विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

प्राचीन काळी नागपूर शहराचे नाव 'नागपूर' नव्हे तर 'फणींद्रपूर' होतं? भाग २

 





प्राचीन काळी नागपूर शहराचे नाव 'नागपूर' नव्हे तर 'फणींद्रपूर' होतं?
भाग २
लेखक ::सतीश राजगुरे
काही अभ्यासकांच्या मते, या परिसरात नागवंशीय लोक राहत होते. त्यामुळे 'नाग' जातीवरून नागपूर हे नाव निर्माण झाले असावे.
नाग जाती अनार्य असून त्यांचे वंशज आसाम व अंदमान येथे आहेत. कुशाणानंतर बुंदेलखंडात आरशिव नाग हे राजे झाले. पुढे त्यांनी वाकाटकांशी स्नेह वाढवला. भारशिव नागांचा एक दगड पौनी येथे सापडला. यावरून येथे नागांचे राज्य होते व त्यांच्या नावावरून 'नागपूर' हे नाव पडले असावे. उत्तरेत कुशाण वंशीय राजांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्यानंतर नागवंशीय राजांनी इ.स.८० ते १७५ या काळात या प्रदेशात येऊन वस्ती केली, असे प्रसिद्ध संशोधक डॉ.जयस्वाल यांचे मत आहे. विख्यात बौद्ध तत्वज्ञानी नागार्जुन येथेच होऊन गेला.
त्याचप्रमाणे नाग नदीच्या काठी गाव वसलेले असल्यामुळे 'नागपूर' हे नाव पडले असावे, असाही एक प्रवाह आहे. या शहरात असलेली नागनदी तसेच नागदेवतांची अनेक मंदिरे 'नागपूर' या नावास पुष्टी जोडतात.
(स्त्रोत: द वायर सायन्स)
नागपूर परिसरातील 'उदासी मठ' हा नागा साधुंशी संबंधित मठ आहे. त्यामुळेही नागपूर नाव पडले असावे, असे काही लोक मानतात. नागपूर महानगर पालिकेने आपल्या लोगोमध्ये ठळकपणे नाग दाखविले आहेत. यावरून नागांचा व या शहराचा जवळचा संबंध असल्याचे सिद्ध होते.
(स्त्रोत: नागपूर तहेलका)
नागपूरचा पहिला संदर्भ वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील एका ताम्रपटामध्ये आढळून आला. प्रचलित माहिती नुसार छिंदवाडा येथील गोंड राजाचा मुलगा बख्तबुलंद शहा याने नागपूर शहराची १७०२ मध्ये स्थापना केली व त्याला आपल्या राजधानीचे स्वरूप दिले. त्याने या परिसरातील १२ गावे/वाड्या एकत्रित करून त्यात पेठा वसवल्या. या बारा गावांना 'राजापूर बारशा' म्हणत. यातील 'बारशा' हा शब्द 'बारा शिवा' याचा अपभ्रंश आहे. बख्तबुलंद शहाने हरिपूर, हिवरी, सक्करदरा, वाठोडे, आकरी, लेंढरा, फुटाळा, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी ही गावे एकत्र करून नागपूर शहर वसवले.
नंतरच्या काळात नागपूर प्रचंड वाढून ते मध्यप्रांताची राजधानी आणि नंतर महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर बनले. कधी काळी १२ गावे/वाड्या असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या आजमितीस तीस लाखांवर गेली आहे. परिसरातील अनेक छोटी गावे आपल्यात सामावून घेऊन या शहराने देशातील एक महानगर अशी स्वतःची ओळख निर्माण केली.
तळटीपा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...