नोव्हेंबर १८९९ मध्ये कार्तिक स्नानाच्या वेळी घडलेल्या वेदोक्त पुराणोक्त विधी अधिकार संबंधित उठलेल्या गदारोळाच्या घटनेपासून छत्रपती शाहू महाराजांच्या मनात या संदर्भात विचार मंथन सुरू झालेलं होतं. संपुर्ण महाराष्ट्र या "वेदोक्त प्रकरण" म्हणून गाजलेल्या घटनेनं ढवळून निघाला होता. कोर्ट प्रकरणं सुरू झाली होती. त्याही परिस्थितीत महाराज आपला नियोजित विलायत दौरा आटोपून आले. परतल्यावर या प्रकरणात लक्ष घालून कृती केली. ब्राह्मण पुरोहितांच्या जोखडातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी क्षात्र जगत्गुरुंची नेमणूक करण्याआधी जुलै १९२० मध्ये श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली. आरंभी या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुणे , नाशिक , सातारा , खानदेश या महाराष्ट्र मुलुखातून ६२ विद्यार्थी आले होते.
विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरु पीठाची निर्मिती ( ११नोव्हेंबर १९२०) केलेली सत्यशोधक समाज विचार आचरणात आणणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , भास्करराव जाधव , प्रबोधनकार ठाकरे ( महाराजांचे लाडके कोदंड ) यांना पसंत पडलेली नव्हती. भास्करराव जाधव यांनी तर परिणामांची पर्वा न करता दरबारात क्षात्र जगद्गुरुंना मुजरा करणं ही नाकारलं होतं.क्षात्र जगद्गुरु पीठाचं अध्यक्षपद स्वीकारणं प्रार्थना समाजाचे अनुयायीत्व घेतलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी नाकारलं होतं.
मात्र " विजयी मराठा" कार श्रीपतराव शिंदे , " हंटर "कार खंडेराव बागल अशा मराठी संपादकांनी महाराजांच्या या विचारांचं स्वागतच केलं होतं.
जुन्या राजवाड्यात महाराजांनी बहुजनांना वैदिक शिक्षण द्यायला सुरुवात केली होतीच.
६ जुलै १९२० रोजी रविवार वेशीलगत (आताचा बिंदू चौक) लांबून वैदिक शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलांसाठी हे " शिवाजी वैदिक वसतिगृह" आणि वैदिक विद्यालय सुरू केलं.
ही एक छोटीशी जुनी कौलारु बैठी इमारत असून , जमिनीवर शहाबादी फरशी घातलेली आहे. एक मुख्य दालन ( हॉल) असून दोन लहान खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची रहाण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांचं सामानसुमान ठेवण्यासाठी तिथं लाकडी पेट्या ठेवलेल्या आहेत.
या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अभ्यासक्रम साधारणतः पुढीलप्रमाणे आहे -
प्रथम वर्ष - संध्या माहिती व कृती - पोथी वाचन.
संपूर्ण पूजाविधी ज्यात आरंभापासून संकल्पापर्यंत सर्व विधी मुखोद्गत करुन घेतले जातात. पुरुषसुक्त , रामरक्षा स्तोत्र , महिम्न स्तोत्र , आरत्या , मंत्रपुष्प, मंगलाष्टका व गणेशपूजनापासून षोडपचार पूजा आदी शिकवलं जातं.
ज्योतिषशास्त्रातील संवत्सर , अयने , ऋतु, नक्षत्रे , योग , करण, राशी , पक्ष , तिथी , स्फूट ज्योतिष इ. शिकवतात.
सण , वार , मराठी महिने शिकवले जातात.
संस्कृत पुस्तकं अर्थासह वाचन , शब्द रुपावली , विभक्तीनुसार चालवणं शिकवतात.
रामरक्षा १० श्लोक , महिम्न १० श्लोक पाठांतर करून घेतलं जातं.
द्वितीय वर्ष -
सत्यनारायण पोथी संस्कृत श्लोकासह वाचन ,
हरितालिका, वटसावित्री , अनंतपूजा , ऋषिपंचमीपूजन पोथीवरून सांगण्यास शिकवलं जातं.
संपूर्ण लग्न विधी शिकवून प्रमुख विधीमंत्र पाठ करून घेतले जातात.
महालय ( म्हाळ , श्राध्द ) , श्राध्द मंत्रांचं पठण करुन घेतलं जातं.
पंचांगाची पूर्ण माहिती दिली जाते.
पंचांगातील ऋतु , नक्षत्र , योग ,अयन , करण, राशी , तिथी , मितींची माहिती पंचांगावरुन सांगायला शिकवलं जातं. स्फूट ज्योतिष मंत्र पाठ करून घेतले जातात.
शब्द रुपावलीतील तिन्ही- स्त्री , पुल्लिंगी , नपुसकलिंगी लिंगातील २० शब्द चालवायला शिकवलं जातं.
गीता श्लोक पाठांतर घेतलं जातं.
मासानुसार सर्वसाधारण सण वार
माहिती देण्याची तयारी करून घेतली जाते.
चातुर्मासातील धार्मिक विधी शिकवले जातात.
स्तोत्रांचं स्पष्ट व शुध्द वाचन करायला शिकवतात.
तृतीय वर्ष -
संध्या , षोडशोपचार पूजा , पूरुषसूक्त , विष्णू सूक्त, गणपती अथर्वशीर्ष पाठ केलं जातं.
आरत्या - मंत्रपुष्पासह प्रार्थना, आशीर्वचन, उत्तर पूजा पूर्णपणे करण्याची तयारी करून घेतली जाते.
सत्यनारायण पूजा , वटसावित्री , हरतालिका पूजन, अनंतपूजन विधीपूर्वक स्पष्ट व शुध्द उच्चारात मंत्रपाठ करणं शिकवतात.
रामरक्षा , शिवमहिम्न स्तोत्र, रुद्र , श्री सूक्त, देवे , पवमान पाठ करावं लागतं. गीता पाठांतर करावं लागतं.
लग्नविधी - वाड्.निश्चय, पुण्याहवचन, सीमांत पूजन, कन्यादान , सप्तपदी , लाजाहोम इ. विधी समंत्र पाठ करून शिकवले जातात.
वास्तू शांती , जनन शांती, नक्षत्र शांती वगैरे विधीपूर्वक करण्यास शिकवलं जातं. विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करायला शिकवलं जातं.
श्राध्द महालय प्रत्यक्ष कृती शिकवली जाते.
अंत्येष्टी विधी , पंचक, त्रिपाद नक्षत्रे यांची माहिती व त्यांची शांती करायला शिकवतात.
पहिल्या दुसऱ्या वर्गातील विषय - मंत्र श्लोकादी विषय पूर्ण पाठ यावे लागतात.
ज्योतिषातील अभ्यासानुसार जन्मतारीख , वेळावरुन कुंडली मांडता यावी लागते. स्फूट ज्योतिष, श्लोक सार्थ पठण यावं लागतं. शक , संवत्सर , पक्ष , इसवी सन अयने , तिथी , नक्षत्रे, करण , योग यांची क्रमवारी सांगता यावी लागते.
असा हा तीन वर्षांचा पूर्ण अभ्यासक्रम आहे. कोणत्याही जातीतील विद्यार्थी इथं राहून हा वैदिक शिक्षणक्रम पूर्ण करु शकतो.
सध्या हे विद्यालय श्री शाहू एज्युकेशन सोसायटी - कोल्हापूर या संस्थेमार्फत चालवलं जातं.
शिकवण्यासाठी शिक्षक आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणक्रम पूर्ण करुन गावोगावी अनेक ठिकाणी आपली उपजीविका चालवत आहेत.
कोल्हापूरात अनेक घरांमध्ये नित्यपूजेसाठी इथल्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नेमलेलं आहे. डॉ.केळवकरांच्या घरात नित्यपूजेसाठी इथले गुरुजी नेमलेले आहेत असं मला समजलं आहे त्याप्रमाणे इतर काही ठिकाणी सुध्दा नित्यपूजेसाठी इथले प्रशिक्षित पुरोहित जातात.
संरक्षण दलातील प्रत्येक बटालियन मध्ये " पंडित " नेमले जातात. या पदासाठी इथल्या प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पूजांव्यतिरिक्त चांगल्या नोकरीची संधी इथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होते.
शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टीच्या छत्रपती शाहू महाराजांनी हे विद्यालय सुरू करुन काळाच्या पुढची पावलं उचलली. आज या इमारतीची अवस्था जीर्ण असली तरी तिथं घडणारं कार्य मोठं आणि बहुजन समाजाला नवं बळ देणारं ठरलं आहे , हे निश्चित.
मात्र एवढ्या महत्वाच्या वास्तूची थोडी डागडुजी व दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं. प्रवेशद्वारापाशी लागलेले फ्लेक्स आणि जाहिराती यामुळे या संस्थेचा फलक झाकोळून जातो असं वाटतं. शाहुमहाराजांच्या बहुजन समाज प्रगतीपर महत्वपूर्ण कार्याची साक्ष देणाऱ्या या वास्तूचं व्यवस्थित जतन व देखभाल व्हायला हवी अशीच भावना कुणीही शाहुप्रेमी व्यक्त करेल. हे विद्यालय चालवणाऱ्या श्री शाहू एज्युकेशन सोसायटीचा विद्यालय नूतनीकरणाचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे दिलेला आहे. मागच्या बाजूला राखीव जागेत पार्किंग केल्यामुळे काही अडचणी आहेत त्यांचा पुनर्विचार व्हायला हवा. आजच्या क्रांतीदिनी शंभर वर्षांपूर्वी द्रष्ट्या छत्रपती शाहू महाराजांनी उचललेल्या क्रांतिकारक पावलांची ही आठवण !
ऋणनिर्देश -
श्री विक्रमसिंह यादव.
श्री शाहू वैदिक विद्यालय.
९ ऑगस्ट २०२३
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
९८८१२०४०५०
No comments:
Post a Comment