काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील सुपा गावापासून ७ किमी अंतरावर असलेल्या रायतळे गावाला भेट दिली. तेव्हा अनपेक्षितपणे एक सुंदर वास्तू नजरेस पडली. स्थानिक लोकांच्या मते हे महादेवाचे मंदीर आहे. जवळ जाऊन पाहिले तर हे मंदीर नसून मराठा सरदाराची छत्री असावी असे वाटले. छत्री वर आठ ओळींचा देवनागरी शिलालेख आढळला. त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बऱ्यापैकी खराब झालेला असल्याने छाप घेऊनही काही शब्दच ओळखता आले. शिलालेख सुरुवात अशी -
१.राजेश्री सं
२. भाजी पवार
स्वराज्य उभारणीत ज्यांनी मोलाचं योगदान दिलं अशा पवार घराण्यातील योद्ध्याची राजेश्री संभाजी पवारांची ही छत्री. काही अभ्यासकांच्या मते संभाजी पवारांची समाधी मलठण येथे असावी.तेथेच समोर एक शिळा आहे ज्यावर शिव लिंग आणि अश्वारूढ मराठा सैनिक कोरलेला आहे. केरोजी पवारांची छत्री पळवे येथे आहे.
पराक्रमी पवार घराणे -
पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसिंग (शंभु सिंग ) पवारांना मानले जाते. निजाम शाहीत मलिक अंबरच्य काळात हे उदयास आले. सुरवातीला ते कामरगाव जवळच्या डोंगरात राहत असत. नंतर त्यांनी सुखेवाडी नावाचे गाव वसवले तेच आजचे सुपे. हंगे गावच्या दळवी पाटलाशी यांचा पाटीलकी वरून वाद होता.शहाजी राजांच्या काळात त्यांनी बऱ्याच गावात पाटीलक्या संपादन केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिला. महाराजांबरोबरही त्यांनी बऱ्याच कामगिरी केल्या. सुपे येथे त्यांची गढी आहे. यांचे सुपुत्र कृष्णाजी पवार महाराजांचे एक विश्वासू सरदार होते. यांनी अफजल खानाच्या स्वारी वेळी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना तीन पुत्र होते बुवाजी, रायाजी आणि केरुजी. यापैकी बुवाजि यांना दोन पुत्र होते थोरले काळोजी व धाकटे संभाजी. बुवाजी , रायाजी व केरूजी यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे साम्राज्याचा विस्तार करण्याचे कामास जमायत बाळगून मुलुखांतील बंडे मोडली व बंदोबस्त केला, आणि तापी तीरापर्यंत स्वराज्याचा अम्मल बसविला. अशीं मोठमोठी विश्वासाची कामे यानी बजावली म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनीं बुबाजी यास विश्वासराव हें सन्मानाचे पद व सरजाम दिला व केरोजी यास “ सेनाबारासहस्त्री "ही बहुमानाची पदवी दिली.
बुवाजी पवार यास पुत्र दोन त्यांची नांवें.
वडील पुत्र काळोजी पवार- यास पुत्र चार त्याचीं नावे
१ कृष्णाजी पवार विश्वासराव वडील.
२.तुकाजी पवार गणेगांवकर.
३. जिवाजी पवार हिंगणीकर.
४. मानाजी पवार सुपेकर धाकटे,
धाकटे संभाजी पवार यासी. पुत्र तीन त्यांचीं नांवे:
१ उदाजी पवार मलठणकर,
२.आनंद राव पवार कवठेकर
३.जगदेवराव चितेगांवकर.
कोण होते संभाजी पवार -.
संभाजी पवारांचा कार्यकाळ १७व्या आणि १८ शतकातील मानता येईल. यांच्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. बुबाजीचे धाकटे पुत्र संभाजी पवार हे जिंजीच्या वेढ्या पासून कामागिऱ्या बजावत असून छत्रपती शाहू महाराजांचे वेळीं लप्कर बाळगून मोहिमांवर जात असत, ही गोष्ट शाहु महाराजांची रोजनिशी लेखांक १ ( ता० २० मे १७१४ ) वरून स्पष्ट आहे. संभाजी पवार मोठा कर्ता पुरूष असून दीर्घायू होता. त्यानें प्रथम मलठणास नवीन घर बांधिलें व आपले मुलांस व नातवास आणखी पाटिलक्या व वतनें खरीद करून देऊन नगर जिल्ह्यांत निरनिराळ्या ठिकाणी बसविलें. संभाजी पवारास तीन पुत्र होते. उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव. यांपैकीं उदाजीरावांची मराठी साम्राज्याच्या इतिहासांत फार प्रसिद्धि आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे कितीतरी योद्धे विस्मृतीत गेले. त्यांच्या छत्र्या / समाध्या आजही अज्ञात आहेत.
© सतीश भिमराव सोनवणे
दि. १६.०९.२०२३
संदर्भ - १.धार संस्थानचा इतिहास, काशिनाथ कृष्ण लेले व शिवराम ओक २. मध्ययुगीन चरित्रकोश ३. सुपेकर पवार कैफियत
No comments:
Post a Comment