विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - २७ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - २७ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स. १७४३ च्या मे व जून महिन्यात शाहू आजारी पडला. त्याकाळात सर्व हिंदुस्थानातील सत्ताधीशांचे लक्ष साताऱ्यात काय होते याकडे लागले होते. परंतु, सुदैवाने शाहू आजारातून उठला. पण यावेळी त्याच्यात पूर्वीसारखा जोर राहिला नव्हता. त्यातचं त्याच्या घरातील प्रकरणांची भर पडली. त्याच्या दोन्ही राण्यांचे आपसांत पटत तर नव्हतेच पण दरबारी राजकारणात देखील त्या नको तितका हस्तक्षेप करीत. न्याय - निवाड्याच्या बाबतीत देखील त्या पुढाकार घेत व न्याय - अन्यान न पाहता आपल्या माणसांची बाजू उचलून धरत. त्यांच्या या मनमानी कारभारा समोर शाहूचे देखील फारसे काही चालत नव्हते. वृद्धावस्था, अस्थिर प्रकृती, बायकांची भांडणे इ. मुळे तो पुरता वैतागून गेला. त्यातचं अलीकडे नानासाहेब पेशवा शाहूच्या पूर्वपरवानगी शिवाय कित्येक राजकीय प्रकरणे स्वबळावर उरकू लागल्याने त्याच्याविषयी शाहू साशंक बनला आणि स. १७४७ च्या जानेवारी - मार्च दरम्यान केव्हातरी त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केले. नानासाहेबाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पेशवा बनवण्याचा शाहूचा विचार होता पण आपल्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्याच्या बळावर नानासाहेबाने इतर मराठी मुत्सद्द्यांना व सरदारांना असा धाक घातला होता कि, त्याने रिक्त केलेलं पंतप्रधानपद स्वीकारण्यास कोणी पुढे येईना. त्याशिवाय आपल्या लष्करी बळाचा खुद्द शाहुवर देखील प्रयोग करण्यास नानासाहेबाने मागेपुढे पाहिले नाही. शाहूस लिहिलेल्या एका पत्रात त्याने आपले पद परत न दिल्यास आपण ' बाहेरील इज्जतीचा दरकार सोडून बसू ' अशी स्पष्ट शब्दांत धमकी दिली. इज्जतीचा दरकार सोडून नानासाहेब काय करणार होता ? कदाचित लष्करी बळावर त्याने शाहूला कैद करून संभाजीला साताऱ्यास आणले असते किंवा इतर कोणाला तरी सातारची गादी दिली असती किंवा त्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली असती. सारांश, नानासाहेबाने आपले लष्करी बळ शाहूच्या निदर्शनास आणून देताच एप्रिलमध्ये शाहूने त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली व या प्रकरणावर पडदा टाकला. ( स. १७४७ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...