विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 September 2023

१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या भाग २

 

१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या
लेखक :रमेशचंद पाटकर

भाग २
ज्या स्त्रियांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंड केले, त्यापैकी एक होती बेगम हजरत महल. हे बंड झाले त्या वेळी मोगल बादशहा बहादूर शाह जफर (दुसरा) राज्य करत होता. त्याच्या बाजूने ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे शिपाई बंडात सामील झाले. बंडखोरांनी बादशहा जफरला ‘शहेनशाह-ए-हिंद’ हा किताब दिला होता. बंडखोरांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला, तेव्हा त्यात राजे, सरदार, जमीनदार, शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य लोक होते.
अवधचा नवाब वाजिद अली शाहच्या निधनानंतर त्याची पत्नी बेगम हजरत महलने ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध दोन हात केले. बेगम आणि तिच्या सरफद-दुल्ला, महाराज बाळकृष्ण, राजा जयलाल आणि मम्मू खान या तिच्या विश्वासू सरदारांनीही कडवा संघर्ष केला. त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला माघार घ्यावी लागली आणि बेगमशी तह करावा लागला.
या लढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हजरत महलने या उठावाचे नेतृत्व केले होते. तहात झालेल्या करारानुसार कंपनीला बळकावलेला प्रदेश परत द्यावा लागला. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला कंपनी सरकारने दिलेला नकार, या संघर्षामागे होते. हजरतने आपल्या अकरा वर्षांच्या मुलाला अवधच्या गादीवर बसवले आणि ती त्याच्या नावाने राज्य करू लागली.
ब्रिटिशांना कर देण्यास नाखूश असणारे जमीनदार व शेतकरी बेगमला कर देऊ लागले. पण हे स्वातंत्र्य काही काळ टिकले. ब्रिटिशांशी शेवटपर्यंत लढणाऱ्या बेगम हजरत महलला शेवटी नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथे १८५९ साली तिने शेवटचा श्वास घेतला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...