विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 12 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ८ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ८ )
लेखन ::संजय क्षीरसागर
चंद्रसेन निघून जाताच शाहूने, चंद्रसेनाचा भाऊ संताजी यास सेनापतीपद दिले. इकडे बाळाजी विश्वनाथाने पिलाजी जाधव, अंबाजी पुरंदरे इ. मदतीने फौजफाटा वाढवून शहूची बाजू बळकट करण्याचा उद्योग आरंभला. कारण, परसोजी भोसले व चिमणाजी दामोदार वगळल्यास शाहूकडे आता फौजबंद असे कोणी मराठी सरदार फारसे नव्हते व हे दोघेही खानदेशाकडे असल्याने आणि पेशवा बहिरोपंत पिंगळे हा निष्क्रिय राहिल्याने शाहूची अवस्था बिकट बनली होती. दरम्यान चंद्रसेन जरी शाहूला सोडून गेला असला तरी शाहूच्या उर्वरित सरदारांचे मनोधैर्य अजून कायम होते. स. १७११ च्या अखेरीस कोरेगाव नजीक खटाव येथील कृष्णराव खटावकर या मोगली ठाणेदारास लढाईत ठार करून बाळाजी विश्वनाथाने खटाववर शाहूचा अंमल बसवून दिला. या मोहिमेत बाळाजीला श्रीपतरावची मदत झाली. स. १७१२ मध्ये ताराबाईच्या आज्ञेनुसार आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे कोकणातून पुढे घाटावर, सातारच्या दिशेने येऊ लागला. त्यास रोखण्यासाठी शाहूने बहिरोपंत पेशव्यास रवाना केले. परंतु, कान्होजीने बहिरोपंतास कैद करून शाहूच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. खुद्द पेशवाच कैद झाल्याने शाहूची स्थिती बिकट झाली. पण प्रसंग जाणून त्याने बाळाजी विश्वनाथास पेशवेपद दिले. याकामी अंबाजी पुरंदरेची बाळाजीला मोठीच मदत झाली. बाळाजीस पेशवा बनवून कान्होजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शाहूने त्याच्यावर सोपवली. ( स. १७१३, नोव्हेंबर ) पेशवेपद मिळताच बाळाजी आंगऱ्याच्या मोहिमेवर रवाना झाला. युद्धापेक्षा वाटाघाटींनी आंगऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा बाळाजीने प्रयत्न केला व त्यात तो यशस्वी झाला. कान्होजीने शाहूची ताबेदारी मान्य केली. अर्थात, यामागे बाळाजीची मुत्सद्देगिरी कारणीभूत असली तरी ते काही प्रमुख कारण नाही. कान्होजी शाहूकडे वळण्यास तत्कालीन राजकारणातील एक अपघात प्रामुख्याने कारणीभूत ठरला. ( स. १७१४ )
स. १७१४ मध्ये शाहूचा पाडाव करण्याच्या खटपटीत ताराबाई मग्न असताना, राजारामची द्वितीय पत्नी राजसबाई व तिचा मुलगा संभाजी दुसरा यांनी ताराबाई व तिचा पुत्र तिसरा शिवाजी यांना कैदेत टाकून कोल्हापूची सत्ता आपल्या हाती घेतली. सुप्रसिद्ध मुत्त्सद्दी रामचंद्रपंत अमात्य याने हे कारस्थान रचले. हा कट यशस्वी होण्यास शाहू व निजाम या दोघांनी हातभार लावल्याचे मानले जाते. कोल्हापुरास हि राज्यक्रांती झाली त्यावेळी कान्होजी आंग्रे व बाळाजी विश्वनाथ युद्धाच्या तयारीने समोरासमोर आले होते. परंतु, कोल्हापूरची बातमी समजताच आंगऱ्याचे नैतिक बळ खचले. नव्या परिस्थितीत आपले स्थान काय हा प्रश्न त्याच्यासमोर उद्भवला. आंगऱ्याची मनःस्थिती जाणून व संभाजीने त्यास आपल्या पक्षात घेण्याआधी आपणच त्यास शाहूच्या ओटीत घातले असता अंती फायदा आपलाच आहे हे ओळखून बाळाजीने त्यास शाहूच्या पदरी आरमारप्रमुखाची लालूच दाखवली. त्याशिवाय कोकणात जे काही प्रांत व किल्ले आंगऱ्याने ताब्यात घेतले होते, ते त्याच्याच ताब्यात राहतील असे आश्वासनही दिले. या बदल्यात आंगऱ्याने शाहूस छत्रपती म्हणून मान्यता द्यायची होती. अशा या व्यवहारात आपले काहीच नुकसान नाही हे पाहून कान्होजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. ( स. १७१४ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...