१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या
लेखक :रमेशचंद पाटकर
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला १८५७च्या बंडाने दिलेला हादरा हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ होता. या लढ्याचा महत्त्वाचा विशेष होता- हिंदू व मुस्लीम यांची ब्रिटिशांच्या विरोधात झालेली एकजूट. शिवाय सर्वसामान्य जनतेचा त्यात सहभाग होता. या लढ्याने पुढील लढ्यांना प्रेरणा दिली. हा लढा उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता, तर दक्षिणेतील महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता.
या लढ्याचा दुसरा विशेष म्हणजे त्यात असलेला स्त्रियांचा सहभाग. त्यात बेगम हजरत महल आणि राणी लक्ष्मीबाई या राजघराण्यातील स्त्रियांबरोबरच कित्येक स्त्रियांनी भाग घेतला होता. त्यात दलित किंवा वंचित स्त्रियांबरोबरच कोठ्यात नाचणाऱ्या, गाणाऱ्या स्त्रियांही (वारांगना) सामील झाल्या होत्या. त्यांच्या कोठ्यात लढ्याचे डावपेच आखले जात. त्यांच्याद्वारा बंडखोरांना निरोप पाठवले जायचे. या स्त्रिया त्यांना आर्थिक मदतही करायच्या. बऱ्याच तवायफांचे कोठे बंडखोरांना भेटण्याची जागा होती.
परिणामी १८५७नंतर ब्रिटिशांची या कोठ्यांकडे नजर वळली. नृत्य, गायन करणाऱ्या या तवायफांवर ‘वेश्या’ असा ठसा मारला गेला आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आशादेवी, भक्तावरी, हबीबा भगवती, देवी त्यागी, इंद्र कौर, जमीला खान, मान कौर, रहीमी, राज कौर, शोभा देवी आणि उमदा या बंडखोर तवायफांनी तलवारी चालवून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. असगरी बेगमचा अपवाद वगळता बाकीच्या तवायफ वीसएक वर्षांच्या होत्या. काहींना ब्रिटिशांनी फाशी दिले, काहींना तुरुंगात डांबले.
No comments:
Post a Comment