संत निंबराज हे सतराव्या शतकातील एक महान संत. संत एकनाथांना गुरू स्थानी मानणारे संत नरहरी हे निंब राजांचे गुरू. निंबराज व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पंढरीत भेट झाली असे म्हणतात. त्यांनी देव दैठण येथे शके १६०० (इसवी सन १६७८) मध्ये समाधी घेतली.याचं परंपरेत पुढे जयराम येतात. या जयरामाचे शिष्य नारायण हे जुन्नर येथे वास्तव्यास होते. यांजी अश्विन वद्य चतुर्थी च्या दिवशी कामरगाव येथे समाधी घेतली. यांच्या परंपरेतील संतपिवळे वस्त्र परिधान करीत व त्यांचा ध्वज ही पिवळा होता.याचा उल्लेख . अनंतसुत विठ्ठल लिखित श्री दत्त प्रबोध (शके १७८२ - इसवी सन १८६० ) या ग्रंथांत आला आहे. हे नारायण कोण? याविषयी माञ माहिती उपलब्ध नाही.
श्री दत्त प्रबोधाच्या एकसष्टव्या अध्यायात - सद्गुरू सांगती शिष्यास| समाधी घेणे आता आम्हास| कांबर गावास तुम्ही यावे| आश्विन शुध्द चतुर्थीसी नेमिला नेम निश्चयेसी| असा उल्लेख आहे. या प्रमाणे त्यांचें शिष्य महिपती यांना अधिकार देऊन नारायण यांनी समाधी घेतली. त्यावेळी 'वृंदावन विठू पिठू चे डोलले' असे वर्णन केले आहे
समाधीची जागा निवडताना त्यांनी साधू विठू पिठू यांच्या समाधी शेजारची जागा निवडली. त्यावेळी १५ दिवस भजन कीर्तन सोहळा चालला. अन्नदान करण्यात आले.
कामरगाव च्या नागनाथ मंदिरा शेजारी एक तुळशी वृंदावन आहे ते म्हणजे विठू पिठू यांची समाधी आणि थोडे पुढे नारायण यांची समाधी आहे.
या नारायण यांचे शिष्य अनंत त्यांचा पुत्र विठ्ठल उर्फ कावडी बुवा यांनी श्री दत्त प्रबोध ग्रंथ इसवी सन १८६० मध्ये लिहून पूर्ण.केला. यावरुन काल क्रम ठरवल्यास नारायण हे १८व्या शतकातील असावेत. या ग्रंथात कालोल्लेख नसल्याने निश्चित वर्ष सांगता येत नाही. विठूपिठू हे त्या अगोदर चे १५ -१६ व्या शतकातील असावेत. त्यांचा समाधी उत्सव माघ महिन्यात होत असल्याचा उल्लेख कामरगाव दफ्तरात सापडतो.
या अनंत सुत विठ्ठल यांचा उल्लेख महाराष्ट्र कवी चरित्र या पुस्तकात आला आहे. तसे या संता बद्दल स्थानिक लोकांना सुद्धा फारशी माहिती नाही. समाधी वर शिलालेख नसल्याने ते विस्मृतीत गेले.
©श्री सतीश भिमराव सोनवणे , कामरगाव
संदर्भ: श्री दत्त प्रबोध , अध्याय ६१,
महाराष्ट्र कवी चरित्र, पृष्ठ क्र २३०
No comments:
Post a Comment