विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 September 2023

१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या भाग ६

 

१८५७च्या उठावातल्या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या
लेखक :रमेशचंद पाटकर

भाग ६
अजून दोन रणरागिणींच्या उल्लेख केला पाहिजे. त्या म्हणजे मंदार व काशी. राणी लक्ष्मीबाईंबरोबर या दोघी ब्रिटिश सैनिकांशी लढल्या. त्या पुरुष वेशात होत्या, पण दोघींची लढण्याची लकब राणीसारखीच होती.
या रणरागिण्या महाराष्ट्राबाहेरच्या – विशेषत: उत्तर प्रदेशच्या आहेत. पण महाराष्ट्रातही धडाडीची एक रणरागिणी होऊन गेली. तिचे नाव बायजाबाई. ती शिवाजीराव धाडगे यांची मुलगी आणि दौलतराव शिंदे यांची पत्नी. दौलतराव वारस मागे न ठेवता वारले, म्हणून बायजाबाईने अकरा वर्षांच्या जनकोजीला दत्तक घेतले. पण त्याचे वय लहान असल्यामुळे त्या ग्वाल्हेर राज्याची मुख्त्यार म्हणून कारभार पाहू लागली. जनकोजी वयात आल्यावर त्याने राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.
बायजाबाईचे व ब्रिटिशांचे हाडवैर होते. ब्रिटिशांनी तिची रवानगी ग्वाल्हेरहून इंदोरला केली, ती तेव्हापासून म्हणजे १९३८पासूनच ब्रिटिशांविरुद्ध बंडाची योजना आखत होती. इंदूरला तिची भेट नानासाहेब पेशवे यांचे गुरू दासबुवा यांच्याशी झाली. बंडाच्या योजनेविषयी तिने त्यांच्याशी विचारविनिमय केला. तिने होळकरांशी संबंध वाढवले आणि त्यांना आपल्या गटात सामील करून घेतले. दिल्ली, आग्रा इत्यादी ठिकाणचाही दौरा केला. ब्रिटिश शासकांचा बंडाच्या बाबतीत कल कसा असेल, हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले. या दौऱ्यात होळकर बायजाबाईंबरोबर होते. दौऱ्यावरून परतल्यावर मात्र होळकरांचा धीर सुटला. त्यामुळे त्यांनी बायजाबाईंशी असलेले संबंध तोडले आणि इंग्रजांनी मदत करायचे ठरवले.
ग्वाल्हेरशिवाय बायजाबाई उज्जैन, नाशिक, सातारा राज्यांत गेल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मराठा साम्राज्याची पुनर्स्थापना केली. सगळीकडे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत होता. आपला उद्देश यशस्वी करण्यासाठी त्यांनी गुजरातला भेट देऊन तिथल्या शासकांना व सैनिकांना प्रभावित केले.
बायजाबाईंनी सर्व मराठा राज्यांच्या शासकांकडे आपले दूत पाठवून शस्त्र हाती घेऊन छत्रपतींच्या राज्याची पुन्हा स्थापना करण्याचे आवाहन केले. ब्रिटिशांविरुद्ध चिथावणी देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणून ब्राह्मणांचाही तिला पाठिंबा होता. (१९५७च्या बंडाने दिलेली प्रेरणी तिच्या प्रयत्नांमागे होती.)
… तर १८५७च्या उठावातल्या अशा या काही दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेदखल रणरागिण्या. इतिहासकार विल्यम डेलरीम्पल यांनी ‘द लास्ट मुगल’ या आपल्या पुस्तकात १८५७च्या उठावातल्या स्त्रियांच्या सहभागाविषयी लिहिले आहे - “अनेक वेळा स्त्रिया आपल्या हाती तलवारी घेऊन सैनिकांना दिशा दाखवत होत्या. त्यांना ‘भित्रे, घाबरट’ असे टोमणे मारत होत्या- ‘स्त्रिया तुमच्यापुढे जात आहेत आणि तुम्ही मागे सरकत आहात. आम्ही गोळीबाराच्या वर्षावात तुम्हाला दारूगोळा आणण्यासाठी जात आहोत. तुम्ही थांबा आणि लढा’. गोळ्यांच्या वर्षावात स्त्रिया लढाईच्या आघाडीवर होत्या.”
.................................................................................................................................................................
लेखक रमेशचंद्र पाटकर कलासमीक्षक आणि मराठी साहित्यिक आहेत.
annapatkar@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...