विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 12 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ६ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ६ )
लेखन ::संजय क्षीरसागर
दरम्यान स. १७०८ मध्ये मोगल बादशाह मुअज्जम उर्फ बहादूरशहा नगरला येउन दाखल झाला होता. शहजादा कामबक्षचा निकाल लावून आपले बादशाही पद सुरक्षित राखण्यासाठी त्याने हि मोहीम आखली होती. या मोहिमेत मराठी सरदारांची कामबक्षला मदत न व्हावी या हेतूने त्याने शाहूला आपल्या मदतीस येण्याची आज्ञा केली. स. १७०७ मध्ये मुअज्जमने शहजादा आजमचा पराभव करून त्याचा निकाल लावल्याने शाहूचा परिवार आता मुअज्जमच्या ताब्यात आला होता. अशा परिस्थितीत शाहूला मुअज्जम उर्फ बहादूरशहाची आज्ञा पाळणे भागच होते. परंतु, तो स्वतः बहादूरशहाकडे गेला नाही. आपल्या मार्फत म्हणून त्याने नेमाजी शिंद्यास मोगल बादशाहच्या मदतीस पाठवले व आपला मुक्काम साताऱ्यास हलवला. शाहू कोल्हापूरातून निघून जाताच ताराबाईने त्वरेने येउन पन्हाळा ताब्यात घेतला. कोल्हापुरास यावेळी शाहूच्या मार्फत नेमलेला परसोजी भोसले होता. त्याने किंवा शाहूने ताराबाईच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
स. १७०९ च्या जानेवारीत बहादूरशहाने कामबक्षाचा पराभव करून त्यास ठार केले. बहादूरशहाचे आसन स्थिर झाल्याचे पाहताच आपल्या राज्यास मोगलांची मान्यता मिळावी व दक्षिणच्या सहा सुभ्यातुन चौथाई, सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचे फर्मान मिळावे यासाठी शाहू आणि ताराबाईने आपापले वकील बहादूरशहाकडे रवाना केले. मोगली मुत्सद्यांच्या सल्ल्यानुसार बहादुरशहाने शाहू व ताराबाई यांना सांगितले कि, तुम्ही आपापसांत आधी निश्चित करा कि, शिवाजीच्या राज्यावर तुमच्यापैकी नेमका कोणाचा अधिकार आहे. मगच आम्ही तुम्हाला चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा देऊ. मोगलांच्या या पवित्र्याने शाहूचा भ्रमनिरास झाला तर त्यामानाने ताराबाईस विशेष बळ प्राप्त झाले. कारण, मोगलांच्या या निवाड्याने शाहूला मोगल दरबारचा सक्रिय पाठिंबा नसल्याचे जाहीर झाले. ताराबाई व शाहू यांच्यात तंटा लावून मोगल स्वस्थ बसले नाहीत. शाहूने सोडवलेले प्रांत परत फिरून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला. पुणे प्रांत म्हणजे स्वराज्याचा गाभा. तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शाहूच्या सरदारांच्या व मोगलांच्या बऱ्याच लढाया पुण्याच्या आसपास घडून आल्या. इकडे ताराबाईने आपले राजकीय चातुर्य पणाला लावून दक्षिणेतील मोगल अंमलदारांना आपल्या पक्षास मिळवून शाहूचा उच्छेद चालवला. सारांश, ताराबाई व मोगल यांच्या कात्रीत शाहू चांगलाच सापडला व संभाजीचा हा पुत्र या अडचणीतून कसा मार्ग काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...