अजातशत्रू शाहू
( भाग - २६ )
लेखन ::संजय क्षीरसागर
इकडे
नानासाहेबाने पेशवेपद मिळाल्यावर एक नवीनचं पराक्रम करून ठेवला.
कोल्हापूरच्या संभाजीसोबत त्याने एक गुप्त करार करून शाहूच्या पश्चात
संभाजीला सातारच्या गादीवर बसवण्याचे मान्य केले. शाहूची वृद्धावस्था,
त्याला पुत्रसंतान नसणे आणि राज्याचा वाढता विस्तार पाहता पुढे काय हा
प्रश्न दरबारातील मुत्सद्यांच्या समोर उभा राहू लागला होता. या प्रश्नाचे
निरसन करण्याच्या नावाखाली आपापला स्वार्थ साधण्यास नानासाहेब पेशवा व
रघुजी भोसले धडपडू लागले. पेशव्याची इच्छा अशी कि, सातारा व कोल्हापूर हि
दोन राज्ये एक करावीत. संभाजीपण यावेळी म्हातारा झाला होता आणि त्यालाही
मुलबाळ नव्हते. त्याशिवाय तो फारसा कर्तबगार नसल्याने त्यास कधीही
गुंडाळून ठेवणे पेशव्याला सहजशक्य होते. मिळून सातारा व कोल्हापूर हि दोन
राज्ये एक करून पेशवा आपले सामर्थ्य व महत्त्व वाढवू इच्छित होता. त्याउलट
रघुजीचे बेत होते. शाहूची धाकटी राणी सगुणाबाई हि रघुजीच्या आईची चुलत
बहिण असल्याने रघुजीच्या मुलांपैकी एकाला दत्तक घेण्याचा सगुणाबाईचा विचार
चालला होता व शाहू देखील त्यास अनुकूल होता. पण काही कारणांनी हा बेत
अंमलात आणता आला नाही. सातारची गादी आपल्या मुलाला मिळवून
देण्याव्यतिरिक्त आणखी एक उद्देश रघुजीच्या मनात होता व तो म्हणजे
नानासाहेबास पेशवेपदावरून दूर करणे हा होय ! सारांश, स. १७४० - ४१ पासून
सातारचे मुत्सद्दी शाहूच्या मरणाची वाट बघू लागले होते.
No comments:
Post a Comment