१० जानेवारी १७६० !
'यद्यपी मनसबा तर भारीच पडला आहे , राजपुताकडे राजश्री मलारराऊ होळकर गुतले, चहूकडोन दुश्मनी फौजा भारी व सारे अमित्र . पन सिंदे मोठे हिमतीचे माणूस जवानमर्द शूर पराक्रमी. येवढे अवडंबर आले असता किमपी भय चिंता ,कसे होईल पुढे हा उद्योग ज्याच्या मुखश्रीवर दिसत नाही." ....युद्धापूर्वी दत्ताजीरावांबद्दल आलेला तत्कालीन उल्लेख सांगून जातो कि 'मरणार पण हटणार नाही ' हे वाक्य अतिशयोक्ती कधीच नव्हतं
अब्दाली बेरकी होता, आक्रमण करणार नाही अशी पूर्ण शक्यता असतानाच तो घाला घालायचा. यावेळीही त्याने मुहूर्त निवडला होता 'मकरसंक्रांत' . दत्ताजीराव शिंद्यांच्या मदतीला मल्हारराव होळकरांची फौज येणार होती, दोंन्ही फौजा एकत्र आल्या तर आपल्याला यमुना पार करता येणार नाही याची अब्दालीला खात्री होती. अब्दालीने होळकर पोचण्याआधीच यमुना ओलांडायचे नक्की केले , इथे यमुनेला ठिकठिकाणी चौक्या बसवल्या होत्या . तरीही धुक्यात अब्दाली - नाजिबाच्या काही तुकड्या धुक्याचा फायदा घेत मधली बेटे ओलांडून अलीकडच्या तीरावर येत होत्या.
दत्ताजीराव उत्तरेला थांबले होते तर साबाजी शिंदे बुराडीघाटात होते , अफगाणी पुढे निशाण घेऊन आले तोवर साबाजी बेसावध होते , नजरेच्या टप्प्यात येताच साबाजीच्या सैन्यावर अफगाणी सैन्याने बेफाम गोळीबार सुरु केला . या हल्ल्याची वार्ता कळताच दत्ताजींनी साबाजीच्या मुलाला म्हणजे बायाजी याला ५००० सैन्य घेऊन पुढे पाठवले. इकडे अफगाण -रोहिले नदी ओलांडून लोंढयाने येत होतेच. या भागाला आता रणसंग्रामाचे रूप आले होते .
इतक्यात बायाजी पडल्याची बातमी आली आणि लगेच दत्ताजीराव शिंदे,पिराजीराव जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे हे पुढे आणि मागून जनकोजी शिंदे निघाले. मागे हटणाऱ्या मराठ्यांना चेतवत दत्ताजी भाला चालवत रोहिल्यांवर चालून गेले ,शेकडो रोहिले मारले गेले .बाकीचे मागे हटले . दुसऱ्या बाजूला जनकोजी सुद्धा पराक्रमाची शर्थ करत असताना त्यांना दंडात गोळी लागून ते कोसळले,जनकोजी सुद्धा पडले अशी बातमी आल्याने शोकाकुल दत्ताजी आपल्या १८-२० साथीदारांनिशी अफगाणी -रोहिल्यांच्या सैन्यात घुसले. दत्ताजींच्या सोबत सरदार पिराजीराव जगदाळे ,यशवंतराव जगदाळे ,सरदार हिंगणे होते. शत्रू फौजांचे बर्कंदाज बंदुकांचा तुफानी मारा करत होते. पुढे घुसलेले हे चौघे कापाकापी करत शत्रुसैन्यात आतपर्यंत आले होते , यशवंतराव जगदाळ्यांना गोळी लागून ते खाली पडले ,मागेच असणाऱ्या पिराजी जगदाळ्यांनी त्यांना घोड्यासह मागे ओढायला सुरुवात केली,मागोमाग मदतीसाठी दत्ताजी आले आणि दोघे मिळून घोडी बाहेर काढायला लागले.
सणकत आलेली एक गोळी दत्ताजींच्या डोक्यात घुसली आणि ते जागेवर कोसळले, अफगाण्यांचा वेढ्यात अडकलेलं पिराजी सुद्धा फार काळ तग धरू शकले नाही आणि मारले गेले. इकडे दत्ताजींना गोळी लागल्याचे वर्तमान नजीबाचा गुरु कुतुबशाह ला कळले, दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे” ... कुतुबशाह ने हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला अन दत्ताजीची मान धडावेगळी केली. दत्ताजी,पिराजी,यशवंतराव यांचे मस्तक भाल्याच्या टोकावर लावून फिरवण्यात आले आणि नंतर अब्दालीकडे पाठवण्यात आले.
मराठ्यांनी दत्ताजींच्या जीवाची शिफारस करून सुद्धा कुतुबशाह ने ज्या क्रूरतेने दत्ताजींना मारले आणि विटंबना केली हे मराठे विसरले नाहीत , कुतुबशाह चे मुंडके कापून दिल्लीत फिरवून , नजिबाची समाधी उध्वस्त करून ,नजिबाच्या नातवाची जिवंतपणी कातडी सोलून ,रोहिल्यांच्या रोहीलखंड बेचिराख करून त्यांचे नामोनिशाण मिटवून मराठ्यांनी सगळा हिशेब चुकता केला ....
No comments:
Post a Comment