विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 9 August 2023

मलकापुर ता शाहूवाडी जि कोल्हापूर येथील अपरिचित ऐतिहासिक कोकरे देसाई घराणे

 

*










मलकापुर ता शाहूवाडी जि कोल्हापूर येथील अपरिचित ऐतिहासिक कोकरे देसाई घराणे.*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी मधून साकार झालेले स्वराज्य साकारण्यासाठी अनेक घराणी प्राणपणाणे झुंझली. त्यातील काहीच घराणे इतिहासाच्या पानावर आली तर असंख्य घराणी ही अजूनही महाराष्ट्राला अपरिचित अशीच आहेत. प्रा. पिंगळे सर म्हणतात मराठ्यांच्या इतिहासावर हजारो पाने खर्ची पडली परंतु आज ही अशी अनेक अव्वल घराणी आहेत ज्यांच्या वर अजून एक पानभर ही लिखाण झाले नाही. अश्याच आपल्या स्वराज्य निष्ठेने इतिहासात अजरामर झालेले एक घराणे म्हणजे राजे कोकरे घराणे होय.
राजे कोकरे घराणे हे मूळचे बारामती तालुक्यातील पणदरे या गावचे. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष म्हणजे तानाजी राजे कोकरे होय. जेंव्हा प्रतापगडाचा रण संग्राम घडला त्या स्वारीत यांचा उल्लेख येतो. पुढे जेंव्हा बजाजी नाईक निंबाळकर यांना अफजल खानाने पकडून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालवला तेंव्हा त्यांच्या सूटकेसाठी नाईकजी राजे पांढरे धूळोजी राजे शेंडगे व तानाजी राजे कोकरे यांचा ऊल्लेख आढळून येतो. तसेच मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरात लुखोजी कोकरे व भिकाजी कोकरे या सरदारांची नावे येतात. यापैकी लुखोजी कोकरे हे महान सेनापती संताजी घोरपडे यांच्या दिमतीला होते. पुढे ह्यांचेच पुत्र सुलतानजी कोकरे हा देखील छ शाहू महाराजांच्या काळात बराच नावारूपाला आला होते .
याच कोकरे घराण्यातील एक शाखा मलकापूर प्रांताची देशमुखी करत होती. या घराण्याचे मूळ पुरुष राजश्री काशीराव बिन पर्वतराव कोकरे देसाई यांना मलकापूर प्रांतांचे देष्कत इनाम व त्यांच्या घरातीलच इतर मंडळीना मौजे निळे या गावची पाटिलकी बहाल केल्याची नोंद आहे. हा मलकापूर प्रांत म्हणजे देश अर्थात घाटमाथा व तळ कोकण यांना जोडणारा दुवा होय. आणि ज्यांना देशावरून कोकणात उतरावयाच आहे त्यांच्या साठी हा राजमार्ग किंबहुना नौदलावर पकड असण्याकरिता हा मार्ग / प्रांत ताब्यात असणे महत्वाचे होते. आणि त्यामुळेच शिव छत्रपती यांनी कोकरे देसाई यांची या ठिकाणी केलेली नेमणूक त्यांच कर्तुत्व अधोरेखित करते. अश्या या मलकापूर ला जाण्याचा काही दिवसा पूर्वी योग आला तेंव्हा आवर्जून ह्यांच्या घरी भेट दिली. तेथील आताचे कोकरे देसाई यांचे वारसदार उदयसिंह कोकरे व त्यांच्या कुटूंबाची भेट घेतली. त्यांच्या मातोश्री व थोरल्या काकी साहेब ह्या मलकापूर च्या नगराध्यक्षा देखील राहिल्या आहेत. तेंव्हा त्यांनी त्यांच्या कडे असणाऱ्या अनेक ऐतिहासिक वस्तु दाखवल्या. मुळात त्यांचा वाडाच मलकापूर मध्ये प्रसिद्ध असून कोकरे देसाई यांचा वाडा कुणालाही विचारल्यास अगदी लहान मुलगा देखील सहज सांगेल. सुमारे पावणे दोन एकरात हा चिरेबंदी वाडा पसरला असून. वाड्याच्या चारी बाजूंना संरक्षणासाठी बुरुज देखील आहेत. मात्र काळच्या ओघात त्यात पडझड झाल्याचे दिसून येते. मलकापुर गावातील दसऱ्याच्या सोहळ्याचा मान ह्याच कोकरे देसाई घराण्यात आजतागायत चालू आहे. आजही कोकरे देसाई यांच्या देवघरात मानाची मराठा धोप व खंज्राली शस्त्र आहे. ह्या दोन अतिशय देखण्या ऐतिहासिक वस्तू असून उलट्या कानाची सोन्याचा मुलामा असणारी 4 फूट लांब म धोप त्यांच्या देवघरात नित्य पुजेत दिसून येते. ह्या वरूनच कोकरे देसाई यांच्या मातब्बरी ची कल्पना यावी. तसेच खंज्राली प्रकाराच एक शस्त्र असून त्यावर दोन शरभ शिल्प हे पराक्रमाचे प्रतीक म्हणून वापरली आहेत. तसेच कीर्तीमुख देखील असून ते संपन्नतेची साक्ष देते. संपूर्ण मुठीवर सोनेरी मुलामा असून एखाद्या स्वायत्त सरंजामदार घराण्याला शोभावी अशी आहे.
मलकापूर ची ओळख सांगण्यासाठी आणखी एक प्रसंग इतिहासाला ज्ञात आहे तो असा जेंव्हा कोंडाजी फर्जंद आपल्या 60 मावळया निशी पन्हाळा घ्यायला निघाले तेंव्हा त्यांचा पहिला मुक्काम मलकापूर च्या देशमुखांच्या घरी होता. अश्या या मलकापूर या ह्या भागात अनेक छोट्या मोठ्या लढाया झाल्या आहेत. त्या मध्ये पन्हाळा ते विशाळगड ही महाराजांची जोखमीची मोहीम असो किंवा खासा औरंगजेब विशाळगडाला वेढा दिला ती मोहीम असो ह्या सर्व घडामोडीत कोकरे देसाई यांचा वाटा निश्चितच मोलाचा असणार मात्र ह्या बाबतीत अधिक संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत उदयसिंह कोकरे देसाई यांनी व्यक्त केले आहे. व मरहट्टी इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक मंडळी निश्चितच या अपरिचित घराण्याचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन देऊन व सरंजामी मरहट्टे हा अनमोल ग्रंथ त्यांच्या हाती सुपूर्द करून माघारी वळलो.
धन्यवाद.
मधुकर हाक्के, सदस्य
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...