अजातशत्रू शाहू
( भाग - ९ )
लेखन ::संजय क्षीरसागर
मोगल
आघाडीवर यावेळी भलतीच हालचाल चालली होती. निजाम उल्मुल्क हा स. १७१३
मध्ये दक्षिणचा सुभेदार म्हणून कारभारावर दाखल झाला. ढासळत्या मोगल
बादशाहीची अंतःस्थिती जशी त्याला माहिती होती तशी शाहू, ताराबाई वा इतर
मराठी सरदारांना नव्हती. दक्षिणेत स्वतंत्र पंथ पाहण्याचा त्याचा गुप्त
हेतू होता व त्यासाठी तो प्रयत्नशील होता. वरवर मोगल बादशाहीचा अधिकारी
म्हणून काम करताना तो येथे आपले हितसंबंध जुळवू लागला होता. ताराबाई व
शाहू अशी दोन फळ्यांत विभागलेली मराठेशाही त्याच्या महत्त्वकांक्षेला
अनुरूप अशीच होती. या दोघांपैकी एका पक्षाला मदत करण्याच्या नावाखाली
दक्षिणेतील आपले आसन बळकट करण्याचा त्याचा डाव होता. शाहू - ताराबाई
वादांत, ताराबाई कैदेत जाउन संभाजी आला आणि निजामाच्या गळाला संभाजीरुपी
मासा अलगद लागला. शाहू मोगलांच्या कैदेत लहानाचा मोठा झाला होता तर
ताराबाई सुमारे २० - २२ वर्षे मोगलांशी राजकारण व युद्ध या दोन्ही
माध्यमांतून लढत होती. या दोघांवर कब्जा बसवणे निजामाला थोडे अवघड होते.
त्यामानाने अननुभवी संभाजी त्याच्या कारस्थानात फसणे सोपे होते व तसेच
घडले. मात्र निजामाच्या धुर्ततेचा कळस असा कि, त्याने शाहूला आपण त्याचे
हितचिंतक असल्याचे भासवून काही काळ अक्षरशः गाफील ठेवले. ब्रिटन लढाई हरते
पण युद्ध जिंकते असे म्हटले जात असे, त्या धर्तीवर मोगल लढाई हरत पण
मुत्सद्देगिरीत निदान मराठी सत्ताधीशांच्यापुढे तरी जिंकत असे म्हणावेसे
वाटते.
No comments:
Post a Comment