अजातशत्रू शाहू
( भाग - ७ )
लेखन ::संजय क्षीरसागर
छ.
शिवाजी निर्मित स्वराज्याचे खरे वारस आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी शाहू
- ताराबाई आपापले सर्व बळ एकवटून कार्य करीत होते. स्वराज्याचा लढा आता
भोसले घराण्याचा झगडा बनला होता व या झगड्यांत दोन्ही पक्षांचे प्रमुख
अपवाद केल्यास इतरांना फारसा रस नव्हता. याचे कारण म्हणजे, या झगड्यातून
काय अर्थप्राप्ती होणार हे दिसतच होते. अशा परिस्थितीत कित्येक मराठी
सरदारांनी पक्ष बदलाचा पर्याय स्वीकारला. ताराबाई - मोगल अशी युती दिसताच
शाहूच्या दरबारातील कित्येक सरदार फिरून ताराबाईस रुजू झाले. काही महाभाग
असेही होते कि, भोसले घराण्याच्या तंट्यात पडून फुकट मरण्यापेक्षा सरळसरळ
मोगलांची चाकरी करण्यास निघून गेले. अर्थात, त्यांनाही दोष का द्यावा ?
ताराबाई व शाहू देखील आपणांस स्वराज्याचे खरे वारस म्हणून मोगली मान्यता
मिळवण्यासाठीच तर झगडत होते ! सारांश, कनिष्ठांनी वरिष्ठांचे अनुकरण मात्र
करावे पण योग्य अयोग्य हा विचार न करावा हि सामाजिक मानसिकताच या
उदाहरणातून दिसून येते इतकेच !
ताराबाई
- शाहू यांच्या झगड्यास वैतागून मोगलांकडे जाणाऱ्यांमधील सर्वात मोठे
प्रस्थ म्हणजे चंद्रसेन जाधव ! शाहूच्या या प्रमुख सेनापतीस फितूर
करण्याचा ताराबाईने बराच प्रयत्न केला व चंद्रसेनने देखील आपण ताराबाईस
अनुकूल असल्याचा देखावा रचला. त्यानिमित्ताने त्याने थोरात, निंबाळकर,
पवार इ. सरदारांनाही शाहूविरोधात चिथावणी दिली. दरम्यान शाहूसोबत तंटा
करण्यास त्याला जे निमित्त हवे होते ते बाळाजी विश्वनाथच्या रूपाने त्यास
प्राप्त झाले. शाहूने बाळाजीला ' सेनाकर्ते ' हे नवीनच पद दिले. त्यामुळे
सेनापती चंद्रसेन जाधवास हे आपल्या अधिकारक्षेत्रातील अतिक्रमण वाटल्यास
नवल नाही. त्यातच हरणाचा / काळ्या कबुतरा तंटा बाळाजी व चंद्रसेनच्या
सेवकांमध्ये उद्भवून दोन्ही पक्षांची बाचाबाची झाली. तेव्हा जाधवाने
बाळाजीस कैद करण्याचा घाट घातला. जीवावरील संकट जाणून बाळाजी शाहूच्या
आसऱ्यास धावला. शाहूने बाळाजीस अभय देताच चंद्रसेनाने शाहूला निरोप पाठवून
बाळाजीस आपल्या हवाली करण्याची मागणी केली अन्यथा आपण चाकरी सोडून जात
असल्याची धमकी दिली. शाहूने जाधवाची समजूत घालण्यासाठी व तो ऐकत नसल्यास
त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हैबतराव निंबाळकरास पाठवले. निंबाळकराने
जाधवास उधळून लावले तेव्हा चंद्रसेन ताराबाईच्या दरबारात रुजू झाला. ( स.
१७११ ) पुढे त्याने हैबतराव निंबाळकरास ताराबाईच्या पक्षात आणण्याची
कामगिरी बजावली आणि संधी मिळताच मोगल मुत्सद्दी निजाम याच्या पदरी तो
गेला. परंतु हा भाग पुढील काळात घडला असल्याने तूर्तास इतकेच पुरे.
No comments:
Post a Comment