विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 14 October 2023

सातारा_गादीचे_छत्रपती_प्रतापसिंह_महाराज (थोरले)

 #


सातारा_गादीचे_छत्रपती_प्रतापसिंह_महाराज (थोरले) #यांना_स्मृतीदिनानिमित्त_विनम्र_अभिवादन !

छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्यानंतर त्यांचे दत्तकपुत्र छत्रपती रामराजे( महाराणी ताराबाई यांचे नातू ) हे छत्रपती झाले. १७७७ मध्ये छत्रपती रामराजे यांचे निधन झाल्यानंतर , त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (दुसरे ) छत्रपती झाले. यांच्या काळात प्रधानसेवकाच्या जाचातून मुक्त होण्याचा एकमेव प्रयत्न १७९८ मध्ये झाला होता. या प्रयत्नात करवीर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे ) यांनी मदत केली होती . पण फितुरीमुळे हा प्रयत्न फसला. या नंतर दुसर्या बाजीरावाने छत्रपती शाहू यांच्यावर कडक निर्बंध लादले , त्यांना किल्ल्यावरून उतरण्यास मनाई करण्यात आली , इतरांनाही किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली , छत्रपती अथवा राजपरिवारातील कोणाला गडाखाली जावयाचे असल्यास प्रधानसेवकाच्या कारभार्याची परवानगी घ्यावी लागत असे.

छत्रपती शाहू महाराज (दुसरे) यांची ४ मे १८०८ रोजी निधन झाले. त्यानंतर छत्रपती प्रतापसिंहराजे यांचा राज्याभिषेक १६ मे १८०८ रोजी झाला त्यांचेही संबंध दुसऱ्या बाजीरावा बरोबर ताणलेलेच होते. आपल्या वडिलांची प्रधानसेवकाने केलेली मानहानी ते विसरले नव्हते. दुसर्या बाजीरावाचे ब्रिटीशांशी २० फेब्रुवारी १८१८ मध्ये युद्ध झाले आणि दुसर्या बाजीरावाचा पराभव झाला.

धूर्त इंग्रजांनी खरे तर महाराजांना असे भासवुन दिले होते की; आमची ही लढाई छत्रपतींशी नसून त्यांच्या बंडखोर अधिकाऱ्यांशी आहे.

छत्रपतींनी १८१८ मध्ये कारभार हाती घेतला,त्यावेळी सातारा शहरात मोठा समारंभ पार पडला. त्यानंतर छत्रपती प्रतापसिंह आपल्या राजपरिवारासह अजिंक्यताऱ्यावर राहावयास गेले . छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात प्रजेच्या हिताची कामे केली त्यांचे पोलीस दल एवढे उत्कृष्ट होते की बोटावर मोजण्याइतकेच गुन्हे त्याकाळी घडत. छत्रपतींनी कैद्यांच्या व्यवस्थेसाठी गुरुवार पेठेत "थोरला परज" व सचिवांच्या वाडाच्या जवळ "धाकटा परज" असे दोन तुरुंग बांधले. फौजदारी व दिवाणी न्यायालयांची स्थापना केली. छत्रपती प्रतापसिंह यांनी आपल्या रंगमहालात व राजवाड्यात सर्वसामान्यांसाठी शाळा सुरू केल्या काही मंडळींनी शिकवण्यास नकार दिल्यावर छत्रपतींनी आपले मित्र डॉक्टर मिल्ने यांच्या मार्फत मुलांसाठी व मुलींसाठी शिकवण्यासाठी शिक्षकांची व्यवस्था केली. ग्रंथ छापून घेण्यासाठी छापखाना सुरू केला. छत्रपतींनी ग्रंथालयही सुरू केले या ग्रंथालयांमध्ये देशोदेशीचे वर्तमानपत्र येत असत , सामान्य प्रजेलाही या ग्रंथालयाचा फायदा व्हावा या उद्देशाने राजवाड्यासमोरील नगारखान्यात ग्रंथालय सुरू केले हेच सध्याचे ( छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय ) होय.

सातारा शहराचा विकास करण्यासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सातार्यात नवीन राजवाडा बांधला अाणि तिथे आपल्या राजपरीवारासह राहावयास आले. तब्बल ३४ एकर मध्ये भवानी पेठ वसविली . पाणी व्यवस्थेसाठी १९ विहिरी नव्याने बांधल्या , दोन हौद बांधले तसेच मल्हार पेठ, प्रतापगंज पेठ , दुर्गा पेठ , सदाशिव पेठ या पेठा वसवल्या .
ज्यावेळी साताऱ्यात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला त्याला छत्रपतींनी यवतेश्वर येथे तलाव बांधून तिथून खापरी नळाने पाणी इसवीसन १८२९ मध्ये शहरात आणले. महाबळेश्वर या पर्यटन स्थळाची स्थापना ही छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी केलेली असून , त्यावेळी महाबळेश्वर 'माल्कम पेठ' या नावाने ओळखले जात असे. आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्थित व्हावी यासाठी सातारा-मेढा-महाबळेश्वर , सातारा-पुणे यासारखे अनेक रस्ते छत्रपतींनी बांधले.

छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अनेक वाडे ही बांधले. दप्तरखाना (सध्याचे पोस्ट ऑफिस) फरासखाना, हत्तीखाना इत्यादी इमारतींबरोबरच १८ कारखान्यांसाठी इमारती बांधल्या. सोबतच विविध देवस्थानांच्या मंदिराची दुरूस्ती केली. १८२६ साली अत्यंत देखणा असा वाडा ही छत्रपतींनी बांधला (सध्याचे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज विद्यालय) जलमंदिर हा राजवाडाही बांधला.

पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपल्या वकीलास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.

अशा या प्रजाहितदक्ष, उत्तम प्रशासक ,न्यायप्रिय ,शेतकऱ्यांचे कैवारी ,
स्वाभिमानी छत्रपतींना आज त्यांच्या पुण्यतिथी निमीत्त
#मानाचा_मुजरा !!


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...