विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

ऐतिहासिक गाव - कामरगाव

 


ऐतिहासिक गाव - कामरगाव
दैनिक जलभूमी,माझा लेख दिनांक २७.०७.२०२३ऐतिहासिक कागदपत्रातील माझं गाव - कामरगाव
इतिहास तसा रुक्ष वाटणारा विषय. परंतु आपण जिथं राहतो तिथला इतिहास प्रत्येकाने जाणून घेतलाच पाहिजे. जगाचा इतिहास शाळेत शिकवला जातो स्थानिक इतिहास मात्र दुर्लक्षित राहतो. माझं गाव कामरगावला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातील काही निवडक ऐतिहासिक पुरावे मला सापडलेले
सर्वात पहिला उल्लेख येतो तो सुप्याच्या पवार घराण्याच्या कागदपत्रात- पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसींग (शंभु सिंग) पवार कांबरगावच्या रानात वस्ती करुन असल्याचा. हा काळ होता इसवी सन १६१० ते १६१५ चा. यांचा मुलगा कृष्णाजी पवार यांची छञपती शिवाजी महाराजांच्या ३३ विश्वासू सरदरात गणना होते.
गुंडाजी नरसिंग यांची शके १५७७ ची म्हणजे इसवी सन १६५५ ची सनद ज्यामध्ये पांडे पेडगाव परगाण्यातील तर्फ अकोळनेर मध्ये ५१ गावं होती. त्यापैकी एक गाव कामरगाऊ म्हणजे कामरगाव.
गावाला समृद्ध अध्यात्मिक वारसा सुध्दा लाभला आहे . गावात संत निळोबाराय संत निंबराज महाराज यांची कीर्तने होत असत. संत निळोबा राय यांचे एक कीर्तन
दि. ०२ फेब्रुवारी १७१० तिथी - माघ पौर्णिमा रोजी झाले.
प्रसंग होता श्रीहरीच्या मूर्ती स्थापनेचा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे शिष्य संत निळोबाराय पिंपळनेरकर (जन्म- इसवी सन १६५६ )यांचे कीर्तन गावात झाले. निळोबा राय हे वारकरी संप्रदायातील चैतन्य संप्रदायातील एक संत . वयाची पंचाहत्तरी लागलेले निळोबा बसून कीर्तन करत असत. या कीर्तन प्रसंगी अट्टल गुन्हेगार भिमाप्पा वंजारी कीर्तनास हजर होता. हे कीर्तन ऐकून त्याने आपला वाटमारीचा धंदा सोडला. ज्या श्री हरींच्या मूर्तींची स्थापना गावात केली त्या मात्र आता गावात आढळत नाहीत . नागनाथ मंदिराशेजारी विठू पिठू, नारायण यांच्या समाधी आहेत.
कामरगावाची पाटीलकी ज्या आंधळे घराण्याकडे होती त्या सावजी बापुजी यांनी गावात एक गढी बांधली होती ती शके १६२१ म्हणजे इसवी सन १६९९ मध्ये.
यानंतरचा काळ येतो तो पानिपत वीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांचा. यांचा जन्म इसवी सन १६९५ चा समजला जातो. त्यांनीं गावात एक गढी बांधली होती. नगर पुणे रस्त्यावरून प्रवास करताना किल्लेवजा गढी आप आपल्या नजरेत भरते. यांचा पत्रव्यवहार लांबलचक असायचा. एके ठिकाणी ते म्हणतात - कामरगाव म्हणजे शेवकाचा वतनाचा गाव. राशीनच्या यमाई देवी च्या ओवऱ्या यांनी बांधल्या तिथे ते लिहितात गाव कामगार - कामरगाव.
गावात नागनाथाचे पुरातन मंदिर आहे त्या समोर बारव शके १६४२ म्हणजे सन १७२० मध्ये बांधल्याचा उल्लेख आढळतो.
सन १७६१ च्या जानेवारी महिन्यात सरदार अंताजी मानकेश्र्वर धारातीर्थी पडले. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात गावात एक लढाई झाली तिचा वृत्तांत गोपाळराव पटवर्धन यांनी आपल्या वडिलांना गोविंद रावांना याचा वृत्तात मार्गशीर्ष शु. २ दि. २७ डिसेंबर १७६१ रोजी पत्राने कळविला .निजाम अली विरुध्द राघोबा दादा यांचे सैन्य तो असा
पानिपतावरील मराठयांच्या हानी नंतर निजाम अली सैन्य गोळा करुन १७६१ च्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यावर चालून आला. त्याचे सैन्य साठ हजारांच्या आसपास होते. पेशव्यांनी हि आपले सैन्य जमा केले. निजाम अलीला पेशव्यांनी कडवा प्रतिकार केला. २२ डिसेंबर १७६१, मंगळवारी एकादशी च्या दिवशी निजाम अली निंब देहऱ्याचा घाट चढून कामरगावात दाखल झाला. तेथे त्याला जानोजी भोसले, बाबूजी नाईक बारामतीकर यांनी प्रतिकार केला दोन्ही कडची शे पन्नास माणसं मारली गेली. नारो शंकराची फौज यात सामील झाली नाही. मल्हार राव रास्ते , विसाजी कृष्ण व हरी गोपाळ यांनी. लढाई केली. शे पन्नास माणसे घोडी ठार झाली. गोपाळराव पटवर्धन त्रयोदशीच्या दिवशी लढाईस उतरले. राघोबा दादा ही लढाई गावा जवळच्या टेकडी वरून पाहत होते. रास्ते ,विसाजी कृष्ण यांची हत्यारे चालली नाहीत. तरीही लढाई चांगली झाली असे गोपाळराव सांगतात. शेवटी राघोबा दादांचा भोसल्यावर फार भरवसा आहे असे म्हणतात. पेशवाई राज्य बुडवावे असे दादांच्या मनात आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केली नंतर ते खरेही झाले ...(संदर्भ: ऐतिहासिक लेख संग्रह, भाग १)
आताचं गाव जिथं आहे ते पूर्वी गावा जवळच्या पांढरीत होत. इसवी सन १७०९ म्हणजे इसवी सन १७८७ मध्ये गावठान हलवले असल्याचा उल्लेख गंधे यांच्या कागद पत्रात सापडतो. याचं पुरावा म्हणून वेशीवर सके १७०९ असे लिहून ठेवले आहे.
इंग्रजी अमदानीत सन १८७२ ला खानेसुमारी झाली गावची लोकसंख्या भरली ११४६. याच काळात नगर पुणे रस्त्यावर टोल नाका असल्याचा आणि ४ आणे टोल घेत असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या प्रवास वर्णनात आढळतो.
जैन संत तिलोक ऋषिजी महाराज यांनी नोव्हेंबर १८८१ मध्ये 'गौतम स्वामी का रास ' नावाचा ग्रंथ लिहिला तो कामरगाव मध्येच.
कोणी एके काळी गावात झालेल्या लढाईची स्मरण चित्रं गावच्या वेशीवर पाहायला मिळतात.
इतिहासाच्या मूक साक्षदार असणाऱ्या वीरगळी गावात पाहायला मिळतात. ज्या गावचा इतिहास ७०० ते ८०० वर्षे मागे नेतात.
अशा ज्ञात अज्ञात ऐतिहासिक अवशेषांनी समृद्ध माझं गाव एकदा भेट द्याव असच...
© सतीश भिमराव सोनवणे , कामरगाव , मोबा. ७७०९६८३३२३

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...