होता. रानडे हे ब्राह्मण
अभिमानी आणि सनातनी गृहस्थ होते. असे असताना हा सनातनीपणा बुद्धी कौशल्याने
हाताळत त्यांच्या ज्ञानाचा सयाजीरावांनी आपल्या धर्मसुधारणा कार्यक्रमात
करून घेतलेला उपयोग अनुकरणीय आहे.
राजवाड्यात
होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजण्यासाठी या विधींचे मंत्र
अर्थासह प्रकाशित करण्याचा विचार सयाजीरावांच्या मनात आला. त्यानुसार २३
नोव्हेंबर १८८६ रोजी हु.हु.नं. ५० अन्वये सयाजीरावांनी राजवाड्यात होणारी
सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला.
रा.रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्यावर
ते पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सयाजीरावांच्या आज्ञेवरून
या तिघांनी धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा ‘ऐनेराजमेहेल’
नावाचा ग्रंथ तयार केला.
हेच
शंकर मोरो रानडे आणखी एका संदर्भाने विचारात घ्यावे लागतात. तो संदर्भ
असा की महाराजांनी उपनिषदांचे भाषांतर करण्याचा जो प्रकल्प आखला होता त्या
प्रकल्पातील १२ उपनिषदे व व्यास सूत्रावरील शांकरभाष्य यांचे भाषांतर
करण्याचे काम कुणबी-मराठा जातीतील कृष्णराव अर्जुन केळुसकर यांना देण्याचा
आदेश महाराजांनी केला होता. परंतु महाराजांचा हा निर्णय रानडेंना आवडला
नाही. कारण महाराजांच्या पदरी इतके ब्राह्मण विद्वान असताना उपनिषदांच्या
भाषांतराचे काम संस्थानाबाहेरील शूद्रास सांगावे हे त्यांचा ब्राह्मणी
अहंकार दुखावणारे ठरले होते. त्यामुळे ते महाराजांना भेटले आणि ‘सध्या मी
रिकामाच आहे, म्हणून या उपनिषदांच्या भाषांतराचे काम मी करतो’ असा आग्रह
त्यांनी महाराजांना केला. त्यामुळे १२ पैकी ६ उपनिषदांचे भाषांतर
महाराजांनी त्यांना दिले. केळूसकरांना मॅक्स मुल्लरच्या इंग्रजी
भाषांतरावरून उपनिषदांचे मराठी भाषांतर करण्याचा आदेश महाराजांनी दिला
असताना केळुसकरांनी मूळ संस्कृत ग्रंथावरून उपनिषदांचा उत्कृष्ठ मराठी
अनुवाद केला. असे असतानाही शंकर मोरो रानडे यांनी हा अनुवाद बाद ठरवण्याची
धडपड शेवटपर्यंत केली.
विशेष
म्हणजे केळुसकरांनी हे भाषांतर अल्पावधीत करून दिले. रानडेंनी मात्र या
कामासाठी ३-४ वर्षे घेतली. केळूसकरांचा अनुवाद योग्य आहे की नाही हे
तपासण्याचे काम बडोद्याच्या विद्याधिकाऱ्यांमार्फत रानडेंनी मिळवले. याचा
उद्देश केळूसकरांना अडचणीत आणणे असा होता. परंतु अतिशय कडक तपासणी करूनही
रानडेंना शुद्धलेखनाच्या १०-१२ चुकांपलीकडे दोष काढता आले नाहीत. या
चुकांपैकी फक्त ६ चुका केळुसकरांनी स्वीकारल्या. अशा प्रकारे केळुसकरांनी
रानडेंच्या ब्राह्मण्यावर मात केली. १२५ वर्षापूर्वी एका ब्राह्मणेतराने
संस्कृत भाषेच्या क्षेत्रात एका कर्मठ ब्राह्मणावर केलेली ही मात अत्यंत
लक्षवेधी आहे.
बडोद्यातील बापट प्रकरण
महाराजांनी
सेटलमेंट कमिशनर म्हणून आपले गुरु मि. इलियट यांची नियुक्ती केली. या
जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी वासुदेव सदाशिव बापट नावाच्या
विश्वासू अधिकार्याची
नेमणूक सयाजीरावांनी केली. हे बापट टिळकांचे कॉलेजमधील वर्गमित्र होते.
इलियट जहागीरदार, मानकरी आणि देवस्थानच्या जमिनीची कागदपत्रे तपासू लागले.
या तपासणीदरम्यान अनेकांनी राज्याचा महसूल बुडवून जमिनी बळकावल्याचे समोर
आले. इलियट व बापट या लबाड लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर निर्णय घेवू
लागले. ज्यांनी जमिनी बळकावलेल्या आहेत त्या लोकांनी बडोदा सरकारविरुद्ध
रेसिडेंटकडे अर्ज केले. वासुदेव बापट काम करताना लाच घेतात व लाच न देणार्याविरुद्ध
निकाल देतात अशा तक्रारी केल्या जाऊ लागल्या. इलियट यांचा बापटांवर
विश्वास होता, पण तत्कालीन दिवाण मणिभाई जसाभाई हे इलियट व बापटांच्या
कामावर नाराज होते.
दिवाण
आणि रेसिडेंट बिडुल्फ यांनी एकत्र येऊन बापटांविरुद्ध कारस्थाने सुरू
केली. बिडुल्फ यांच्याकडे आलेल्या बापटांविरुद्धच्या अर्जांची चौकशी
करण्याचे आदेश दिवाणांना दिले. दिवाणांनी रेसिडेंटच्या आग्रहात्सव
बापटांविरुद्ध चौकशी कमिशन नेमले. प्रत्यक्षात मात्र रेसिडेंट यांना
बडोद्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचा काहीच अधिकार नव्हता. परंतु
यादरम्यान सयाजीराव परदेशी असल्याने रेसिडेंटनी दिवाणाला हाताशी धरून
बडोद्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप केला. आपल्याबद्दल दिवाणांची नाराजी
वाढत असल्याने इलियट रजा घेऊन युरोपला गेले.
इलियट
यांच्या जागी सेटलमेंट कमिशनर म्हणून मेकॉनकी नावाच्या अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली. या मेकॉनकींवर बापटांविरुद्धची चौकशी करण्याची
जबाबदारी देवून त्यांना स्पेशल मॅजिस्ट्रेटचे अधिकार देण्यात आले. बापट
कमिशनचे काम सुरू झाले. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या फिरोजशहा मेहता या
नामांकित वकीलांना कागदपत्रे बघितल्यानंतर बापटांविरुद्ध दिवाण आणि
रेसिडेंट यांनी कट केल्याचे लक्षात आले. त्यामुळे मेहतांनी हा खटला
चालवण्यास नकार दिला. अखेर ब्रिटीश सरकारने दुसरे वकील नेमले.
बापटांची
बाजू मांडण्यासाठी पुण्याहून बाळ गंगाधर टिळक बडोद्यात आले. त्यांनी
कमिशनचे साक्षी-पुरावे तपासले. बापटांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा समोर आला
नाही, परंतु रेसिडेंट आणि दिवाणांच्या दबावामुळे कमिशनने १६ मे १८९६ रोजी
यासंबंधी निर्णय दिला. या निर्णयात कमिशन म्हणाले बापटांनी लाच घेतल्याचा
सबळ पुरावा सापडला नाही. परंतु बडोदा संस्थानात नोकरी करत असताना जो
ठरलेला पगार आहे त्याव्यतिरिक्त इतर बेकायदेशीर रक्कम घेतल्याचा
त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असल्याने त्यांना सहा महिन्याची कैद आणि
बाबाशाही दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा केली जावी. अशा प्रकारचा अहवाल
देवून अंतिम निर्णयासाठी महाराजांकडे पाठविला. यावेळी महाराज बडोद्यात
नसल्याने कलेक्टर खासेराव जाधवांनी या प्रकरणाची माहिती महाराजांना
पत्राद्वारे कळवून तात्काळ परत येण्यास सांगितले. पत्र मिळताच सयाजीराव
बडोद्यास परतले. महाराजांनी बापट प्रकरणासंदर्भात खासेराव जाधव आणि अरविंद
घोष यांच्याकडून माहिती मिळविली.
महाराजांनी
या प्रकरणाबद्दल हायकोर्टाचे न्यायमूर्ती अंबालाल साराभाई देसाई, रा.
विनायकराव पंडित, मुलकी खात्याचे प्रमुख रा. जयसिंगराव आंग्रे या
तज्ज्ञांना अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार
दोन विरुद्ध एक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुन्हा हे प्रकरण
हायकोर्टाचे न्यायमूर्ती जमशेटजी खंडाळावाला यांच्याकडे दिले. खंडाळावाला
यांनी बापटांनी लाच घेतली नसल्याचे आपल्या अहवालात सांगितले. सयाजीरावांनी ९
ऑक्टोबर १८९५ रोजी अंतिम निर्णय दिला, “रा. वासुदेव सदाशिव बापट यांना
त्यांजवरील सर्व आरोपांसंबंधाने निर्दोषी ठरविण्यात येत आहे. तथापि या
प्रकरणासंबंधाच्या सर्व हकीकतीचा विचार करिता, रा. बापट यांना या इतउप्पर
या राज्याचे नोकरीत ठेवणे इष्ट नाही. म्हणून त्यांना नोकरीतून मुक्त
करण्यात येत आहे.” बापट निर्दोष आहेत हे सिद्ध झाले असले तरी त्यांना
नोकरीतून काढून टाकावे लागल्याचे दु:ख महाराजांना झाले. या प्रकरणामध्ये
दिवाण मणिभाईंनी जबाबदारी नीट सांभाळली नसल्याने थोड्याच दिवसात दिवाणांना
बदलण्याचा निर्णय महाराजांनी घेतला.
सयाजीरावांनी
बापटांना सेवेतून मुक्त करताना महिन्याला दीडशे रुपये पेन्शन देण्याचा
निर्णय घेतला. ही बातमी रेसिडेंटना समजल्यावर अस्वस्थ होऊन त्यांनी पुन्हा
थयथयाट केला. शेवटी महाराजांनी रेसिडेंटना भेटून स्पष्टपणे सांगितले,
“संस्थानच्या अंतर्गत व्यवस्थेत हात घालण्याचा रेसिडेंटना बिलकूल अधिकार
नाही.” यावर रेसिडेंटने आग्रह धरला, “संस्थानातील बऱ्यावाईट गोष्टींची
माहिती आम्हाला कळवली पाहिजे. हिंदुस्थानात शांतता व सुव्यवस्था नांदावी
याबद्दल ब्रिटिश सरकार जबाबदार आहे, त्याअर्थी त्यांना सर्व हकीकती
कळविल्याच पाहिजेत.” यावर सयाजीराव म्हणाले, “संस्थानात शांतता आहे किंवा
नाही यावर देखरेख ठेवणे एवढेच सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे.
आमच्या अंतस्थ कारभारात लक्ष घालण्याचे काय कारण आहे?”
महाराजांचे
हे बोलणे ऐकून रेसिडेंट उच्चारले, “आपले हे बोलणे म्हणजे हिंदुस्थान
सरकारच्या अधिराज्याचे जू झुगारून देण्याचा प्रयत्न आपण करत आहात, असा अर्थ
आम्ही काढावा का?” ब्रिटिश सरकारच्या हस्तक्षेपास कंटाळलेले सयाजीराव
शेवटी म्हणाले, “तुम्ही आम्हाला नोकर समजता काय? काय चांगले आहे-नाही हे
आम्हाला कळते.” सयाजीराव आणि रेसिडेंट यांच्यातील हा शाब्दिक वाद
सयाजीरावांचा ब्रिटिश सत्तेविरूद्धचा राग व्यक्त करणारा आणि आम्ही तुमचे
मांडलिक नसून सार्वभौम राजे आहोत हे सूचित करणारा आहे.
न्यायमूर्ती
गोविंद महादेव रानडे आणि बाळ गंगाधर टिळक या राष्ट्रीय नेत्यांशी
महाराजांचे जवळचे संबंध होते. सयाजीराव आणि टिळकांची भेट १८९० मध्ये झाली.
बापट प्रकरणानंतर १८९४-९५ ला ती अधिक वृद्धिंगत झाली. या प्रकरणात बाळ
गंगाधर टिळकांनी बापटांची बाजू सांभाळून महाराजांना एक प्रकारे मदतच केली
आहे. सयाजीरावांनी पुण्यातील आपला गायकवाड वाडा टिळकांच्या केसरी, मराठा
वृत्तपत्रास भेट देण्याचे ठरवले. परंतु या गोष्टीला रेसिडेंट यांनी विरोध
केला. शेवटी इंग्रजांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार
दाखवून सयाजीरावांनी हा वाडा टिळकांना भेट दिला. आज हाच वाडा टिळकांचा
केसरी वाडा म्हणून ओळखला जातो.
सयाजीराव आणि गीतारहस्य
१८९४-९५
मध्ये पुण्यात सयाजीराव आणि लेजिस्लेटीव्ह कौन्सिल सदस्य टिळक यांची भेट
झाली. या भेटीत सयाजीरावांनी टिळकांना स्वतंत्र ग्रंथलेखन किंवा ते शक्य
नसल्यास किमान काही महत्वपूर्ण संस्कृत आणि इंग्रजी ग्रंथांचे भाषांतर
करण्याची सूचना केली. त्यावेळी सयाजीरावांचे वय ३२ तर टिळक
सयाजीरावांपेक्षा ७ वर्षांनी मोठे म्हणजे ३९ वर्षाचे होते. तेव्हा टिळकांनी
राजकीय कार्यबाहुल्यामुळे लेखनकार्य शक्य नसले तरी महाराजांची सूचना
अंमलात आणण्याची ग्वाही दिली. याचवेळी सयाजीरावांनी टिळकांनी
आर्यनीतीमीमांसेवर लेखन करावे अशी इच्छा व्यक्त केली असता त्याविषयीची
माहिती आपण जमा केली असून लवकरच स्वतंत्र ग्रंथ लिहिणार असल्याचे टिळकांनी
सांगितले. यावर “आपण असा ग्रंथ लिहिण्यास लायक आहात” या शब्दात
सयाजीरावांनी त्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिल्याचा उल्लेख सदाशिव
विनायक बापट यांनी त्यांच्या ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि
आख्यायिका’ या ग्रंथासाठी सयाजीरावांच्या ३० जानेवारी १९२८ ला बडोद्यात
घेतलेल्या मुलाखतीत आला आहे. (बापट, लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि
आख्यायिका – खंड ३, १९२८, पृ. ३५१-५२)
याच
मुलाखतीत बापटांनी सयाजीरावांना टिळकांच्या कार्याविषयी त्यांचे मत
विचारले असता सयाजीरावांनी टिळकांच्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाविषयीचे त्यांचे
मत मांडले. सयाजीराव म्हणतात, “टिळकांनीं गीतारहस्य हा ग्रंथ चांगला लिहिला
आहे, यांत शंका नाहीं. तरी पण त्यांतील जातीभेदाविषयी त्यांचे विचार
आम्हास मान्य नाहींत. त्यांनीं ह्या बाबतींत आपलें प्रगतीपर धोरण ठेविलें
असें आम्हास वाटत नाहीं. राष्ट्रीय प्रगतीमध्यें सामाजिक प्रगतीचा
अंतर्भाव होतो. आपली गृहनीति व समाजनीति पायाशुद्ध, बिनभेदभाव ठेवणारी अशी
श्रेष्ठ प्रकारची झाल्याशिवाय राष्ट्रोन्नति होणें शक्य नाहीं व कदाचित
झाल्यास ती फार वेळ टिकावयाची नाहीं. उदाहरणार्थ मराठ्यांचें राज्य.”
सयाजीरावांचे हे उत्तर त्यांचे हिंदू धर्म ग्रंथ, भारतीय जातीव्यवस्था आणि
इतिहासाचे संतुलित आकलन अधोरेखित करते. १८८३ मध्ये सयाजीरावांनी टिळकांनी
स्थापन केलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिली. या भेटीत या
शाळेस भरीव आर्थिक मदत दिली. त्यावेळी टिळकांशी झालेल्या चर्चेत आधुनिक
विज्ञानाच्या अभ्यासासाठी युरोपला पाठविण्यासंदर्भात चर्चा झाली. (Keer,
Lokmanya Tilak, 1959, P. 36) ही सुचना त्याचवेळी अंमलात आली असती तर धर्म
आणि जात याबाबत टिळकांची भूमिका अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि उदार झाली
असती.
विशेष
म्हणजे १९१५ मध्ये टिळकांचा ‘गीतारहस्य’ ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर
त्यांचे भक्त करवीरपीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी यांनी भगवतगीतेवर संशोधन
करून अमेरिकेतील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी पदवीसाठी ‘द हार्ट ऑफ
भगवतगीता’ हा प्रबंध सादर केला होता. हा प्रबंध सयाजीरावांनी १९१८ मध्ये
सुरु केलेल्या ‘द कंपॅरेटीव्ह स्टडी ऑफ रिलीजन’ मालेत पहिल्याच वर्षी
प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ ३०० पानांचा होता. भगवतगीतेवरील हे बहुधा
पहिले संशोधन असावे.
भगवतगीतेवरील
ग्रंथांची चर्चा करताना वैचारिक चर्चाविश्वाचे गुरुवर्य केळूसकरांच्या
भगवतगीतेवरील टीकाग्रंथाकडे मात्र दुर्लक्ष होते. केळूसकारांची गीतेवरील
टीका १८९५ ला प्रकाशित झाली होती. म्हणजे टिळकांच्या गीतरहस्य प्रकाशित
होण्यागोदर २० वर्षे. परंतु आजही भल्या भल्या अभ्यासकांना केळूसकरांची ही
टीका ऐकूनसुद्धा माहीत नाही. १८९९ मध्ये सयाजीरावांनी केळूसकरांवर सोपवलेले
सात उपनिषदांच्या भाषांतराचे काम त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर गीतेतील
प्रत्येक श्लोकावर वामन, मुक्तेश्वर, मोरोपंत, तुकाराम व उद्धवचिद्घन यांचे
पद्यमय स्पष्टीकरण देत ‘श्रीमद्भगवगीता सान्वयपदबोध सार्थ आणि सटीक’ हा
टीकात्मक ग्रंथ लिहिला. या ग्रंथावरील दोन अभिप्राय धनंजय कीर संपादित
‘गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर आत्मचरित्र व चरित्र’ ग्रंथामध्ये
नोंदवण्यात आले आहेत.
कीर
लिहितात, “ह्या ग्रंथामुळे कृष्णरावांच्या पांडित्याची,
धर्मशास्त्रज्ञानाची, वेदान्तविषयक ज्ञानाची उच्च श्रेणी प्रत्ययास येते.
ह्या ग्रंथावर अभिप्राय देताना ‘केरळ कोकिळ’ कर्ते यांनी म्हटले आहे की,
‘एकंदरीत ‘गीते’वर आजपर्यंत मराठीत जितक्या म्हणून टीका आहेत, त्या
सर्वांमध्ये ही पहिल्या प्रतीची आहे.’ तसाच अभिप्राय ‘बोधसुधारक’ने दिला
आहे. “श्रीमद्भगवतगीता” ह्या केळुसकरकृत ग्रंथाचा खप मात्र म्हणण्यासारखा
झाला नाही. कारण प्रकाशक नागवेकर भंडारी तर ग्रंथकर्ता मराठा.
धर्मशास्त्राप्रमाणे यांना वेद व वेदांत यांच्या अध्ययनाचा अधिकार नाही.
त्यामुळे तो ग्रंथ वरिष्ठ सुशिक्षित समाजाने वाचावयाचा कसा?” वैचारिक
चर्चाविश्वाकडून केळुसकर लिखित भगवतगीता टीकाग्रंथाकडे करण्यात आलेल्या
दुर्लक्षापाठीमागील कारण ‘बोधसुधारक’चा अभिप्राय स्पष्ट करतो.
हंसस्वरूप स्वामींच्या भाषणाला उत्तर
सप्टेंबर
१९०१ मध्ये बडोद्यात आलेल्या सनातनी हिंदू धर्म समर्थक आणि पाश्चात्य
सुधारणांचे विरोधक असणाऱ्या हंसस्वरूप यांची बडोद्यात ५ व्याख्याने
सयाजीरावांनी आयोजित केली होती. प्रशासनातील परंपरावादी हिंदू धर्म
समर्थकांना हंसस्वरूप स्वामींच्या माध्यमातून आधुनिक विचार पटवून देण्याचा
सयाजीरावांचा विचार होता. हंसस्वरूप स्वामींच्या व्याख्यान आयोजनाच्या
प्रसंगी सयाजीराव आणि स्वामी यांच्यात झालेल्या कराराचे विवेचन करताना
सरदेसाई म्हणतात, “स्वामींस त्यांनीं भेटीस बोलावून त्यांच्या
व्याख्यानांचा कार्यक्रम ठरविला. त्यांनी स्वामींस चक्क सांगितलेॱकी,
तुमच्या या सनातनी ढोंगानेंच ही प्राचीन भारतभूमि अधोगतीस गेली आणि
पाश्चात्य शास्त्रांचा अवलंब तुम्ही न कराल तर तुमच्या या राष्ट्रांत
उत्कर्ष कधीं होणार नाहीं. वादांत हरेल त्यानेॱ दुसर्यांचे प्रतिपादन पत्करावे, अशा प्रकारच्या अटीतटीचा हा सामना उद्भवला.”
२२
ते २७ सप्टेंबर १९०१ दरम्यान लक्ष्मीविलास राजवाड्याच्या आयनेमहालात
झालेल्या ५ व्याख्यानांमध्ये हंसस्वरूप स्वामींनी हिंदी व संस्कृत
वचनांच्या आधारे अस्खलित इंग्रजीमध्ये सनातनी हिंदू धर्माचे महत्व पटवून
देण्याचा प्रयत्न केला. उत्तरादाखल बोलताना सयाजीरावांनी काळानुरूप धार्मिक
परंपरांमध्ये बदलाची आवश्यकता स्पष्ट करतानाच अस्पृश्यांना सन्मानाची
वागणूक देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “
वेदाच्या किंवा गीतेच्या वेळेचा धर्म आता कायम नाही, हे उघड आहे.
परमेश्वर सर्वव्यापी आहे आणि ब्रह्म हे सर्वत्र असून ते पाणी, झाडे, गवत,
दगड, माती, शेण इत्यादी वस्तूंतही आहे, असेही आहे असे म्हणणे म्हणजे एक
प्रकारे (Reductio ad absurdum) प्रमाणच होय. ब्रह्म हे प्रत्येक
प्राणिमात्रात आहे आणि म्हणून प्रत्येक प्राण्याची पूजा केली पाहिजे असे
वाटले, तर ते ब्रह्म आपले देशबांधवात किंवा धर्मबांधवात नाही काय? असे आहे
तर आपण इतर जातींच्या लोकांना म्हणजे धेड, महार, चांभार, भंगी
इत्यादीकांना निर्दयतेने का बरे वागवावे? ... मी म्हणतो, अशा वेळी
देशकालानुसार धर्मसमजुतीतही फेरफार होणे अवश्य होते. समजुती हे धर्माचे
खरे स्वरूप नव्हे, तर काही काळपावेतो टिकणारे असे केवळ बाह्यांग आहे.
धर्माचे खरे स्वरूप तात्विकदृष्ट्या राखावयास म्हटल्यास बाह्यांग टाकलेच
पाहिजे. बाह्यांग नेहमी परिस्थितीवर अवलंबून असते. आपल्या देशाची पूर्वीची
परिस्थिती ज्या अर्थी बदललेली आहे त्या अर्थी आपणास आपल्या धर्माचे
स्वरूप कायम राखण्याकरिता कालमानाप्रमाणे काही फेरफार केले पाहिजेत.”
सयाजीरावांच्या या भाषणावर टीका करताना १ ऑक्टोबर १९०१ रोजी केसरीतील
लेखात टिळक लिहितात, “ईश्वराचे अस्तित्व, वेदांचे प्रामाण्य, गीतेचे
महत्व, वर्णाश्रमधर्मविचार इत्यादी बाबतीतील रहस्ये महाराजांस न
समजण्यासारखी आहेत असे नाही. पण ती समजून घेण्यास त्यांनी अजून बरीच वर्षे
अभ्यास केला पाहिजे. ... विलायतेस दहापांच सफारी केल्याने धर्माचे ज्ञान
होते असे नाही, त्यांस दुसऱ्या पुष्कळ गोष्टींची व गुणांची अपेक्षा
लागते.”
सयाजीरावांनी
याप्रसंगी केलेल्या या भाषणाचा परिणाम सांगताना सरदेसाई म्हणतात,
“दहापांच मिनिटेॱम्हणून बोलायला उठले तर चांगला तास दीडतास पावेतोॱअस्खलित
वाणीनेॱउलटपक्ष अशा युक्तिवादानें त्यांनी इंग्रजींत मांडला कीं,
स्वामींच्या व्याख्यानांवर त्यांनी विरजण घातले आणि पाश्चात्य शास्त्रीय
सुधारणा आपण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाहीॱ, ही भुमिका पटवून दिली. खुद्द
त्या स्वामींनींच एका वाक्यांत आपली कबुली दिली कीं, “महाराज, आपले
म्हणणेॱ मला मान्य आहे. आपल्याला विरोध करण्याची माझ्यासारख्याची योग्यता
नाहीॱ. हिंदुस्थानचें पुढारीपण गाजविणारे आपण एकमेव पुरुष आहांत यांत संशय
नाहीॱ.” हंसस्वरूप स्वामींनी सयाजीरावांची भूमिका मान्य केल्याचे सरदेसाई
स्पष्टपणे सांगतात.
सयाजीरावांनी
स्वामींसमोर भूमिका मांडण्यासंदर्भात केसरीतील लेखात टिळक लिहितात,
“परंतु वेदांन्तासारख्या गहन विषयावर वरचेवर दहा पांच इंग्रजी ग्रंथ वाचून
किंवा श्रवण करून ज्या गोष्टी शाळेॱतील पोरासही सांगण्याची लाज वाटेल अशा
श्री. महाराज सरकारांनी भर सभेंत श्रीमत्स्वामी स्वरूप हंसस्वरूप
यांच्यापुढेॱ बोलून दाखवाव्या हें आमच्यामतेॱ काही उचित नाही. ... वैदिक
धर्माला काहीॱ परंपरा असून इतिहासही आहे. तो समजून न घेताॱ श्री.
सयाजीरावसारख्या बहुश्रत संस्थानिकांनीॱ कांहीॱ वरवरचे ग्रंथ किंवा
भाषांतरेॱ वाचून बडबड करणेॱ बरोबर नाहीॱ. ... त्यांतून वेदान्तासारख्या
विषयावर न विचार करिताॱ बोलणेॱ आणि तेंही श्रीमत् हंसस्वरूपासारख्यांचेॱ
भाषण झाल्यावर बोलणेॱ म्हणजे तर अगदींच अप्रशस्त होय.” हंसस्वरूप
स्वामींनी सयाजीरावांची भूमिका स्पष्टपणे मान्य केली असताना केसरीच्या
लेखात सयाजीरावांवर करण्यात आलेली टीका अनाकलनीय आहे.
जातीभेद – सयाजीराव आणि टिळक
टिळकांनी
हंसस्वरूप स्वामींच्या प्रकरणात मांडलेली भूमिका विचारात घेता त्यांनी
सयाजीरावांच्या जातीभेदविषयक विचारांवर केलेली टीका आश्चर्यकारक वाटत नाही.
जातीभेदाविषयी सयाजीरावांच्या दृष्टिकोनावर टीका करताना १६ मे १८९३
रोजीच्या केसरीच्या अग्रलेखात टिळक लिहितात, “श्रीमंत गायकवाड सरकारांनी
आपल्यामधील जातीभेद नाहींसा झाल्याखेरीज देशाची उन्नती व्हावयाची नाहीॱ व
शिकलेल्या लोकांस जातीभेद मोडण्याचेॱ धैर्य होत नाहीॱ ही मोठ्या दुःखाची
गोष्ट आहे, असेॱ एका प्रसंगी स्पष्ट बोलून दाखविल्या दिवसापासून कित्येक
फाजील सुधारणेच्छू मंडळींच्या मनोविकारास बराच ऊत आला आहे. जणोॱ काय
गायकवाड सरकारांनी मोठ्या परिश्रमानेॱ हिंदुस्थानच्या अवनतीचेॱ हेॱ एक आद्य
कारण शोधून काढून भावी प्रजेस आपल्या राजकीय ज्ञानाचा अमूल्य फायदा फुकट
देवून हिंदुस्थानच्या प्रजेवर ही एक नवीनच मेहरबानी केली आहे. ... हाच
न्याय प्रकृतस्थलीॱ लागू केला म्हणजे श्री. सयाजीराव महाराजांनी
सांगितलेलीॱ हिंदुस्थानच्या अवनतीचीॱ कारणेॱ व तीॱ दूर करण्याचे उपाय बरोबर
असतीलच असेॱ निश्चयानेॱ सांगताॱ येत नाही.” सयाजीरावांनी बडोद्यात
आरंभलेल्या सामाजिक सुधारणांप्रतीचा टिळकांचा नकारात्मक दृष्टीकोन येथे
स्पष्ट होतो. स्वातंत्र्य लढ्याला आर्थिक सहाय्य करणारे आणि सशस्त्र
क्रांतीकारकांना आश्रय देणारे सयाजीराव टिळकांना प्रिय होते मात्र प्रागतिक
विचाराने सामाजिक सुधारणा करणारे सयाजीराव मात्र टिळकांच्या टीकेचे धनी
होते हेच यातून स्पष्ट होते.
याच
लेखात पुढे टिळक लिहितात, “परंतु अलीकडे असा प्रकार होत चालला आहे कीॱ,
आमचे गुण विसरून जाऊन अगर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक आपणास
सुधारक म्हणविणारा गृहस्थ आमच्या दुर्गुणांची टिमकी वाजविण्यास तयार झाला
आहे, व असे हे तुमचे दुर्गुण नाहींसे झाल्याखेरीज आमच्या हातून तुमची
कांहीएक सुधारणा व्हावयाची नाही असेॱ आमच्या कानींकपाळीॱ ओरडत आहे. या
राजश्रीस आमचें एवढेंच उत्तर आहे कीं, तुम्हांस जर आमच्या देशाचे गुणावगुण
लक्षांत आणून आमच्या उत्कर्षाचा कांहीॱ मार्ग काढताॱ येत नसला, तर
मेहरबानी करून आपण या पंचाइतींत पडूॱ नका. आपला हा विषय नव्हे व अशा कामास
अवश्य लागणारे गुणहि आपल्या अंगी नाहींत. आपण विद्वान असलांत तर दोन
पुस्तके जास्त भाषांतर करा म्हणजे झालें.” प्रयत्नपूर्वक ‘विद्वान’
बनलेल्या सयाजीरावांच्या बौद्धिक पात्रतेविषयी टिळकांनी उपस्थित केलेली
शंका पारंपारिक ‘स्वजातश्रेष्ठत्ववादी’ मानसिकतेचे प्रतिक आहे.
बडोद्याचे वेदोक्त
वेदोक्त
म्हटले की आपल्याला कोल्हापूरचे वेदोक्त आठवते. कारण या वेदोक्तानेच
राजर्षी शाहुंमधील क्रांतिकारक जन्माला घातला. इतकेच नव्हे तर पुढे
महाराष्ट्रात तीव्र झालेल्या ब्राम्हणेतर चळवळीचे उगमस्थान म्हणूनसुद्धा
शाहूंच्या वेदोक्ताकडे पाहिले जाते. हे वेदोक्त १९०० मध्ये कोल्हापुरात
उद्भवले. परंतु या वेदोक्तागोदर ४ वर्षे बडोद्यातील वेदोक्ताने या
संघर्षाचा आरंभ झाला होता. सयाजीरावांनी १८९६ ला बडोद्यात सर्व संघर्ष
कौशल्याने हाताळत वेदोक्त सुरू केलेच परंतु १८९८ ला आपल्या राजपुत्रांच्या
मुंजी वेदोक्त पद्धतीने करून हे प्रकरण यशस्वी केले.
राजर्षी
शाहुंप्रमाणे सयाजीरावांनी हे प्रकरण वैयक्तिक प्रतिष्ठेचे केले नाही.
त्याचप्रमाणे त्याला धार्मिक हक्काचे स्वरूपही दिले नाही. सयाजीराव
वेदोक्ताकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून पाहत होते. जर अशा बाबींवर लोक
श्रद्धा ठेवत असतील तर त्या बाबी योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत यापलीकडे
सयाजीरावांनी या प्रश्नाला महत्व दिले नाही. कारण तोपर्यंत सयाजीरावांनी
हिंदू धर्म सुधारणेचा क्रांतिकार्यक्रम आपल्या राजवाड्यातील देवघरापासून
आरंभला होता. पुढे सातत्याने या सुधारणा गतिमान करत १९१५ मध्ये हिंदू
पूरोहित कायदा करून हिंदू धर्मातील सर्व जातींना सर्व धार्मिक अधिकार
समानतेच्या तत्वावर बहाल केले. १९१६ मध्ये भारतातील तुलनात्मक धर्म
अभ्यासाचा पाया घालणारे अध्यासन बडोदा कॉलेजमध्ये सुरू करून आपले धर्म
साक्षरता अभियान सर्वोच्च शिखरावर नेले. त्यामुळे कोल्हापुरातील वेदोक्ताशी
तुलना करता बडोद्यातील वेदोक्त व धर्म साक्षरता अभियान आजही आपल्याला
पथदर्शक ठरावे असे यशस्वी केले.
बडोद्याच्या
वेदोक्त प्रकरणासंदर्भात २२ ऑक्टोबर १९०१ रोजी केसरीत लिहिलेल्या लेखात
टिळक म्हणतात, “अलीकडे इंग्रजी विद्येने व पाश्चिमात्य शिक्षणाने संस्कृत
झालेल्या मराठे मंडळींच्या मनांत जी कांही खुळे शिरली आहेत, त्यांपैकींच
वेदोक्तकर्माचे खूळ हे एक होय. बरेच दिवसांपूर्वी हे बंड प्रथमत: श्री.
गायकवाडसरकार यांच्या प्रोत्साहनाने बडोद्यास सुरु झाले, व त्याचा संसर्ग
आता कोल्हापूरपर्यंत जाऊन भिडला आहे. व इतर ठिकाणीही तोच प्रकार होण्याचा
संभव आहे.” याच विषयासंदर्भात २९ ऑक्टोबर १९०१ रोजी टिळकांनी केसरीत
लिहिलेल्या ‘मराठे आणि वेदोक्त कर्म’ या अग्रलेखाबाबतची मनोरंजक घटना धनंजय
कीरलिखित ‘लोकहितकर्ते बाबासाहेब बोले’ या चरित्रात आली आहे.
कीर
लिहितात, “टिळकांनी २९ ऑक्टोबर १९०१ च्या ‘केसरी’त ‘मराठे व वेदोक्त
कर्म’ या शीर्षकाखाली ‘ब्राह्मणेतरांनी वेद वाचण्याचा आग्रह धरू नये’ असा
अग्रलेख लिहिला. त्यावर सीतारामपंत बोले यांनी टिळकांना पत्र लिहिले. भेट
ठरली व त्याप्रमाणे बोले पुण्यास जावून गायकवाड वाड्यात लोकमान्यांना
भेटले. भेटीत बोले म्हणाले, ‘ऋग्वेदाचे भाषान्तर जर्मनीतील मॅक्समुल्लर
यांनी केले आहे. ते तर हिंदू नसून परधर्मीय आहेत. त्यांनी केलेले भाषान्तर
आपण वाचतो. तर आपल्या हिंदूधर्मातील ब्राह्मणेतरांना वेदपठण करण्याचा व
वेदोक्त पद्धतीने धार्मिक कार्ये करण्याचा अधिकार नाही, असे आपल्या केसरी
पत्रात कसे निवेदन करण्यात आले आहे?’
त्यावर
टिळक म्हणाले, “केसरी पत्रातील सदरहू लेख मी लिहिला नसून माझ्या पश्चात्
लिहिण्यात आलेला आहे. यापुढे केसरी पत्रात तसा लेख येणार नाही.” पण
वेदोक्तावरील तो लेख त्यांचाच आहे, असे त्यांचे लेखनिक आप्पाजी विष्णू
कुलकर्णी यांनी ‘लो. टिळकांची गेली आठ वर्षे’ या ग्रंथात नमूद केले आहे.
शिवाय टिळक चरित्रकार साहित्यसम्राट केळकर यांनी टिळक चरित्रात तो लेख
टिळकांचाच आहे, असे म्हटले आहे. तसेच ‘लो. टिळकांचे केसरीतील लेख : भाग ४
था’ यात वेदोक्त प्रकरणातील अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यास्तव ते
टिळकांचेच आहेत, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. असे असूनही लो. टिळक
शेवटी बोल्यांना म्हणाले, “यापुढे केसरी पत्रात असा लेख येणार नाही. कारण
ब्राह्मणांप्रमाणे ब्राह्मनेतरांनाही वेदपठण करण्याचा व वेदोक्ताप्रमाणे
धार्मिक कृत्य करण्याचा अधिकार आहे.”
टिळकांनी
लिहिले एक व वेळ मारून नेण्यासाठी सांगितले दुसरेच ! कारण बोल्यांकडे
मान्य केलेली गोष्ट त्यांनी सार्वजनिकरित्या कधीच मान्य केलेली नाही; किंवा
तसे आपले निर्भीड मत कोठे लिहूनही ठेवलेले नाही. टिळकांनी संकुचित
वृत्तीच्या पुरोहितांना व वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांना पाठींबा दिल्यामुळे
हे वेदोक्त प्रकरण चिघळले. त्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर
हा वाद माजला व दुफळी निर्माण झाली.” हा प्रसंग सामाजिक बदलांसंदर्भातील
टिळकांची ‘बदलती’ भूमिका स्पष्ट करतो.
टिळकांनी
कोल्हापुरातील वेदोक्ताची पायाभरणी बडोद्यात झाली होती असे म्हणून
बडोद्यातील वेदोक्तबरोबर कोल्हापुरातील वेदोक्त म्हणजे राज्यकर्त्यांचा
धर्म क्षेत्रातील अवाजवी हस्तक्षेप अशा अर्थाची भूमिका घेतली. लोकमान्य
टिळकांच्या मते ‘बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी प्रथम वेदोक्ताचे हे खूळ
डोक्यात घेतले. ते त्यांच्यापुरतेच मर्यादित राहते तर त्याकडे लक्ष
देण्याचे कारण नव्हते. परंतु कोल्हापुरातही शाहू छत्रपतींनी वेदोक्त
अधिकारांची मागणी करून त्यांच्याही डोक्यात हे खूळ असल्याचे दाखवून दिले
आहे. त्यांच्याकडून हे खूळ इतरत्र पसरून समाजाचे नुकसान होण्यापूर्वी आम्ही
या वादातील इतिहास आणि धोरण स्पष्ट करू इच्छितो.’ ‘असे लिहिण्यात आमचा
हेतू कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखविणे हा नाही,’ हे सांगायलाही टिळक
विसरत नाहीत.
या
उदाहरणावरून बडोदा आणि कोल्हापूर यांची वेदोक्ताच्या निमित्ताने टिळकांनी
घातलेली सांगड आपल्या लक्षात येते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे
या संघर्षाचे सुत्रधार म्हणून टिळक सयाजीरावांना दूषण देताना दिसतात.
बडोद्याचा बालविवाह कायदा आणि टिळकांची टीका
सयाजीरावांनी
१९०४ मध्ये बडोद्यात बालविवाहाचा कायदा लागू करून विवाहाचे वय मुलांसाठी
१६ वर्षे आणि मुलींसाठी १२ वर्षे इतके निश्चित केले. तत्कालीन ब्रिटीश
भारत आणि म्हैसूर संस्थानात लागु असलेल्या विवाह कायद्यानुसार विवाहावेळी
मुलींचे वय ८ वर्षे असणे बंधनकारक होते. त्या पार्श्वभूमीवर सयाजीरावांनी
बडोद्यात लागू केलेल्या बालविवाह कायद्यातील तरतुदी क्रांतिकारक होत्या.
या कायद्याविषयी मत मांडताना केसरीमध्ये लिहिलेल्या लेखात टिळक म्हणतात,
“परंतू सामाजिक सुधारणेचेॱ जेॱ एक खूळ केवळ इंग्रजी शिक्षणानेॱ एकदेशीय
बनलेल्या विद्वानांचे डोक्यांत असते त्याचीच थोडीबहुत छाया महाराजांचे
मनावर पडल्यामुळेॱ व त्यांत कांहीॱ वेदोक्त, सामाजीष्ट, सुधारकप्रभूति
मंडळींचा दुजोरा पडल्यामुळेॱ हल्लीॱ सामाजिक सुधारणेच्या प्रवाहास बडोदेॱ
राज्यांत अधिक अधिक ऊत येण्याचीॱ चिन्हेॱ दिसूॱ लागलीॱ आहेत. ... कांही
वर्षापूर्वीॱ म्हैसूरास एक बालवृद्ध विवाह बंद करण्याकरिताॱ एक कायदा
करण्यांत आला. पण त्यांत व हल्लींचे गायकवाडी कायद्यांत जमीन-अस्मानचेॱ
अंतर आहे. हल्लींचे कायद्यासारखा मसुदा आजपर्यंत हिंदुस्थानांत कोठेंही
निघाला नव्हता व पुढेंही कित्येक वर्षेॱ निघेलसेॱ वाटत नाही. असा अपूर्व
कायदा करणारांच्या शहाणपणाची तारीफ करावी तेवढी थोडीच!” या लेखात बालविवाह
कायद्याबाबतच्या सयाजीरावांच्या दूरदृष्टीचे टिळकांनी केलेले अनोखे
‘कौतुक’ चिंतनीय आहे.
बडोद्याच्या
बालविवाह कायद्यात बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांबरोबरच भटजीला देखील ५०
रु. दंड किंवा १ महिना कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. याविषयी
त्याच लेखात टिळक लिहितात, “दंड व्हावयाचा तो पालकासच नसून लग्नांतील
साथीदारांसही व्हावयाचा आहे. या साथीदारांत कोण कोण यावयाचे, याचा मात्र
कायद्यांत कोठेॱ उल्लेख केलेला दिसत नाहीॱ. बहुधा उपाध्ये, करवल्या,
समारंभास बोलावलेले लोक, दक्षिणेचे ब्राह्मण, बँड, ताशेवाले, वाजंत्री,
गाडीवाले व इतर नोकर चाकर या सर्वांचा साथिदारांत समावेश होण्यास हरकत
नाहीॱ व या प्रत्येकांस १०० रुपये दंड होऊॱ लागला म्हणजे सुभ्याचे तिजोरींत
पैसा ठेवण्यास जागाही पुरणार नाहीॱ; व महाराज सरकारचे विलायतेच्या व
काश्मीरच्या प्रवासास रग्गड पैसा होईल.” विवाहातील साथीदारांची विविध नावे
देत टिळकांनी सयाजीरावांच्या कायद्यावर टीका केली आहे. परंतु कायद्यातील
तरतुदी अभ्यासल्यास टिळकांच्या या कायदाविरोधामागे आई-वडिलांबरोबरच
भटजींसाठी केलेली शिक्षेची तरतूद हेच महत्वाचे कारण असल्याचे जाणवते.
रायगडावरील शिवस्मारक जीर्णोद्धार
डग्लस
या लेखकाचा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारा लेख
‘मुंबई आणि पश्चिम हिंदुस्थान’ या पुस्तकात प्रकाशित झाल्यानंतर
शिवसमाधीचा प्रश्न ऐरणीवर आला. डग्लसच्या लेखाची सार्वजनिक चर्चा चालू
असतानाच १८८६ मध्ये न्यायमूर्ती रानडेंनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासंबंधी
पुण्यात एका सभेचे आयोजन केले. या सभेमुळे शिवसमाधी जीर्णोद्धाराच्या
कार्याला गती मिळाली. १८९३ पासून रानडेंनी शिवचरित्र आणि शिवकाल याविषयीचे
लेख लिहिण्यास सुरुवात केली. तर एप्रिल १८९५ पासून टिळकांच्या
‘केसरी’मध्ये शिवस्मारकावर विविध लेख प्रसिद्ध केले जाऊ लागले. हे लेख
वाचून एका विद्यार्थ्याने दोन आणे एवढी रक्कम केसरीला पाठवली.
विद्यार्थ्याच्या या रकमेतूनच शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी स्मारक फंड
गोळा करण्यास सुरुवात झाल्याची नोंद नरहर फाटकलिखित ‘लोकमान्य’ या टिळक
चरित्रात आली आहे.
या
सर्व पार्श्वभूमीवर ३० मे १८९५ रोजी पुण्यातील हिराबाग मैदानात टिळकांनी
शिवस्मारक जीर्णोद्धारासाठी पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन
केले. या सभेत शिवस्मारक जीर्णोद्धारासाठी मदत मागणी व स्मारक कमिटी
नियुक्तीविषयीचे दोन ठराव मांडण्यात आले. या सभेतील शिवस्मारक जीर्णोद्धार
देणग्यांबाबत फाटक त्यांच्या ‘लोकमान्य’ चरित्रात लिहितात, “आता स्मारकाचे
स्वरूप कसे असावे, याची भवती न भवती चर्चा चालू झाली. किल्ल्याकिल्ल्यावर
उत्सव, कथाकीर्तने, पुतळे, व्यायामशाळा, मोफत विद्यालये वगैरे जो तो
आपल्या आवडीप्रमाणे स्मारकाचा विचार सुचवीत होता. देणगीमध्ये या वेळी
डोळ्यात भरणारी घसघशीत अशी हजार रुपयांची रक्कम बडोदेकर महाराज सयाजीराव
गायकवाड यांची एकट्याची होती.” शिवाजी महाराजांप्रती सयाजीरावांची असणारी
‘वैचारिक एकनिष्ठता’ यातून प्रतीत होते.
सयाजीरावांच्या
पुरोगामी धोरणावर टोकाची टीका करणारा केसरी १९३३ मध्ये सयाजीरावांच्या
पुण्यातील ७४ संस्थांनी एकत्र येऊन केलेल्या सत्काराचे वर्णन करताना मात्र
फारच सकारात्मक भूमिका घेताना दिसतो. २४ मार्च १९३३ चा केसरीचा अंक
लिहितो, “हिंदुस्थानांतील संस्थानिकांत त्यांचा दर्जा श्रेष्ठ आहे इंग्रज
राज्य स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रीय संस्थानिकांतहि त्यांच्या तोडीचे
पुरुष फारसे निपजले नाहीत.”
सयाजीरावांच्या सुधारणावादावर जवळजवळ 35 वर्षे टीका करणार्या
केसरीचा हा कबुली जबाब म्हणजे सयाजीरावांच्या धर्म सुधारणन्न्चा
एकप्रकारे विजयच होता. आपल्या टीकाकारांना सयाजीराव आयुष्यभर कामातून
उत्तर देत आले. सायजिरावांना फसवणे, त्यांच्याशी कृतघ्नपणे वागणे असो
किंवा केसरीसारख्या वृत्तपत्रांनी केलेली विषारी टीका असो सायजिरावांनी
कोणाचा द्वेष केल्याचे किंवा ते कोणाशी सूड बुद्धीने वागल्याचे एकही
उदाहरण त्यांच्या ६४ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात आढळत नाही. आपण
ज्यांना क्रांतिकारक, महामानव मानतो अशा कित्येक युगपुरुषांच्या चरित्रात
द्वेष आणि सूड बुद्धीची असंख्य उदाहरणे सापडतात. या पार्श्वभूमीवर
सयाजीरावांचे व्यक्तिमत्व कमालीचे उठून दिसणारे आहे.
गायकवाड वाडा व मृत्युलेखातील कौतुक
सयाजीरावांच्या
मृत्युनंतर केसरीमध्ये प्रकाशित झालेल्या अग्रलेखात सयाजीराव-टिळक
यांच्यातील पुण्यातील गायकवाड वाड्याच्या व्यवहारासंदर्भात स्पष्टीकरण आले
आहे. केसरीचे संपादक या मृत्युलेखात लिहितात, “‘केसरी-मराठा संस्थे’चेॱ
जेॱ कार्यालय पुण्यांत आहे त्याची वास्तू मुळची सयाजीरावांच्या मालकीची
होती. ती त्यांनीॱ लो. टिळकांना १९०४ सालीॱ, १५,४०० रुपयांस विकत दिली;
तरी तिचेॱ नाव-गायकवाडवाडा हेंच रूढ आहे.” केसरीच्या मृत्युलेखात सयाजीराव
आणि टिळक यांच्यामध्ये गायकवाडवाड्याचा १५,४०० रु. ना व्यवहार झाल्याचे
नोंदवण्यात आले आहे. गायकवाड वाड्याबाबत सदानंद मोरे यांनी त्यांच्या
‘गर्जा महाराष्ट्र’ ग्रंथात नोंदवलेले निरीक्षण मार्मिक आहे. सदानंद मोरे
म्हणतात, “लोकमान्य टिळकांना त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गायकवाड वाडा
विकत दिला असला, तरी टिळकांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक किंमत घेऊन
त्यांना तो दुसऱ्या कोणाला विकता आला असता आणि टिळक तेव्हा ब्रिटीश
सरकारच्या ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये होते, हे विसरता कामा नये.”
ब्रिटीश
सरकारच्या ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्या टिळकांना स्वस्त किंमतीत
गायकवाडवाडा देण्यात आल्याचे मोरेंचे हे निरीक्षण हा कागदोपत्री करण्यात
आलेला व्यवहार म्हणजे ब्रिटीश सरकारच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याची
शक्यता व्यक्त करते. या संदर्भात जागृतीकार पाळेकर यांनी १ जानेवारी १९२१
रोजी ‘जागृती’मध्ये लिहिलेले स्फुट महत्वाचे आहे. पाळेकर म्हणतात, “श्री.
सयाजीरावमहाराज यांच्यावर कैक वर्षे ब्राह्मणी पत्रांतून एकसारखी प्रतिकूल
टीका चाललेली होती. ‘केसरी’ तर महाराजांवर भुंकण्याची संधी साधण्यास
सारखा टपून बसलेला असे. हा क्रम ‘केसरी’ला गायकवाड वाडा थोड्याशा किमतीत
मिळेपर्यंत एकसारखा चालू होता.”
सयाजीरावांच्या
हयातीत त्यांच्या विविध सामाजिक धोरणांवर केसरीने सातत्याने टीका केली हे
वरील विवेचनावरून स्पष्ट होते. केसरीत १९३९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या
सयाजीरावांवरील मृत्युलेखात मात्र सयाजीरावांनी राबवलेल्या विविध
सुधारणांचे कौतुक केले आहे. सयाजीरावांनी ब्रिटीशांच्या आधी बडोद्यात
केलेल्या सुधारणांविषयी केसरीचे संपादक या मृत्यूलेखात लिहितात, “त्यांनी
‘धारा सभा’ (कायदेमंडळ) स्थापन करून लोकांच्या प्रतिनिधित्वाचेॱ तत्व
अमलांत आणलेॱ. कांहीॱ बाबतींत तर त्यांनी ब्रिटीश मुलखाआधीॱ आपल्या
संस्थानांत राजकीय व सामाजिक सुधारणा करून दाखविल्या. ब्रिटीश प्रदेशांत
१९४५ सालीॱ न्यायखातेॱ व अंमलबजावणीखातेॱ यांची फारकत करण्यांत आली; पण ती
त्यांनीॱ आधीॱ पन्नास वर्षे आपल्या संस्थानांत केली होती. ... परदेशांत
जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी असंख्य
शिष्यवृत्त्या दिल्या. त्यांचा लाभ झालेल्यांमध्ये डॉ. आंबेडकर हे प्रमुख
आहेत. ... युरोप, अमेरिका, चीन व जपान या परदेशांत प्रवास करून त्यांनी जे
विचार-धन जमविलेॱ, त्याचा उपयोग केवळ त्यांच्या संस्थांनी प्रजेलाच नव्हे,
तर सर्व देशालाहि प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे झाला.”
वरील
सविस्तर चर्चा विचारात घेता सयाजीराव आणि टिळक यांच्यातील नाते
स्वातंत्र्यलढा आणि धर्म-जात सुधारणा या दोन दिशांनी समजून घ्यावे लागते.
बापट प्रकरण, गायकवाड वाडा या दोन बाबींवरून सयाजीराव टिळकांच्या
स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या कार्यात आर्थिक मदतीबरोबर इतर सर्व सहकार्य
करताना दिसतात. टिळक मात्र सयाजीरावांच्या प्रागतिक धोरणांना सातत्याने
विरोध करताना दिसतात. हा विरोध सयाजीरावांच्या बौद्धिक पात्रतेचे मोजमाप
करण्यापर्यंत टोकाला गेलेला दिसतो. परंतु या सगळ्याशी बौद्धिक पातळीवरून
लढणारे सयाजीराव यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्यांना अपेक्षित
असणारे धर्म आणि जात सुधारणेचे काम पूर्णत्वाकडे नेताना दिसतात.
याचे
एक उत्तम उदाहरण म्हणजे १९०४ ला सयाजीरावांनी बडोद्यात बालविवाह
प्रतिबंधक कायदा लागू केला. या कायद्यातील वधू-वरांच्या विवाहाच्या
वयाच्या निकशावरून तसेच बालविवाह लावणार्या
भटजीला दंड करण्याच्या तरतुदीमुळे टिळक भलतेच संतापले. त्यांनी केसरीतून
सयाजीरावांवर यथेच्य टीका केली. विशेष म्हणजे याचवर्षी सयाजीरावांनी
पुण्यातील आपला गायकवाड वाडा कागदोपत्री व्यवहार दाखवून टिळकांना भेट दिला
होता. सयाजीराव आपल्या टिकाकारांकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते याचा हा
उत्तम नमूना आहे.
याउलट
शाहू महाराज मात्र ‘अरे ला कारे’ या स्वभावानुसार टिळक कंपुशी थेट संघर्ष
करताना दिसतात. या कंपुणे अत्यंत हुशारीने शाहूंच्या थेट भिडण्याच्या
स्वभावाचा गैरफायदा घेत शाहूंच्या पुरोगामी धोरणांच्या अंमलबजावणीत
सातत्याने अडथळा आणला. २७ वर्षांच्या शाहूंच्या कारकीर्दीतील शेवटची २२
वर्षे शाहू या वादात अडकून पडले. शाहूंच्या अकाली मृत्यूमध्ये या
संघर्षातून शाहुंची झालेली मानसिक आणि शारीरिक हानी सर्वाधिक कारणीभूत
होती. पुरोगामी महाराष्ट्राला हा संघर्ष कितीही महत्वाचा वाटत असला तरी
फलनिष्पत्तीच्या निकषावर तो अपयशी ठरला होता असेच तटस्थ मूल्यमापन हाती
येते. म्हणूनच सयाजीराव-टिळक-शाहू या विषयावर स्वतंत्र संशोधन झाले तर ते
आपल्या प्रागतिक इतिहासाला महत्वाचे योगदान ठरेल.
केसरीच्या
वरील मृत्युलेखातील मजकूर ‘सयाजीराव हे आधुनिक भारतातील सर्वात महान
राज्यकर्ते कसे होते’ हे अधोरेखित करणारा आहे. शिवरायांच्या नंतर त्यांचा
लोककल्याणाचा वसा कालानुरूप विकसित करून आपल्या कारकिर्दीत तो पुर्णपणे
यशस्वी करणारे सयाजीराव म्हणूनच शिवरायांचे सर्वात ‘परिपूर्ण’ वारसदार
ठरतात. यातच त्यांच्या पुनर्वाचनाचे महत्व सामावले आहे.
No comments:
Post a Comment