अजातशत्रू शाहू
( भाग - २१ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स्वराज्याचा
विस्तार कोकणात झाल्यापासून जंजिरेकर सिद्दीचा मराठी राज्याला उपद्रव
सुरु झाला होता. सिद्द्यांची खोड मोडण्याचे अनेक प्रयत्न शिवाजी - संभाजी
या पितापुत्रांनी केले. परंतु सिद्द्यांना जरब बसवणे यापलीकडे त्यांच्या
स्वाऱ्यांचा काही उपयोग झाला नाही. शाहू राज्यावर आला त्यावेळी कोकणात
सिद्दी आणि आंग्रे यांचा झगडा जुंपलेला होता. मात्र आंगऱ्यांना एकाच वेळी
सिद्दी, मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. शत्रूंना तोंड देणे शक्य
नसल्यामुळे एकाच्या मदतीने दुसऱ्याचा पराभव करून ते आपले वर्चस्व राखू पाहत
होते. अशा स्थितीत सिद्दी सोबत कधी युद्ध तर कधी तह असे प्रसंग उद्भवत.
स. १७३३ मध्ये शाहूने जंजिऱ्यावर मोहीम आखली. आपले सर्व प्रमुख प्रधान व
सरदार त्याने या स्वारीसाठी कोकणात रवाना केले. जंजिरा व रायगड ताब्यात
घेणे हि या मोहिमेची प्रमुख दोन उद्दिष्ट्ये होती. पैकी रायगड ताब्यात
घेण्याचे बाजीरावाने कारस्थान रचले पण प्रतिनिधीने स्वतंत्रपणे प्रयत्न
करून रायगड ताब्यात घेतला. आधीच पेशवे - प्रतिनिधी मधून विस्तव जात नव्हता.
त्यात प्रतिनिधीच्या या यशाची / कृत्याची भर पडली. परिणामी, बाजीरावाने
यापुढे मोहिमेत मनापासून सहभाग घेतलाच नाही. उलट आंगऱ्यांना हाताशी धरून
त्याने प्रतिनिधीचे पाय खेचण्याचा उपक्रम आरंभिला. याचा परिणाम म्हणजे
जंजिरा स्वारी रेंगाळून स. १७३३ च्या डिसेंबरमध्ये बाजीरावाने सिद्दी सोबत
तह करून मोहीम आटोपती घेतली. जरी बाजीराव या स्वारीतून बाहेर पडला असला
तरी इतर सरदारांच्या मार्फत शाहूने जंजिरा मोहीम सुरूच ठेवली. आंग्रे व
इतर मराठी सरदारांच्या प्रयत्नांचे फळ म्हणजे सिद्दी जेरीस येउन त्यांचे
बळ खचू लागले. त्यांना कुमक देखील कुठ्न मिळेना. इंग्रज, पोर्तुगीजांनी
प्रसंग पाहून आतल्या अंगाने सिद्द्यांना जगवण्याचा प्रयत्न केला पण तो
तितकासा उपयुक्त ठरला नाही. मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात चिमाजी आप्पा
मानाजी आंगऱ्याच्या मदतीसाठी कोकणात उतरला. १९ एप्रिल १७३६ रोजी
सिद्द्यांचा प्रमुख सरदार सिद्दी सात यास रेवासजवळ श्रीगाव येथील लढाईत
चिमाजी आपाने ठार केले. या लढाईने सिद्द्यांचा सर्व जोर संपून ते शरण आले.
जंजिरा किल्ला त्यांच्या ताब्यात ठेवण्याच्या अटीवर त्यांनी शाहूचे
मांडलिकत्व स्वीकारले. अर्थात हि मांडलिकी फक्त कागदावरचं राहिली हे वेगळे
सांगायची गरज नाही. जंजिरा मोहीम तशी यशस्वी झाली पण जंजिरा किल्ला
सिद्द्यांच्याच ताब्यात राहिल्याने तिच्या यशाला अपयशाचे मोठे गालबोट
लागून राहिले. जर शाहू स्वतः या मोहिमेत युद्ध आघाडीवर दाखल झाला असता तर
कदाचित या मोहिमेचे स्वरूप साफ पालटले असते. बाजीराव - पर्तिनिधी
यांच्यातील पाय खेचण्याचा खेळ बंद पडला असता. त्याशिवाय इतर सरदार देखील
आपापसांतील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्यास परवृत्त झाले असते. परंतु
शाहूचा पाय साताऱ्यातून बाहेर न निघाल्याने जंजिरा स्वारी बव्हंशी
निष्फळचं ठरली.
No comments:
Post a Comment