अजातशत्रू शाहू
( भाग - २० )
लेखन ::संजय क्षीरसागर
स.
१७२८ मध्ये पालखेडच्या विजयाने जरी शाहूचे आसन स्थिर व बळकट झाले असले
तरी त्याला हादरा देण्याचे निजामाचे प्रयत्न सुरुच होते. यावेळी त्याच्या
गळाला शाहूचा सेनापती त्रिंबकराव दाभाडे हा लागला होता. त्रिंबकराव हा
पराक्रमी व शूर असल्याने आणि बाजीरावाप्रमाणेचं काहीसा उद्दाम असल्यामुळे
बाजीरावाचे आणि त्याचे पटत नव्हते. त्यात शाहूच्या एका कृत्याची भर पडली.
गुजरात प्रांताचा निम्मा मोकासा त्याने चिमाजीआपाला व निम्मा त्रिंबकरावस
दिला. दाभाड्यांना शाहूचा हा निर्णय अजिबात मंजूर नव्हता. तेव्हा शहूने
गुजरातच्या बाबतीत फेरविचार करून चिमाजीच्या नावे दिलेला मोकासा रद्द
केला. परंतु,यामुळे पेशवे - सेनापती यांच्यातील वैराग्नी पेटायचा तो
पेटलाच. या काळात दोघांनी प्रत्यक्ष लढणे टाळले, पण त्यांचे हस्तक मात्र
एकमेकांच्या प्रदेशवर ताव मारत होते. तडजोडीच्या उद्देशाने पेशव्यांनी
सेनापतीसमोर प्रस्ताव ठेवला कि, गुजराथमध्ये आम्हांस निम्मी वाटणी द्यावी
बदल्यात माळव्यात आम्ही तुम्हाला निम्मी वाटणी देऊ. पण सेनापतीने हा
प्रस्ताव धुडकावून लावला आणि निजामाशी हातमिळवणी करून पेशव्याचा काटा
काढण्याचा बेत रचला. निजाम आपल्या फौजेसह दाभाड्यांच्या मदतीस निघाला पण
या दोघांच्या सैन्याची युती होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे
त्रिंबकरावास गाठून त्याचा पराभव केला. या संग्रामात त्रिंबकराव मारला
गेला. डभईच्या प्रसंगाने गुजरातचा तंटा काही मिटला नाही पण पेशव्याची दहशत
मात्र इतर सरदारांवर बसून ते पेशव्यास वचकून राहू लागले. दाभाडे - पेशवे
वादाचे निवारण करणे शाहूस न जमल्यामुळे एकप्रकारे पेशव्यांचे वर्चस्व वाढत
जाण्यास तो देखील काही प्रमाणात कारणीभूत ठरला. सेनापती, प्रतिनिधी सारखी
मंडळी पेशव्यावर का चिडून आहेत याच्या कारणांचा शोध घेऊन आपल्या
प्रधानांमधील वाद मिटवण्यास शाहूने पुढाकार घ्यायला हवा होता. पण असे
दिसून येते कि, पेशव्याचे जसजसे लष्करी सामर्थ्य वाढत चालले होते तसतसे
शाहूचे अधिकारवर्चस्व घटू लागले होते.
No comments:
Post a Comment